Monday, January 23, 2017

रतनगड : "एक ब्लॉकबस्टर ट्रेक" भाग : १

रतनगड : "एक ब्लॉकबस्टर ट्रेक" 
भाग : १


नाव थोडं वेगळं वाटलं ना... तसं विशेषच कारण आहे. जसं एखाद्या सिनेमा ला हिट होण्या साठी एक फॉर्म्युला असतो ... इमोशन, कॉमेडी, ड्रामा वगैरे वगैरे; तसेच एखादा ट्रेक हिट होण्या साठी जे काही असणे गरजेचे आहे ते सर्व रतनगड ट्रेक मध्ये आहे. कल्याण पासून साधारण १४० कि.मी. अंतरावर भंडारदरा धरणाच्या परिसरातील डोंगर रांगांतील एक. भंडारदरा परिसर म्हणजे ट्रेकर च्या गळ्यातील ताईत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अहो खरोचरच.. आपण नेकलेस म्हणूया. सुरवातीला कळसुबाई, मग ए. एम. के. अर्थात अलंग -  मदन - कुलंग, त्यानंतर सांधण दरी; मधोमध रतन गड आणि त्याच्या बाजूस आजोबा, कात्राबाई, पाबर गड, घनचक्कर आणि भैरव गड. तसेच इथून एक रस्ता ट्रेकर्स चे दैवत हरिशचंद्र गड येथे हि जातो.

असो... तर तारीख ठरली जानेवारी २१-२२, २०१७. मेम्बर्स ६. अभय (खरखर), अमोल (खली). मनीष (बच्चा), आयुष (बाबी), अमित (बापू) आणि मी. गाडी एर्टिगा. रात्रीच्या जेवणाचा शिधा (रेडी टू मेक) मसाले भात मनीष नि घरून करून आणला होता. स्वंयपाक कारायचा असल्या मुळे तेल, भांडी, ताटल्या, पातेली हे सर्व सामान देखील होते. पोळी-भाजी, पराठे, चटणी, लोणचे हे सर्व देखील. तसेच मुक्कामी असल्या मुळे मॅट्स, स्लीपिंग बॅग्स इ. सामान देखील होते. हे सर्व सामान आमचे सीझन्ड ट्रेकर्स अभय, मनीष आणि अमोल यांच्या कडे. तुम्ही कल्पना करू शकता कि सामान किती वाढले असेल. पण हाच तर फरक आहे पिकनिक आणि ट्रेक मध्ये. तुंग तिकोना च्या वेळी आम्ही कोळवण ला घरी राहिल्या मुळे किल्ल्यावरचा मुक्काम अनुभवता आला नव्हता. पण या वेळी तो योग आला.


सकाळी ८ च्या सुमारास कल्याण होऊन निघालो. घोटी पर्यंत घेतलेल्या स्पीड ला सिन्नर फाटा घेतल्या वर जरा ब्रेक लागतो. येथे रस्त्याचे काम चालू आहे. जिथे फाटा लागेल तिथे उजवी कडे वळावे (कळसुबाई प्रवेश द्वार सोडून), शेंडी गावाच्या सुरवातीला एम टी  डी सी चा राईट टर्न सोडून सरळ या. धरणाची भिंत संपल्यावर जो राईट टर्न येईल तो घ्यायचा. इथून १२ किमी वर रतन वाडी. साधारण ११.४५ पर्यंत पोहोचलो. गाडी अमृतेश्वर मंदिरा जवळ गाडी पार्क केली. आम्ही गाईड शी बोललो होतो -तुकाराम बांडे; पण आम्हाला उशीर झाल्या मुळे तुकाराम सांधण दरी त दुसऱ्या ग्रुप बरोबर पोहोचले होते. (सूचना: रतन वाडीत फोन रेंज ला प्रॉब्लेम आहे. जरा टेकडी वर गेल्या वर रेंज मिळेल). आम्हाला बाळू लोटे (९८५०६ ०६५४६) हे गाईड भेटले. चहा नाश्ता झाल्या वर साधारण १२.२० च्या सुमारास आम्ही गडा कडे कूच केले.

Add caption
सुरवाती ला साधारण १-२ किमी पायवाट आहे जी शेतातून आणि नवीनच घातलेल्या बांधाच्या बाजूने जाते. त्यानंतर चढाई चालू. रतन गड चा प्रदेश पूर्णपणे दाट झाडीनि भरलेला आहे. त्यामुळे दुपारी देखील त्रास जाणवत नाही. अधे मधे ब्रेक घेत घेत आम्ही साधारण २ च्या सुमारास वाघतळे येथे पोहोचलो. (सूचना : येथे विश्रांती घ्यायला तसेच "टेन्ट" लावण्यास जागा आहे. इथे पोहोचल्यावर लिंबू सरबत-काकडी मिळू शकेल.) थोडे हायड्रेट झाल्यावर पुढील चढाई चालू केली. इथून पुढे साधारण अजून एक तास. २-३ टप्पे पार केल्या वर आम्ही शिडी जवळ पोहोचलो. वाटेत मिळेल तश्या काटक्या जमा केल्या सरपण म्हणून.

२ मुख्य शिड्या आहेत. त्या पैकी पहिली शिडी हि थोडी मोठी (साधारण २-३ मजले) पण रिलेटिव्हली सोपी आहे. दुसरी शिडी जरा ट्रिकी आहे . जिथे शिडी चालू होते त्या ठिकाणी फक्त थोडी काळजी घ्यावी लागते. कारण, शिडीच्या रेलिंग ला पकडून  शिडी ज्या ठिकाणी चालू होते तिथे वळून जावे लागते. डावीकडे शिडी आणि गडाची भिंत आणि उजवी कडे दरी. हे घेतलेलं सर्व सामान येथून चढवणे म्हणजे जिकरीचं काम. पण आमचे गाईड आणि सीझन्ड ट्रेकर्स यांच्या मुळे ते शक्य झाले. आयुष थोडा घाबरला होता. त्याला तारामती ला तो लहान असताना जिथे अडकला होता ते आठवलं. पण अभय - मनीष - अमोल यांनी मिळून त्याला धीर दिल्याने तो व्यवस्थित वर आला.

इथून वर आलं कि उजवी कडे गुहा आणि डावी कडे किल्ल्याचा परिसर. साधारण ३.३०-३.४५ पर्यंत आम्ही पोहोचलो.
(क्रमश:)


















3 comments: