Friday, January 27, 2017

रतनगड : "एक ब्लॉकबस्टर ट्रेक" : भाग ३

रतनगड : "एक ब्लॉकबस्टर ट्रेक"
भाग ३

८.३० पर्यंत चहा घेऊन सर्व तयार झाले. पाण्याच्या बाटल्या, काही रिकाम्या आणि काही भरलेल्या घेऊन आम्ही निघालो. नाश्ता आम्ही थोडा वेळानी करायचं ठरवलं. माथ्यावर काही ग्रुप्स नि टेन्ट्स टाकलेले होते. आदल्या दिवशीची पायवाट घेऊन गड परिक्रमा चालू केली. डावी कडे बालेकिल्ला आणि उजवी कडे दरी अशी ही पायवाट. ही पायवाट अगदी गुहेच्या वरच्या बाजूस येत असल्याने गुहेतून दिसणारा प्रदेश इथून "पॅनारोमा झूम" सारखा वाटत होता.

रतनगड किल्ला  साधारण `२००० वर्ष जुना आहे. पूर्व-पश्चिम पसरला असून उत्तर दिशेला भंडारदरा परिसर आणि दक्षिणेला ठाणे जिल्हा आहे. बालेकिल्ला साधारण अर्धा-एक किमी पसरलेला असेल. गडाच्या कड्यावरून पायवाट आहे. आणि या पायवाटेने गडावर पूर्ण प्रदक्षिणा घालता येते. तसेच गडाच्या शिखरावर एक 'नेढे' (सुई ला जसे छिद्र असते तसे) आहे. ह्या नेढ्यावर चढाई करून, गड परिक्रमे चा परतीचा प्रवास चालू होतो.
http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Ratangad-Trek-R-Alpha.html

आम्ही नेढ्याच्या पायथ्याशी साधारण ९ पर्यंत पोहोचलो असू. नेढे डावीकडे उंच शिखरावर आहे. आम्ही थोडं पुढे गेलो.  तिथे गडाचा मुख्य दरवाजा आहे. इथून खाली उतरायला उंच पायऱ्या आहेत आणि त्याच्या खाली शिडी. ही वाट खुट्टा सुळक्यास नेते. रात्री एक ग्रुप या वाटेने देखील वर आला होता. ही पायऱ्यांची वाट आणि मुख्य दरवाजा हे पूर्ण कातळात असल्याने इथे खूप थंड वाटत होते. येथील भाग अगदी उंच घळीत आहे. त्यामुळे येथे अगदी सांधण दरीत आल्या सारखा फील येतो. बरोबर असलेल्या एका ग्रुप ची त्याच विषया वरून थट्टा मस्करी चालू होती; 'हाच फोटो पोस्ट करू सांधण दरी करून आलो म्हणून सांगायला'. मनीष खाली शिडी पर्यंत उतरला, त्याच्या बरोबर अभय, अमोल. त्या नंतर अमित आणि मग मी उतरलो. आयुष, फोटो काढण्यासाठी वरच्या बाजूस थांबला. फोटो सेशन करण्यासाठी ही उत्तम जागा आहे. इथे बराच वेळ गेल्यावर आम्ही मुख्य दरवाज्यात नाश्त्याचा आनंद घेण्या साठी बसलो.

पराठे अजून सगळे शिल्लक होते. पोळी भाजी, पराठे आणि बरोबर आणलेले चिप्स वगैरे प्रकार भरून आम्ही मजबूत खाऊ आणलेला होता. मागल्या ट्रेक्स च्या आठवणी आणि इतर गप्पा मारण्यात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. साधारण १०.००-१०.३० झाले. इथून परत बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी येऊन, नेढ्यावर चढाई चालू केली. परतीचा प्रवास नेढे पार करून गडाच्या दक्षिण बाजू कडून होणार होता. इथून परतताना, काल आम्हाला पाण्याचे टाके जे सापडले नाही ते आता लागेल असा कयास बांधला. नेढ्यावर आल्यावर थांबलो. इथे सुस्साट सुस्साट वारा होता. आम्ही आलो त्या बाजूस भंडारदरा धरण प्रदेश आणि नेढे पार केले त्या ठिकाण होऊन पूर्ण ठाणे जिल्ह्याचा प्रदेश दिसत होता. फोटोसेशन साठी उत्तम जागा. थोडावेळ थांबून  इथून खाली उतरलो, वरून अगदी स्टीप असेल असे वाटत होते पण अगदीच सोपे होते. अजून थोडे पुढे आल्यावर उजवी कडे एक उंच पर्वत खुणावत होता. मग आमच्या 'मंझले हुए ट्रेकर्स' मध्ये एक चर्चा + डिबेट चालू झाली 'हा हरिशचंद्र गड आहे का ?' अभय आणि आयुष अगदी खंबीर होते कि हा हरिशचंद्रच आहे म्हणून. उंचावरील पठारी प्रदेश हा कोकण कडा आणि त्याच्या वर शिखर तारामती. अमोल कन्व्हिन्स्ड नव्हता. पुढे आयुष ने त्याच्या कडील जुने फोटो 'एव्हिडन्स' म्हणून काढले कि 'हाच तो' म्हणून. तरीही अमोल चे ठाम मत होते कि हा एकवेळ मागील बाजूने दिसणारा हरिशचंद्र असेल पण समोरील भाग हा कोकणकडा नक्कीच नाही. असो.. हे चालायचेच. नाही तर गम्मत ती काय.

