Wednesday, February 15, 2017

रतनगड : "एक ब्लॉकबस्टर ट्रेक" : सर्व भाग



नाव थोडं वेगळं वाटलं ना... तसं विशेषच कारण आहे. जसं एखाद्या सिनेमा ला हिट होण्या साठी एक फॉर्म्युला असतो ... इमोशन, कॉमेडी, ड्रामा वगैरे वगैरे; तसेच एखादा ट्रेक हिट होण्या साठी जे काही असणे गरजेचे आहे ते सर्व रतनगड ट्रेक मध्ये आहे. कल्याण पासून साधारण १४० कि.मी. अंतरावर भंडारदरा धरणाच्या परिसरातील डोंगर रांगांतील एक. भंडारदरा परिसर म्हणजे ट्रेकर च्या गळ्यातील ताईत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अहो खरोचरच.. आपण नेकलेस म्हणूया. सुरवातीला कळसुबाई, मग ए. एम. के. अर्थात अलंग -  मदन - कुलंग, त्यानंतर सांधण दरी; मधोमध रतन गड आणि त्याच्या बाजूस आजोबा, कात्राबाई, पाबर गड, घनचक्कर आणि भैरव गड. तसेच इथून एक रस्ता ट्रेकर्स चे दैवत हरिशचंद्र गड येथे हि जातो.

असो... तर तारीख ठरली जानेवारी २१-२२, २०१७. मेम्बर्स ६. अभय (खरखर), अमोल (खली). मनीष (बच्चा), आयुष (बाबी), अमित (बापू) आणि मी. गाडी एर्टिगा. रात्रीच्या जेवणाचा शिधा (रेडी टू मेक) मसाले भात मनीष नि घरून करून आणला होता. स्वंयपाक कारायचा असल्या मुळे तेल, भांडी, ताटल्या, पातेली हे सर्व सामान देखील होते. पोळी-भाजी, पराठे, चटणी, लोणचे हे सर्व देखील. तसेच मुक्कामी असल्या मुळे मॅट्स, स्लीपिंग बॅग्स इ. सामान देखील होते. हे सर्व सामान आमचे सीझन्ड ट्रेकर्स अभय, मनीष आणि अमोल यांच्या कडे. तुम्ही कल्पना करू शकता कि सामान किती वाढले असेल. पण हाच तर फरक आहे पिकनिक आणि ट्रेक मध्ये. तुंग तिकोना च्या वेळी आम्ही कोळवण ला घरी राहिल्या मुळे किल्ल्यावरचा मुक्काम अनुभवता आला नव्हता. पण या वेळी तो योग आला. 



सकाळी ८ च्या सुमारास कल्याण होऊन निघालो. घोटी पर्यंत घेतलेल्या स्पीड ला सिन्नर फाटा घेतल्या वर जरा ब्रेक लागतो. येथे रस्त्याचे काम चालू आहे. जिथे फाटा लागेल तिथे उजवी कडे वळावे (कळसुबाई प्रवेश द्वार सोडून), शेंडी गावाच्या सुरवातीला एम टी  डी सी चा राईट टर्न सोडून सरळ या. धरणाची भिंत संपल्यावर जो राईट टर्न येईल तो घ्यायचा. इथून १२ किमी वर रतन वाडी. साधारण ११.४५ पर्यंत पोहोचलो. गाडी अमृतेश्वर मंदिरा जवळ गाडी पार्क केली. आम्ही गाईड शी बोललो होतो -तुकाराम बांडे; पण आम्हाला उशीर झाल्या मुळे तुकाराम सांधण दरी त दुसऱ्या ग्रुप बरोबर पोहोचले होते. (सूचना: रतन वाडीत फोन रेंज ला प्रॉब्लेम आहे. जरा टेकडी वर गेल्या वर रेंज मिळेल). आम्हाला बाळू लोटे (९८५०६ ०६५४६) हे गाईड भेटले. चहा नाश्ता झाल्या वर साधारण १२.२० च्या सुमारास आम्ही गडा कडे कूच केले.

सुरवाती ला साधारण १-२ किमी पायवाट आहे जी शेतातून आणि नवीनच घातलेल्या बांधाच्या बाजूने जाते. त्यानंतर चढाई चालू. रतन गड चा प्रदेश पूर्णपणे दाट झाडीनि भरलेला आहे. त्यामुळे दुपारी देखील त्रास जाणवत नाही. अधे मधे ब्रेक घेत घेत आम्ही साधारण २ च्या सुमारास वाघतळे येथे पोहोचलो. (सूचना : येथे विश्रांती घ्यायला तसेच "टेन्ट" लावण्यास जागा आहे. इथे पोहोचल्यावर लिंबू सरबत-काकडी मिळू शकेल.) थोडे हायड्रेट झाल्यावर पुढील चढाई चालू केली. इथून पुढे साधारण अजून एक तास. २-३ टप्पे पार केल्या वर आम्ही शिडी जवळ पोहोचलो. वाटेत मिळेल तश्या काटक्या जमा केल्या सरपण म्हणून.


