Thursday, January 26, 2017

रतनगड : "एक ब्लॉकबस्टर ट्रेक" : भाग २


भाग २

३.३०-३.४५ पर्यंत आम्ही गडावर पोहोचलो. डाव्या  हाताला आधी रत्नादेवीचे मंदिर (जे एका छोट्या गुहेत आहे) आणि त्यानंतर मोठी गुहा लागते. येथे वीकएंड ला गावातील एक जोडपे हॉटेल चालवते. गुहेतुन आपणास भंडारदरा धरणाच्या बॅक वॉटर्स चा विस्तीर्ण प्रदेश प्रदेश दिसतो. अगदी समोर खाली रतन वाडी गाव; डावी कडे कळसुबाई शिखर आणि त्याला लागून ए-एम-के.  उजवी कडे पाबरगड, भैरव गड,  घनचक्कर आणि कात्राबाई टॉप. गुहेतून हा सर्व निसर्ग एखाद्या कॅनव्हास सारखा सिनेमास्कोप सिनेमा वाटेल असा दिसतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गडावर फोन ला रेंज उत्तम; मग गडावर पोहोचलो हे कळवण्यासाठी साठी फोन रुपी तोफा धडाडल्या.

आता सर्वांना सॉलिड भूक लागली होती. सर्वांनी भाजी पोळी आणि इतर खाऊ वर ताव मारला.  वर येई पर्यंत बरोबर आणलेलं पाणी संपलेलं होतं. मग पाणी आणण्या साठी आणि गडा वर भ्रमंती करण्यासाठी आम्ही निघालो. साधारण १ तास झाला असेल. वर आल्यावर जो काही नजारा दिसतो दिसतो तो डोळ्यात भरणे अशक्य. इथे एका बुरुजावर आल्यावर कात्राबाई टॉप आणि घनचक्कर चा बॅकड्रॉप आहे. पूर्ण  कातळाचा कडा तो देखील अगदी काटकोनात म्हणजे खरा खुरा रौद्र सह्याद्री. निसर्ग आपल्याला ओढतो म्हणतात ना ते खरे वाटते. इथे आल्यावर मग आम्ही इथेच बराच वेळ घालवला फोटो सेशन करण्या मधे. आयुष चा डिएसेलार  निघाला मग काय सर्व तुटून पडले फोटो काढण्यासाठी. जवळ जवळ २० मिनिटे घालवल्यावर आम्हाला पाणी आणायचे  भान आले. हॉटेल मधील काकांनी सांगितल्या प्रमाणे पाण्याचे टाके सापडले. पाण्यावर थोडं शेवाळं होतं, गडावर असे  व्हायचेच. शेवाळं बाजूला करून अभय ने इथून एक बाटली पाणी भरलं; आणि प्यायलं. पाणी एकदम गोड. अजून एक बाटली भरताना लक्षात आले कि त्यात एक उंदीर मामा गतप्राण आणि डायसेक्शन झालेल्या अवस्थेत होते. मग आधी उंदीर बाहेर काढला आणि मग चर्चा सत्र रंगले. आता हे पाणी प्यायचे कि नाही का उकळून प्यायचे वगैरे वगैरे. पण आता आपण बघितल्यामुळे ते पाणी पिण्यास माझा विरोध होता. गडावर अजून पाणी असल्या मुळे आम्ही असं ठरवलं कि अजून पाणी शोधूया. म्हणून हॉटेल वाल्या काकांना विचारायला गेलो असता अजून एक टाकं सापडलं. मग  मंडळींना बोलावलं आणि पाणी भरून घेतलं. एव्हाना ५.३० झाले असतील. सूर्य अस्ताला आला होता. त्यामुळे गड परिक्रमा उद्या सकाळी करू असे ठरले. परत निघालो असता परत काका  भेटले आणि ते म्हणाले कि दुसरी कडे (दक्षीण) दिशेस जे टाकं आहे तेथे चांगले पाणी आहे म्हणून. मग परत त्या दिशे ला गेलो, लभान ५.४०-५.४५ झाले असतील. सूर्य अजून खाली आला होता. पुढे एका ठिकाणी गेल्या वर एकदम कड्यावरील पायवाट लागली-अगदी २ पावलं जातील एवढी जागा आणि डावीकडे ९० डिग्री फॉल आणि अंगावर येणारा निसर्ग. एक क्षण थांबलो. आम्ही बरेच पुढे येऊन पाणी काही नव्हतं. मग अभय आणि मनीष पुढे गेले. ६-६.१०  झाले होते. अजून ५ मिनटात पाणी सापडलं नाही तर परत या असं सांगितलं. झाला १५-२० मिनिटात ते परत आले; पाणी सापडलं नाही; आम्ही मघाच्या टाक्यावर भरलेलं पाणी होतं. अभय जरा खटटू झाला; पण गडाची पूर्ण माहिती नसल्यामुळे आणि सूर्यास्त झाल्यामुळे तसे सांगणे गरजेचे होते. असो.