पुढे आल्यावर पाण्याच्या ७-८ टाक्या लागल्या. हेच ते पाणी जे काल अभय आणि मनीष काल शोधत होते. काल ते जिथून परत फिरले ते ठिकाण इथून अगदीच जवळ होते. काल माझ्या कटकटी मुळे म्हणा किंवा त्यांनी फोटोसेशन मध्ये वेळ घालवला म्हणून म्हणा ते माघारी आले होते. एका कुंडातील पाणी एकदम स्वच्छ होतं. आमचे पाणीवाले बाबा अभय यांनी पाणी भरून दिलं. मग थंड गार आणि नितळ पाण्याचा आस्वाद घेऊन आणि पाणी भरून घेऊन आम्ही परत गुहे कडे निघालो. लगेचच अभय आणि मनीष नि केलेल्या फोटोसेशन ची तटबंदी लागली. इथून उजवीकडे दिसणारा निसर्ग म्हणजे अभय च्या भाषेत 'धिंगाणा' होता. उंचच उंच कातळाच्या पर्वत रांगा आणि त्यांच्या मुळे झालेल्या खोल दऱ्या आणि नदीचा प्रवाह. पुढे अगदी पाच मिनिटात आम्ही गुहेत पोहोचलो. तिथे परत हॉटेल वाल्या काकांना विचारलं "तो पर्वत कोणता ?" त्यांनी "आजोंबा" असे उत्तर दिल्यावर सुसं"वादा" वर पडदा पडला, अगदी काही वेळा पुरताच.










परत एकदा चहा झाला सामानाची बांधाबांध झाली. साधारण कालच्याच वेळी म्हणजेच १२.२० च्या सुमारास आम्ही आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. वाघातळे येथे थांबून जेवूयात असे ठरले. आयुष ला परत 'त्या'शिडी वरून उतरायचे थोडे टेन्शन होते. त्याने अभय ला "हि बॅग पण मीच घेऊन उतरू ना?" असे विचारल्यावर त्या वर शिक्कामोर्तब झाले. मग अभय आणि मनीष नि त्याला रेस्क्यू देत तो शिड्या उतरला. आम्ही जसे चढलो त्याच पोझिशन मध्ये रिव्हर्स उतरलो. सामान बरेच होते. आम्ही काही सामान इलॅस्टिक आणि दोऱ्यांच्या मदतीने उतरवले. १५-२० मिनिटात सगळे उतरलो.

पुढचा प्रवास चालू झाल्यावर, वर काल खाली येणाऱ्या लोकांची जागा आम्ही घेत, 'आता थोडाच वेळ अगदी १० मिन्टच' असा वर येणाऱ्यांना बूस्ट देत होतो. साधारण एक १.३० च्या सुमारास वाघतळे येथे पोहोचलो. खांद्यावरचे सामान आणि सॅक उतरल्या. अभय, अमोल आणि मनीष कडे मजबूत सामान होते. आडवे झालो. लिंबू सरबत, काकड्या हे हायड्रेशन झाले. मग डबे उघडले. अर्ध्या पाऊण तासाने पुढील प्रवास सुरु. याच ठिकाणून एक रस्ता/पायवाट हरिश्चंद्र कडे आणि एक सांधण दारी कडे जाते. आम्ही रतनवाडी च्या दिशेने प्रवास चालू केला. १-२ ब्रेक्स घेत पायथ्या पाशी ३ परतत पोहोचलो असू. एव्हाना ऊन वाढलं होतं. पुढे आल्यावर एक 'दोराहा' लागला. इथपर्यंत काल आम्हाला गाईडने एका शॉर्ट कट ने आणलं होतं. आम्ही आलो त्याच रस्त्याने जायचं ठरवलं. इथून उंच बघितल्यावर डोंगरावर उंच ठिकाणी आणि कडे कपारीत गुरं चरताना दिसत होती. पाय सरकायची भीती आपल्याला.. त्यांना काय रोजचीच सवय.