२ मुख्य शिड्या आहेत. त्या पैकी पहिली शिडी हि थोडी मोठी (साधारण २-३ मजले) पण रिलेटिव्हली सोपी आहे. दुसरी शिडी जरा ट्रिकी आहे . जिथे शिडी चालू होते त्या ठिकाणी फक्त थोडी काळजी घ्यावी लागते. कारण, शिडीच्या रेलिंग ला पकडून  शिडी ज्या ठिकाणी चालू होते तिथे वळून जावे लागते. डावीकडे शिडी आणि गडाची भिंत आणि उजवी कडे दरी. हे घेतलेलं सर्व सामान येथून चढवणे म्हणजे जिकरीचं काम. पण आमचे गाईड आणि सीझन्ड ट्रेकर्स यांच्या मुळे ते शक्य झाले. आयुष थोडा घाबरला होता. त्याला तारामती ला तो लहान असताना जिथे अडकला होता ते आठवलं. पण अभय - मनीष - अमोल यांनी मिळून त्याला धीर दिल्याने तो व्यवस्थित वर आला.

इथून वर आलं कि उजवी कडे गुहा आणि डावी कडे किल्ल्याचा परिसर. साधारण ३.३०-३.४५ पर्यंत आम्ही पोहोचलो.










डाव्या  हाताला आधी रत्नादेवीचे मंदिर (जे एका छोट्या गुहेत आहे) आणि त्यानंतर मोठी गुहा लागते. येथे वीकएंड ला गावातील एक जोडपे हॉटेल चालवते. गुहेतुन आपणास भंडारदरा धरणाच्या बॅक वॉटर्स चा विस्तीर्ण प्रदेश प्रदेश दिसतो. अगदी समोर खाली रतन वाडी गाव; डावी कडे कळसुबाई शिखर आणि त्याला लागून ए-एम-के.  उजवी कडे पाबरगड, भैरव गड,  घनचक्कर आणि कात्राबाई टॉप. गुहेतून हा सर्व निसर्ग एखाद्या कॅनव्हास सारखा सिनेमास्कोप सिनेमा वाटेल असा दिसतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गडावर फोन ला रेंज उत्तम; मग गडावर पोहोचलो हे कळवण्यासाठी साठी फोन रुपी तोफा धडाडल्या.

आता सर्वांना सॉलिड भूक लागली होती. सर्वांनी भाजी पोळी आणि इतर खाऊ वर ताव मारला.  वर येई पर्यंत बरोबर आणलेलं पाणी संपलेलं होतं. मग पाणी आणण्या साठी आणि गडा वर भ्रमंती करण्यासाठी आम्ही निघालो. साधारण १ तास झाला असेल. वर आल्यावर जो काही नजारा दिसतो दिसतो तो डोळ्यात भरणे अशक्य. इथे एका बुरुजावर आल्यावर कात्राबाई टॉप आणि घनचक्कर चा बॅकड्रॉप आहे. पूर्ण  कातळाचा कडा तो देखील अगदी काटकोनात म्हणजे खरा खुरा रौद्र सह्याद्री. निसर्ग आपल्याला ओढतो म्हणतात ना ते खरे वाटते. इथे आल्यावर मग आम्ही इथेच बराच वेळ घालवला फोटो सेशन करण्या मधे. आयुष चा डिएसेलार  निघाला मग काय सर्व तुटून पडले फोटो काढण्यासाठी. जवळ जवळ २० मिनिटे घालवल्यावर आम्हाला पाणी आणायचे  भान आले. हॉटेल मधील काकांनी सांगितल्या प्रमाणे पाण्याचे टाके सापडले. पाण्यावर थोडं शेवाळं होतं, गडावर असे  व्हायचेच. शेवाळं बाजूला करून अभय ने इथून एक बाटली पाणी भरलं; आणि प्यायलं. पाणी एकदम गोड. अजून एक बाटली भरताना लक्षात आले कि त्यात एक उंदीर मामा गतप्राण आणि डायसेक्शन झालेल्या अवस्थेत होते. मग आधी उंदीर बाहेर काढला आणि मग चर्चा सत्र रंगले. आता हे पाणी प्यायचे कि नाही का उकळून प्यायचे वगैरे वगैरे. पण आता आपण बघितल्यामुळे ते पाणी पिण्यास माझा विरोध होता. गडावर अजून पाणी असल्या मुळे आम्ही असं ठरवलं कि अजून पाणी शोधूया. म्हणून हॉटेल वाल्या काकांना विचारायला गेलो असता अजून एक टाकं सापडलं. मग  मंडळींना बोलावलं आणि पाणी भरून घेतलं. एव्हाना ५.३० झाले असतील. सूर्य अस्ताला आला होता. त्यामुळे गड परिक्रमा उद्या सकाळी करू असे ठरले. परत निघालो असता परत काका  भेटले आणि ते म्हणाले कि दुसरी कडे (दक्षीण) दिशेस जे टाकं आहे तेथे चांगले पाणी आहे म्हणून. मग परत त्या दिशे ला गेलो, लभान ५.४०-५.४५ झाले असतील. सूर्य अजून खाली आला होता. पुढे एका ठिकाणी गेल्या वर एकदम कड्यावरील पायवाट लागली-अगदी २ पावलं जातील एवढी जागा आणि डावीकडे ९० डिग्री फॉल आणि अंगावर येणारा निसर्ग. एक क्षण थांबलो. आम्ही बरेच पुढे येऊन पाणी काही नव्हतं. मग अभय आणि मनीष पुढे गेले. ६-६.१०  झाले होते. अजून ५ मिनटात पाणी सापडलं नाही तर परत या असं सांगितलं. झाला १५-२० मिनिटात ते परत आले; पाणी सापडलं नाही; आम्ही मघाच्या टाक्यावर भरलेलं पाणी होतं. अभय जरा खटटू झाला; पण गडाची पूर्ण माहिती नसल्यामुळे आणि सूर्यास्त झाल्यामुळे तसे सांगणे गरजेचे होते. असो.