गुहेत परत आल्यावर चहा झाला आणि मग जेवणाची तयारी चालू झाली. चूल पेटवण्यात बराच वेळ गेला. काही लाकडं ओली होती. अमोल ने मोठ्ठ पातेलं आणलं होतं. पाणी  तापवायला घेतलं. पाणी थोडं उकळल्यावर मनीष नि आणलेली रेडी मिक्स खिचडी त्यात शिजवण्यासाठी ओतली. आणि हो... अभय ने उंदीरमामा वालं पाणी पण प्यायलं...  एव्हाना निसर्गाने कूस बदलली होती. सूर्यनारायण विश्रांती ला जाऊन पृथ्वी चांदण्याची शाल पांघरायच्या तयारीत होती. समोरचे बॅकवॉटर्स दिसेनासे होऊन आता मिणमिण दिवे दिसायला लागले होते, जणू काही मुंग्यांची रांगच. डावीकडे  उंच शिखरावर दिसणारे दिवे कळसुबाई  शिखराची ओळख करून देत होते.

परत एकदा पाणी आणावं लागलं.

एव्हाना खिचडी ऊन झाली होती. मनीष ने सांगितली होती खिचडी पण होता खरा मसाले भात. तमाल पत्र-काळीमिरी, दालचिनी इत्यादी जिन्नस असल्यामुळे मसाले भात एकदम फक्कड आणि स्पायसी झाला होता. सर्वानी आपापल्या ताटल्या काढल्या आणि मसाले भाता वर आडवा हात मारला. चुली वर शिजवलेल्या अन्नाची चव काही औरच.

रात्री गडावर जाऊन आकाश दर्शन करायचा प्रोग्राम ठरलेला होता. एव्हाना ११.००-११.३० झाले असतील. मग आम्ही सर्व जवळच मोकळ्याठिकाणी गेलो. चंद्रोदयाला वेळ होता, त्या मुळे आकाश खूपच सुंदर दिसत होते. नोव्हेबंर मधेच मोने सरां बरोबर आकाश दर्शन केल्यामुळे मृग, अँड्रोमेडा गॅलॅक्सि, आणि काही ओळखीचे ग्रह तारे दिसत होते. कातळावर झोपून आकाश पाहिल्या वर हे सर्व किती अजब आहे ह्याची प्रचिती येते. अँड्रोमेडा पृथ्वी पासून ८.९ अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे. किती ? ८.९ अब्ज  ???!!! खर्च अद्भुत आहे हे सर्व. हे सर्व पाहिल्यावर आपण किती क्षुद्र आहोत ह्याची जाणीव होते. मृग अगदी माथ्यावर दिसत होते. तीन तारे तिरक्या रेषेत, ह्या रेषेच्या आडव्या रेषेत अजून ३ तारे आणि ह्या सर्वांना सामावणारा एक समांतर चौकोन ही मृगाची ओळख. मग हिंदी सिनेमातला 'टूटता तारा' दिसतोय का ? ह्याची शोधाशोध झाली आणि एक 'टूटता तारा' दिसला पण. अजून थोड्या वेळाने परत गुहेत आलो. मग टॉर्च च्या झोतात  फोटो काढायचे अटेम्प्टस झाले.
















रात्री अजून १-२ ग्रुप्स पण मुक्कामी होते. गडाच्या वाटेवर काही बॅटर्यांचा प्रकाश दिसत होता.. म्हणजेच काही ग्रुप्स रात्री देखील चढाई करत होते.

स्लीपिंग बॅग्स बाहेर निघाल्या. घेतल्या नंतर २ वर्षांनी स्लीपिंग बॅगचा उपयोग होत होता. निजानीज चालू झाली मी आणि बापू आम्ही बाहेर म्हणजे मोठ्या गुहेत झोपलो आणि बाकीचे आतल्या छोट्या गुहेत. थंडी तशी विशेष नव्हती पण रात्र जशी बहरत होती तसा गार वारा चालू झाला. मी खरा अज्जीबात घोरत नाही तरी सर्वानी उगीच मला बदनाम केलं आहे ;-); अमित थोड्या वेळाने माझ्या घोरख्याना चा आनंद घेऊन आतल्या गुहेत झोपायला गेला. त्याच्या स्वागता साठी तिथे अनेक घोराखयाने त्याची वाट बघत होती.

अधून मधून जाग येत होती. जसा चंद्रोदय झाला तसे आकाश अजूनच सुंदर दिसू लागले. चंद्राच्या शीतल प्रकाशात धरणाचे बॅकवॉटर्स पण दिसत होते. अतीव सुंदर. हळू हळू पूर्वे कडून तांबडं फुटायला लागलं; तसा मी परत माथ्यावर गेलो. चंद्र आकाशात थोडा वर आला असेल, आणि कात्राबाईच्या मागून सूर्य नारायण धरणीस हॅलो करण्यास तयार होत होते. हे सर्व फोन कॅमेर्यात सामावून घेतले. गार वारा सुटला होता. परत गुहेत आलो आणि सर्वांना उठवले.



क्रमश:


1 comment:

  1. Guys this is fascinating! Seems thrilling experience!! Appreciate detailed treak description with superb flow!!!

    ReplyDelete