पुढे आल्यावर १-२ मिनी चकवे लागले. आणि थोडं पुढे आल्यावर बांधाचा प्रदेश लागला, इथून पुढे वाट चुकायचा काही प्रश्नच नव्हता. एके ठिकाणी पाणी उथळ होते...  तिथे मनसोक्त स्नान झाले. थंड गार पाणी अंगावर घेतल्यावर एकदम शीण कुठल्या कुठे पळून गेला. एकदा फ्रेश झाल्यावर परत घामट कपडे घालणं मला जीवावर आलं. मग टी-शर्ट, पंचा आणि शूज ह्या वेशात पुढील प्रवास सुरु झाला. काल आम्ही येत असताना जेसीबी नि खोदलेल्या रांगेलगत चालत आम्ही येत होतो.. आता पर्यंत ती रांग बुजवण्यात आली होती. बांधा पर्यंत पाईपलाईन नेण्यासाठी केलेला खड्डा होता. अगदी १० मिनिटात प्रवास जिथून चालू केला तिथे पोहोचलो.

पुढे अमृतेश्वराचे दर्शन घेण्यास गेलो. अमृतेशवराचे (शंकराचे) हे देऊळ पांडवकालीन आणि हेमाडपंथी आहे. कोरीवकामावर काळाच्या ओघाने झालेल्या जखमा स्पष्ट दिसत होत्या. सभा मंडपात आल्यावर खिद्रापूर (कोल्हापूर-सांगली जवळील)  च्या मंदिरात आल्यासारखं वाटलं. साधारण तसेच खांब आणि सभा मंडप. कातळातील काम असल्याने इथे एकदम थंड वाटत होतं. अमृतेशवराचे दर्शन घेतले. गाभाऱ्यात "कार" लावला. परत गाडीपाशी आलो. अभय ने सामान घट्ट बांधून घेतले. चहा झाला आणि ५.३० च्या सुमारास परतीचा प्रवास चालू केला. लवकर आलो असतो तर आम्ही सांधण दरीत जाण्याचा विचार केला होता पण ते आता शक्य नव्हते. आम्ही आलो त्या मार्गानेच शेंडी गावा कडून निघालो. (वेळ असल्यास गाडीने हे पूर्ण सर्किट करता येते, येतांना शेंडी गावच्या आधी एमटीडीसी रिसॉर्ट जवळ उजवीकडे वळायचं. मग कळसुबाई, ए-एम-के, घाटघर धरण यांचे साईट सीइंग करत आपण रतन वाडीत येतो. साधारण एक ५० किमी चा फेर फटका आहे.).

धरणाच्या बॅकवॉटर्स ला प्रदक्षिणा घालत आम्ही शेंडी मार्गे परतीच्या प्रवासास निघालो. काल येताना ओळखू न येणारा रतनगड आता दुरून पण ओळखू येणाऱ्या मित्रा सारखा दिसत होता. तुम्ही येताना लक्षात ठेवा... शेंडी होऊन पुढे आलं कि उजवीकडे दूर विस्तीर्ण पसरलेला घाटमाथा, खाली दाट झाडी, उजवीकडे शिखरावर नेढे आणि त्याचा बाजूला (खुट्टा) सुळका दिसलं कि समजावं.. हा रतनगडच.  

गडावर मुक्काम करायचा माझा हा पहिलाच योग होता आणि अगदी अविस्मरणीय. सूर्यनारायण आता रतनगडाच्या मागून विश्रांतीच्या तयारीस लागले होते.. तसे आम्ही मोबाईल आणि डीएसेलार मधील फोटो पाहत परत ट्रेक नजरेत भरून घ्यायचा प्रयत्न करत होतो. हळू हळू किल्ला दिसेनासा झाला पण मनात रुजलेला होता अगदी एखाद्या आवडलेल्या ब्लॉकबस्टर सिनेमा प्रमाणे.



(समाप्त)

No comments:

Post a Comment