गुहेत परत आल्यावर चहा झाला आणि मग जेवणाची तयारी चालू झाली. चूल पेटवण्यात बराच वेळ गेला. काही लाकडं ओली होती. अमोल ने मोठ्ठ पातेलं आणलं होतं. पाणी  तापवायला घेतलं. पाणी थोडं उकळल्यावर मनीष नि आणलेली रेडी मिक्स खिचडी त्यात शिजवण्यासाठी ओतली. आणि हो... अभय ने उंदीरमामा वालं पाणी पण प्यायलं...  एव्हाना निसर्गाने कूस बदलली होती. सूर्यनारायण विश्रांती ला जाऊन पृथ्वी चांदण्याची शाल पांघरायच्या तयारीत होती. समोरचे बॅकवॉटर्स दिसेनासे होऊन आता मिणमिण दिवे दिसायला लागले होते, जणू काही मुंग्यांची रांगच. डावीकडे  उंच शिखरावर दिसणारे दिवे कळसुबाई  शिखराची ओळख करून देत होते.

परत एकदा पाणी आणावं लागलं. 

एव्हाना खिचडी ऊन झाली होती. मनीष ने सांगितली होती खिचडी पण होता खरा मसाले भात. तमाल पत्र-काळीमिरी, दालचिनी इत्यादी जिन्नस असल्यामुळे मसाले भात एकदम फक्कड आणि स्पायसी झाला होता. सर्वानी आपापल्या ताटल्या काढल्या आणि मसाले भाता वर आडवा हात मारला. चुली वर शिजवलेल्या अन्नाची चव काही औरच.

रात्री गडावर जाऊन आकाश दर्शन करायचा प्रोग्राम ठरलेला होता. एव्हाना ११.००-११.३० झाले असतील. मग आम्ही सर्व जवळच मोकळ्याठिकाणी गेलो. चंद्रोदयाला वेळ होता, त्या मुळे आकाश खूपच सुंदर दिसत होते. नोव्हेबंर मधेच मोने सरां बरोबर आकाश दर्शन केल्यामुळे मृग, अँड्रोमेडा गॅलॅक्सि, आणि काही ओळखीचे ग्रह तारे दिसत होते. कातळावर झोपून आकाश पाहिल्या वर हे सर्व किती अजब आहे ह्याची प्रचिती येते. अँड्रोमेडा पृथ्वी पासून ८.९ अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे. किती ? ८.९ अब्ज  ???!!! खर्च अद्भुत आहे हे सर्व. हे सर्व पाहिल्यावर आपण किती क्षुद्र आहोत ह्याची जाणीव होते. मृग अगदी माथ्यावर दिसत होते. तीन तारे तिरक्या रेषेत, ह्या रेषेच्या आडव्या रेषेत अजून ३ तारे आणि ह्या सर्वांना सामावणारा एक समांतर चौकोन ही मृगाची ओळख. मग हिंदी सिनेमातला 'टूटता तारा' दिसतोय का ? ह्याची शोधाशोध झाली आणि एक 'टूटता तारा' दिसला पण. अजून थोड्या वेळाने परत गुहेत आलो. मग टॉर्च च्या झोतात  फोटो काढायचे अटेम्प्टस झाले.


















रात्री अजून १-२ ग्रुप्स पण मुक्कामी होते. गडाच्या वाटेवर काही बॅटर्यांचा प्रकाश दिसत होता.. म्हणजेच काही ग्रुप्स रात्री देखील चढाई करत होते.

स्लीपिंग बॅग्स बाहेर निघाल्या. घेतल्या नंतर २ वर्षांनी स्लीपिंग बॅगचा उपयोग होत होता. निजानीज चालू झाली मी आणि बापू आम्ही बाहेर म्हणजे मोठ्या गुहेत झोपलो आणि बाकीचे आतल्या छोट्या गुहेत. थंडी तशी विशेष नव्हती पण रात्र जशी बहरत होती तसा गार वारा चालू झाला. मी खरा अज्जीबात घोरत नाही तरी सर्वानी उगीच मला बदनाम केलं आहे ;-); अमित थोड्या वेळाने माझ्या घोरख्याना चा आनंद घेऊन आतल्या गुहेत झोपायला गेला. त्याच्या स्वागता साठी तिथे अनेक घोराखयाने त्याची वाट बघत होती.

अधून मधून जाग येत होती. जसा चंद्रोदय झाला तसे आकाश अजूनच सुंदर दिसू लागले. चंद्राच्या शीतल प्रकाशात धरणाचे बॅकवॉटर्स पण दिसत होते. अतीव सुंदर. हळू हळू पूर्वे कडून तांबडं फुटायला लागलं; तसा मी परत माथ्यावर गेलो. चंद्र आकाशात थोडा वर आला असेल, आणि कात्राबाईच्या मागून सूर्य नारायण धरणीस हॅलो करण्यास तयार होत होते. हे सर्व फोन कॅमेर्यात सामावून घेतले. गार वारा सुटला होता. परत गुहेत आलो आणि सर्वांना उठवले.

८.३० पर्यंत चहा घेऊन सर्व तयार झाले. पाण्याच्या बाटल्या, काही रिकाम्या आणि काही भरलेल्या घेऊन आम्ही निघालो. नाश्ता आम्ही थोडा वेळानी करायचं ठरवलं. माथ्यावर काही ग्रुप्स नि टेन्ट्स टाकलेले होते. आदल्या दिवशीची पायवाट घेऊन गड परिक्रमा चालू केली. डावी कडे बालेकिल्ला आणि उजवी कडे दरी अशी ही पायवाट. ही पायवाट अगदी गुहेच्या वरच्या बाजूस येत असल्याने गुहेतून दिसणारा प्रदेश इथून "पॅनारोमा झूम" सारखा वाटत होता. 

रतनगड किल्ला  साधारण `२००० वर्ष जुना आहे. पूर्व-पश्चिम पसरला असून उत्तर दिशेला भंडारदरा परिसर आणि दक्षिणेला ठाणे जिल्हा आहे. बालेकिल्ला साधारण अर्धा-एक किमी पसरलेला असेल. गडाच्या कड्यावरून पायवाट आहे. आणि या पायवाटेने गडावर पूर्ण प्रदक्षिणा घालता येते. तसेच गडाच्या शिखरावर एक 'नेढे' (सुई ला जसे छिद्र असते तसे) आहे. ह्या नेढ्यावर चढाई करून, गड परिक्रमे चा परतीचा प्रवास चालू होतो.
http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Ratangad-Trek-R-Alpha.html

आम्ही नेढ्याच्या पायथ्याशी साधारण ९ पर्यंत पोहोचलो असू. नेढे डावीकडे उंच शिखरावर आहे. आम्ही थोडं पुढे गेलो.  तिथे गडाचा मुख्य दरवाजा आहे. इथून खाली उतरायला उंच पायऱ्या आहेत आणि त्याच्या खाली शिडी. ही वाट खुट्टा सुळक्यास नेते. रात्री एक ग्रुप या वाटेने देखील वर आला होता. ही पायऱ्यांची वाट आणि मुख्य दरवाजा हे पूर्ण कातळात असल्याने इथे खूप थंड वाटत होते. येथील भाग अगदी उंच घळीत आहे. त्यामुळे येथे अगदी सांधण दरीत आल्या सारखा फील येतो. बरोबर असलेल्या एका ग्रुप ची त्याच विषया वरून थट्टा मस्करी चालू होती; 'हाच फोटो पोस्ट करू सांधण दरी करून आलो म्हणून सांगायला'. मनीष खाली शिडी पर्यंत उतरला, त्याच्या बरोबर अभय, अमोल. त्या नंतर अमित आणि मग मी उतरलो. आयुष, फोटो काढण्यासाठी वरच्या बाजूस थांबला. फोटो सेशन करण्यासाठी ही उत्तम जागा आहे. इथे बराच वेळ गेल्यावर आम्ही मुख्य दरवाज्यात नाश्त्याचा आनंद घेण्या साठी बसलो.

पराठे अजून सगळे शिल्लक होते. पोळी भाजी, पराठे आणि बरोबर आणलेले चिप्स वगैरे प्रकार भरून आम्ही मजबूत खाऊ आणलेला होता. मागल्या ट्रेक्स च्या आठवणी आणि इतर गप्पा मारण्यात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. साधारण १०.००-१०.३० झाले. इथून परत बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी येऊन, नेढ्यावर चढाई चालू केली. परतीचा प्रवास नेढे पार करून गडाच्या दक्षिण बाजू कडून होणार होता. इथून परतताना, काल आम्हाला पाण्याचे टाके जे सापडले नाही ते आता लागेल असा कयास बांधला. नेढ्यावर आल्यावर थांबलो. इथे सुस्साट सुस्साट वारा होता. आम्ही आलो त्या बाजूस भंडारदरा धरण प्रदेश आणि नेढे पार केले त्या ठिकाण होऊन पूर्ण ठाणे जिल्ह्याचा प्रदेश दिसत होता. फोटोसेशन साठी उत्तम जागा. थोडावेळ थांबून  इथून खाली उतरलो, वरून अगदी स्टीप असेल असे वाटत होते पण अगदीच सोपे होते. अजून थोडे पुढे आल्यावर उजवी कडे एक उंच पर्वत खुणावत होता. मग आमच्या 'मंझले हुए ट्रेकर्स' मध्ये एक चर्चा + डिबेट चालू झाली 'हा हरिशचंद्र गड आहे का ?' अभय आणि आयुष अगदी खंबीर होते कि हा हरिशचंद्रच आहे म्हणून. उंचावरील पठारी प्रदेश हा कोकण कडा आणि त्याच्या वर शिखर तारामती. अमोल कन्व्हिन्स्ड नव्हता. पुढे आयुष ने त्याच्या कडील जुने फोटो 'एव्हिडन्स' म्हणून काढले कि 'हाच तो' म्हणून. तरीही अमोल चे ठाम मत होते कि हा एकवेळ मागील बाजूने दिसणारा हरिशचंद्र असेल पण समोरील भाग हा कोकणकडा नक्कीच नाही. असो.. हे चालायचेच. नाही तर गम्मत ती काय.

पुढे आल्यावर पाण्याच्या ७-८ टाक्या लागल्या. हेच ते पाणी जे काल अभय आणि मनीष काल शोधत होते. काल ते जिथून परत फिरले ते ठिकाण इथून अगदीच जवळ होते. काल माझ्या कटकटी मुळे म्हणा किंवा त्यांनी फोटोसेशन मध्ये वेळ घालवला म्हणून म्हणा ते माघारी आले होते. एका कुंडातील पाणी एकदम स्वच्छ होतं. आमचे पाणीवाले बाबा अभय यांनी पाणी भरून दिलं. मग थंड गार आणि नितळ पाण्याचा आस्वाद घेऊन आणि पाणी भरून घेऊन आम्ही परत गुहे कडे निघालो. लगेचच अभय आणि मनीष नि केलेल्या फोटोसेशन ची तटबंदी लागली. इथून उजवीकडे दिसणारा निसर्ग म्हणजे अभय च्या भाषेत 'धिंगाणा' होता. उंचच उंच कातळाच्या पर्वत रांगा आणि त्यांच्या मुळे झालेल्या खोल दऱ्या आणि नदीचा प्रवाह. पुढे अगदी पाच मिनिटात आम्ही गुहेत पोहोचलो. तिथे परत हॉटेल वाल्या काकांना विचारलं "तो पर्वत कोणता ?" त्यांनी "आजोंबा" असे उत्तर दिल्यावर सुसं"वादा" वर पडदा पडला, अगदी काही वेळा पुरताच.










परत एकदा चहा झाला सामानाची बांधाबांध झाली. साधारण कालच्याच वेळी म्हणजेच १२.२० च्या सुमारास आम्ही आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. वाघातळे येथे थांबून जेवूयात असे ठरले. आयुष ला परत 'त्या'शिडी वरून उतरायचे थोडे टेन्शन होते. त्याने अभय ला "हि बॅग पण मीच घेऊन उतरू ना?" असे विचारल्यावर त्या वर शिक्कामोर्तब झाले. मग अभय आणि मनीष नि त्याला रेस्क्यू देत तो शिड्या उतरला. आम्ही जसे चढलो त्याच पोझिशन मध्ये रिव्हर्स उतरलो. सामान बरेच होते. आम्ही काही सामान इलॅस्टिक आणि दोऱ्यांच्या मदतीने उतरवले. १५-२० मिनिटात सगळे उतरलो.

पुढचा प्रवास चालू झाल्यावर, वर काल खाली येणाऱ्या लोकांची जागा आम्ही घेत, 'आता थोडाच वेळ अगदी १० मिन्टच' असा वर येणाऱ्यांना बूस्ट देत होतो. साधारण एक १.३० च्या सुमारास वाघतळे येथे पोहोचलो. खांद्यावरचे सामान आणि सॅक उतरल्या. अभय, अमोल आणि मनीष कडे मजबूत सामान होते. आडवे झालो. लिंबू सरबत, काकड्या हे हायड्रेशन झाले. मग डबे उघडले. अर्ध्या पाऊण तासाने पुढील प्रवास सुरु. याच ठिकाणून एक रस्ता/पायवाट हरिश्चंद्र कडे आणि एक सांधण दारी कडे जाते. आम्ही रतनवाडी च्या दिशेने प्रवास चालू केला. १-२ ब्रेक्स घेत पायथ्या पाशी ३ परतत पोहोचलो असू. एव्हाना ऊन वाढलं होतं. पुढे आल्यावर एक 'दोराहा' लागला. इथपर्यंत काल आम्हाला गाईडने एका शॉर्ट कट ने आणलं होतं. आम्ही आलो त्याच रस्त्याने जायचं ठरवलं. इथून उंच बघितल्यावर डोंगरावर उंच ठिकाणी आणि कडे कपारीत गुरं चरताना दिसत होती. पाय सरकायची भीती आपल्याला.. त्यांना काय रोजचीच सवय. 

पुढे आल्यावर १-२ मिनी चकवे लागले. आणि थोडं पुढे आल्यावर बांधाचा प्रदेश लागला, इथून पुढे वाट चुकायचा काही प्रश्नच नव्हता. एके ठिकाणी पाणी उथळ होते...  तिथे मनसोक्त स्नान झाले. थंड गार पाणी अंगावर घेतल्यावर एकदम शीण कुठल्या कुठे पळून गेला. एकदा फ्रेश झाल्यावर परत घामट कपडे घालणं मला जीवावर आलं. मग टी-शर्ट, पंचा आणि शूज ह्या वेशात पुढील प्रवास सुरु झाला. काल आम्ही येत असताना जेसीबी नि खोदलेल्या रांगेलगत चालत आम्ही येत होतो.. आता पर्यंत ती रांग बुजवण्यात आली होती. बांधा पर्यंत पाईपलाईन नेण्यासाठी केलेला खड्डा होता. अगदी १० मिनिटात प्रवास जिथून चालू केला तिथे पोहोचलो.

पुढे अमृतेश्वराचे दर्शन घेण्यास गेलो. अमृतेशवराचे (शंकराचे) हे देऊळ पांडवकालीन आणि हेमाडपंथी आहे. कोरीवकामावर काळाच्या ओघाने झालेल्या जखमा स्पष्ट दिसत होत्या. सभा मंडपात आल्यावर खिद्रापूर (कोल्हापूर-सांगली जवळील)  च्या मंदिरात आल्यासारखं वाटलं. साधारण तसेच खांब आणि सभा मंडप. कातळातील काम असल्याने इथे एकदम थंड वाटत होतं. अमृतेशवराचे दर्शन घेतले. गाभाऱ्यात "कार" लावला. परत गाडीपाशी आलो. अभय ने सामान घट्ट बांधून घेतले. चहा झाला आणि ५.३० च्या सुमारास परतीचा प्रवास चालू केला. लवकर आलो असतो तर आम्ही सांधण दरीत जाण्याचा विचार केला होता पण ते आता शक्य नव्हते. आम्ही आलो त्या मार्गानेच शेंडी गावा कडून निघालो. (वेळ असल्यास गाडीने हे पूर्ण सर्किट करता येते, येतांना शेंडी गावच्या आधी एमटीडीसी रिसॉर्ट जवळ उजवीकडे वळायचं. मग कळसुबाई, ए-एम-के, घाटघर धरण यांचे साईट सीइंग करत आपण रतन वाडीत येतो. साधारण एक ५० किमी चा फेर फटका आहे.).

धरणाच्या बॅकवॉटर्स ला प्रदक्षिणा घालत आम्ही शेंडी मार्गे परतीच्या प्रवासास निघालो. काल येताना ओळखू न येणारा रतनगड आता दुरून पण ओळखू येणाऱ्या मित्रा सारखा दिसत होता. तुम्ही येताना लक्षात ठेवा... शेंडी होऊन पुढे आलं कि उजवीकडे दूर विस्तीर्ण पसरलेला घाटमाथा, खाली दाट झाडी, उजवीकडे शिखरावर नेढे आणि त्याचा बाजूला (खुट्टा) सुळका दिसलं कि समजावं.. हा रतनगडच.   

गडावर मुक्काम करायचा माझा हा पहिलाच योग होता आणि अगदी अविस्मरणीय. सूर्यनारायण आता रतनगडाच्या मागून विश्रांतीच्या तयारीस लागले होते.. तसे आम्ही मोबाईल आणि डीएसेलार मधील फोटो पाहत परत ट्रेक नजरेत भरून घ्यायचा प्रयत्न करत होतो. हळू हळू किल्ला दिसेनासा झाला पण मनात रुजलेला होता अगदी एखाद्या आवडलेल्या ब्लॉकबस्टर सिनेमा प्रमाणे. 







Sunday, January 29, 2017

तुंग तिकोना

तुंग तिकोना 14-15 डिसेंबर 2013

जुनी एफबी वरील पोस्ट शेअर करत आहे

पहिल्यांदाच काही तरी लिहायला घेतोय... कंपल्सरी आराम म्हणून जमलं... सांभाळून घ्या. ट्रेक करायची खूप दिवसांपातूर इच्छा होती. अभय-कौस्तुभ प्रत्येक वेळी इन्वाइट करायचे पण मला आधी जमलं नाही. पण गेल्या वर्षी मी ठरवलं होतं की जेंव्हा तुंग-तिकोना कराल त्यावेळी मी येणारच. ठरलं एकदाचं..कारण पण तसच होतं..

पहीला ट्रेक तुंग-तिकोना केला 14-15 डिसेंबर 2013. मी, अभय, कौस्तुभ, बापू आणि खली दी ग्रेट..मजा आली..सुरवातीला 10-15 मिनिटानी धाप लागली पण नंतर काही इश्यू नाही आला... कल्याण हून 5-5.30 ला निघून आम्ही 8.30 पर्यंत तिकोना वाडी ला पोहोचलो.

तिकोना किल्ला हा खर्या खुर्‍या मावाळातला.. दोन रस्ते आहेत मुंबई हून जातांना. एक तर तुम्ही लोणावळ्यातून जाउ शकाता किंवा एक्सप्रेस वे हून लोणावळ्याचा सेकेंड एकझिट घेऊन जुना हायवे घ्यायचा आणि कामशेत नंतर उजवि कडे वळायचं.. आम्ही दुसरा रस्ता घेतला. मग रस्त्यात... लोहगड..विसपूर..विंचू काटा.. असे किल्ले बघत बघत आपण पुढे जातो.. काळे कॉलोनी (पवना नगर) पार झाले कि पुढे डावी कडे वळायाचं...मग लांबून आपल्याला तिकोना आणि तुंग दिसायला लागतात.. पवना धरणाच्या विसर्गा वरुन पुढे आलो कि घाट लागतो.. आणि मग खूप ऊंचं ठिकाणी आपण पोहोचतो.. डावी कडे तिकोना आणि त्याच्या विरुद्ध दिशेला तुंग आणि दोघांच्या मध्ये पवना धरणाचं विस्तिर्ण बॅक वॉटर..
घाट संपल्या वर लगेचच आपण तिकोना वाडीच्या कमानी पाशी येतो. तिथे डावी कडे वळून एक-दीड किमी पुढे आलो कि तिथे गाडी पार्क करायला जागा आहे.. अगदी सेफ.. तिथ पासून गडा वर पोहोचायला जास्तीत जास्त पाउण एक तास..वर पोहोचताना पवना धरणाचा विस्तीर्ण पाणी साठा.. आणि त्याच्या मधोमध तुंग.. नव्हे उत्तुंग !!! तसेच माथ्या वरुन संपूर्ण मावळ परिसर दिसतो..
गडा वर विशेष असं काही नाही. एक शंकराचं मंदीर आणि पाण्याचं टाकं. आम्ही देवळात ॐकार लावला.. मी तर पहिल्यांदाच... अगदी प्रसन्न वाटलं.. मग जेवणाचे डबे उघडले.. बटाट्याच्या काच्र्या.. ठेपले.. पोळ्या.. सगळ्यांना भुका लागल्या होत्या.. अगदी आडवा हात मारला.. मग थोडे आडवे पडलो.. आणि थोड्या वेळाने पाण्याच्या टाक्या जवळ आलो.. जिवंत झर्याचं थंड गार आणि अगदी गोड पाणी.. लाजवाब... आणि पाण्याच्या टाक्या जवळ जे काही गार वाटत होतं... बासच... वाटत होतं इथेच झोपावं. तिथे थोडा वेळ घालवला आणि मग उतरणी ला लागलो.. अर्ध्या तासात उतरलो असु.. मग वाटेत.. कोळ्वण ला जातांना काही चांगले स्पॉट्स लागले (पवना बॅक वॉटर्स).. तिथे जरा फोटो सेशन करून पुढे निघालो.. 
अभय ला किल्ल्या वर मुक्काम करायची खूप इच्छा होती पण मला त्यांना कोळवण ला प्रीतम (माझी बेटर हाफ) च्या घरी न्यायचं होतं. किल्ला छोटा असल्याने आणि आमच्या कडे बराच वेळ असल्याने आम्ही घरी मुक्काम करायचा ठरवलं..
साडे चार पर्यंत पोहोचलो असु कोळ्वण ला.

तिथे सावित्री काकू ने अगदी जावई ट्रीटमेंट दिली.. त्यामुळे अभय ची स्वयंपाक करायची इच्छा पूर्ण नाही झाली.. 

मग लिस्ट मध्ये असल्या प्रमाणे शिधा घेतला.. आणि घरी पोहोचलो.. चहा प्यालो.. शेतावर चक्कर मारली आणि घरी आलो.. तो पर्यन्य स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती... चुलीवरील भात आणि खरपूस तांदळाची भाकरी.. क्या बात है !!! चुली च्या धूरा मुळे सर्वांचे डोळे एकदम स्वच्छ झाले.. सगळा धूर घरात येत होता.. त्यात अभय ची अवस्था तर खूपच खराब झाली होती.. तो पूर्ण वेळ गंगा जमूना झाला होता.. असो..मला रेडियो फार आवडतो.. विशेष करून गावा कडे आल्या वर ऐकायला खूप छान वाटतं.. पुण्याचं १०१ एफ. एम. चालू होतं.. बॅकग्राउंड म्यूज़िक म्हणून बरं वाटतं.. मधूनच बातम्या मधूनच.. मराठी हिंदी गाणी.. सुरेख... आणि मुख्य म्हणजे.. मोबाईल ला रेंज नव्हती..एकही काडी नाही.. आजच्या दिवसात ही म्हणजे पर्वणी च म्हणायला हवी.

इथे सावित्री काकू ने अगदी जावई ट्रीटमेंट दिली.. त्यामुळे अभय ची स्वयंपाक करायची इच्छा पूर्ण नाही झाली.. 

जेवण झाल्या वर खरी धमाल आली.. कडक थंडी होती. टेंपरेचर ८-९ सेल्शिअस असेल.. शेकोटी करायचे अथक प्रयत्न झाले.. पण उपयोग काहीही नाही.. फक्त धूर... बापू ने खूप मेहनत घेतली होती..मग काही होत नाही असं बघून सर्व जण घरात आले.. रॉकेल चा कंदील होता (लाल्टेन).. तो हातात घेऊन (अर्थात ट्यूब लाइट बंद असताना) जरा हॉरर मूवी चा माहोल क्रियेट केला.. आणि सर्वांनी फोटो काढले.. त्यात कौस्तुभ आणि आमच्या खलि चे फोटो तर १ नंबर आले.. अंगात स्वेटर.. हातात ग्लव्स, स्कल कॅप, आणि ब्लांकेट सगळे टोटल फनी दिसत होते..





















११ वाजे पर्यंत सर्व जण झोपलो.. सकाळी उठून गावात एक चक्कर मारली.. दूध वगैरे आणले.. सावित्री काकू ने पोहे केले होते... ते खाऊन आम्ही ८.३०-९.०० पर्यंत तुंग कडे निघालो...

पुण्याहून तुंग कडे जायचं असेल तर.. शिळीम नंतर डावी कडे वळायाचे.. (कामशेत कडून जायचं असेल तर उजवी कडे).. बराच गावा गावा तून ऊंच सखल रस्ता जातो.. ह्या पूर्ण रस्त्यात आपण अनेक वेळा घाट चढतो आणि उतरतो..हिल्टन ची शिळीम इस्टेट क्रॉस झाली की थोड्या वेळाने एक फाटा येतो.. तो रस्ता लोणावळा... आय. एन. एस. शिवाजी.. अँबी वॅली करत येतो.. (मुंबई हून तुंग ला यायचे असेल तर).. त्या फाट्याला उजवी कडे वळाले (मुंबई हून येताना डावी कडे) की जरा वेळाने तुंग कडे जायचा रस्ता लागतो... डावीकडे एक लहानसं देऊळ आहे.. तिथे गाड्या पार्क करता येतात..डावी कडे ना वळाता सरळ गेलं की महिंद्रा हॉलिडेज चं तुंगी रेसोर्ट लागतं.. ते लॅंडमार्क म्हणून समजावं..

तुंग हा खरोखरच उत्तुंग आहे.. आपलं नाव तो सार्थ ठरवतो.. अगदी सरळ सोट दिसतो.. म्हणजेच.. मुरलेल्या ट्रेकर ला कळेल की ट्रॅवर्स चा रूट खूप आहे.. तुंग हा तर खरा टेहेळणी बुरूज होता.. किल्ला नव्हेच तो.. वर खूप ट्रॅवर्स आणि अगदीच अरुंद पायवाट आहे.. एका वेळी एकच माणूस पास होईल इतका..बिगिनर असल्या मुळे ठरवलं होतं की जिथे कॉन्फिडेन्स येणार नाही तिथे आगाऊ पणा नाही करायचा... सरळ थांबायचं. पण जमलं.. तुंग ला एका ठिकाणी एक कर्व होता.. मी आधी पुढे गेलो पण सारखा विचार करत होतो की येताना आपली अवस्था इथे खराब होणार.. तितक्यात मागून अमित (उर्फ जावई 'बापू' अभय चा जिजू) ने आवाज दिला.. की तो थांबतोय म्हणून.. त्याची पण माझ्या सारखीच अवस्था झाली होती... तो थांबला म्हणाल्या वर मी पण चान्स मारला आणि अभय ला म्हणालो मी पण थांबतो इथे.. त्याच्या बरोबर कोणी तरी पाहिजे ना.. झालं.. मग अभय कौस्तुभ आणि खलि उर्फ अमोल रानडे पुढे गेले आणि गड सर करून आले. ते आल्या वर आम्ही जेवलो आणि थोड्या वेळात उतरायला चालू केलं.

कल्याण ला परत जाताना आँबी वॅली करून पुढे आलो... पुढे आल्या वर लायन हेड पॉइण्ट लागला... इथून पण खूप छान व्यू आहे... अगदी इथे येई पर्यंत उत्तुंग आपल्याला दिसत रहातो.. समोरच्या दिशेला...लोणावळा.. खंडाळा... ड्युक्स नोज... वळ्वण डॅम आणि काही उंच सुळके बॅकड्रॉप ला आहेत... आपल्याला ते बघितल्या वर लक्षात येतं की हे लोकेशन बर्‍याच हिंदी सिनेमा मध्ये आपण बघितलेले आहे... बरेच जण सन सेट पाहायला इथ वर येतात.. अगदी पुण्या-मुंबई हून.. त्यामुळे ही चौपाटी च आहे म्हणा ना..
इथे फोटो सेशन करून चहा वगैरे पिऊन पुढे निघालो... अभय आणि (चक्क) बापू देखील (फॉर ओबवियस रिजन्स) एका स्पॉट वर अडकले होते...

ते आटोपून...५.००-५.१५ पर्यंत परती च्या प्रवासाला निघालो... ८.३०-९.०० पर्यंत कल्याण ला (हिशोब करून ) पोहोचलो... वाटेत येताना... पुढची मोहीम कुठे आखायची ह्याची चर्चा चालू होती.. बघुयात पुढची चढाई कुठे केली ते.