Saturday, September 8, 2018

हिमालयाच्या कुशीत - ३ ऋषिकेश ते गोविंद घाट

हिमालयाच्या कुशीत - ३

ऋषिकेश ते गोविंद घाट

सकाळी साडे सहा वाजता तिघे ही तयार होतो.. एक प्रघात ठरला होता.. मी आधी उठून आवरायचे आणि मग अमित आणि प्रसाद चा नंबर..सहा दिवस अमित ला मी आणि प्रसाद झोपलेल्या खोलीत झोपायचे होते.. ही म्हणजे त्याच्या म्हणण्या प्रमाणे, त्याच्या साठी एक सत्वपरिक्षाच होती.. आम्ही दोघेही फुल्ल फॉर्म मध्ये मोटर सायकल चालवतो असे त्याचे म्हणणे .. किती अफवा पसरलेल्या असतात आपल्या बदद्ल :) असो..

पांडे अंकल आणि आन्टि चा मुक्काम राम झुल्या जवळ परमार्थ निकेतन मध्ये होता.. त्यांना आधी पिकअप करून गाडी आम्हाला घ्यायला आली.. त्या नंतर नेहा ला पिकअप केल्यावर ड्रायव्हर ने सर्व सामान नीट लावले.. कॅरीयर असल्यामुळे ट्रेक च्या सर्व मोठ्या सॅक्स वर गेल्या..इनोव्हा च्या मधल्या रो ला बकेट सीट असल्यामुळे जरा पंचाईत झाली.. त्या मुळे मधे दोनच जण बसू शकत होते.. आणि मागे तीन..
पांडे अंकल ओएनजीसी मध्ये कामाला होते.. आणि आन्टि होम मेकर..साधारण पन्नाशितले असतील दोघे जण.. ते आदल्या दिवशी ट्रेक ची तयारीई म्हणून नीलकंठ च्या एका मिनी ट्रेक ला जाउन आले होते ऋषिकेश जवळ. मुलं मोठी झाल्यामुळे आता ते दोघे ट्रेक साठी वेळ काढू शकत होते.. त्यांची मुलगी इतक्यताच केजीएल अर्थात काश्मीर ग्रेट लेक्स हा ट्रेक करून आली होती.. आमची अजुन एक ट्रेक मेट नेहा पहारिया ही न्यूट्रिशनिस्ट होती.. ती मुंबईत एका फुड कंपनीत कामाला होती आणि तिचा हा पहिलाच ट्रेक होता.. सकाळी आम्हाला नरसिंहा अंकल आणि त्यांची फॅमिली पण भेटली (बेंगलोर वाले).

६.४० वाजता प्रस्ठान केले..ऋषिकेश ते गोवींदघाट हा २७० किमीचा प्रवास होता..ऋषिकेश-कौडीयाला- देवप्रयाग- श्रीनगर- रुद्रप्रयाग- कर्णप्रयाग- चमोलि- जोशिमठ-गोवींदघाट असा रूट होता.. तसे अंतर जास्त नाही पण हा पूर्ण घाट रस्ता असल्यामुळे कमीत कमी १२ तास प्रवासाला लागणार होते.. थोडे पुढे आल्या वरच लँडस्लाइड झालेला भाग लागला.. तो पार केल्यावर जरा नीट रस्ता लागला..एका बाजूस पर्वत आणि एका बाजूस नदी हे जवळजवळ पूर्ण प्रवासात कायम होते.. सुरुवातीला गंगा आणि मग अलकनंदा नदी तुमच्या बरोबर असते..आम्ही कौडीयाला या ठिकाणी ब्रेकफास्ट साठी ब्रेक घेतला.. एका बाजूस गंगेचे विशाल पात्र होते.. बर्‍याच ठिकाणी डोंगरांवरून लँडस्लाइड झाल्याच्या खाणा खुणा दिसत होत्या..सकाळची वेळ असल्यामुळे ढ्ग नदीपात्रात उतरले होते.. हवेत गारवा होता..

सगळ्या हॉटेल्स मध्ये ब्रेकफास्ट=पराठे हे समीकरण आहे.. पराठे आणि त्या बरोबर दही किंवा लिंबू आणि गाजराचे लोणचे... खाऊन आणि चहा झाल्यावर साधारण अर्ध्या तासात निघालो..आता जसजसे पुढे जात होतो तसतसे पर्वत उंचच उंच होत होते..मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण प्रवास म्हणजे एका बाजूला नदी-त्या पल्याड पर्वत आणि एका बाजूस पर्वत... कधी तुम्ही अगदी नदी जवळ म्हणजे साधारण पात्राच्या पातळिस आणि कधी एकदम उंचावर... मग हा उंच-सखल चा खेळ सतत चालू...स्टील चे पूल खूप वेळा लागतात..आणि लक्ष्मण झुल्या सारखे झुले पण खूप दिसतात.. कारण गावं ही एक तर नदी किनारी किंवा घाट माथ्यावर.. नदी किनारी गाव असलं की झुले आलेच..

थोडं पुढे आल्यावर देवप्रयाग लागलं.. इथे पाच एक मिनिटे थांबलो.. अलकनंदा आणि भागिरथी चा संगम इथे आहे.. इथून पुढे (ऋषिकेश च्या दिशेने) अलकनंदा आणि भागिरथी एकत्र गंगा म्हणून ओळखली जाते.. वरुन हा संगम खूपच विलोभनीय दिसतो.. आणि दोन्ही नदींचे पाणी वेगळ्या रंगाचे आहे हे लक्षात देखील येते.. इथून पुढे आल्यावर श्रीनगर हे मोठे गाव लागते.. त्या नंतर रुद्रप्रयाग-कर्णप्रयाग-नंदप्रयाग लागतात. प्रयाग म्हणजेच संगम.. कर्ण प्रयाग  गावातून पुढे आल्यावर परत चढ आहे. इथे वर आल्यावर कर्णप्रयाग चे विहंगम दृष्य खूपच विलोभनीय दिसते.. खाली गावात असलेले तीन पूल दिसतात..काठावर वसलेलं गाव..आणि नदीचा प्रपात... पण ही गावं इतक्या नाजूक परिस्थितीत नदी जवळ वसलेली आहेत की पुन्हा २०१३ सारखी पुनरावृत्ती झाली की गावं च्या गावं नदी पात्रात सामावतील.. आणि रस्त्यांचा पण तोच प्रकार आहे.. अंगावर येणारे उंचच उंच डोंगर.. काही ठिकाणी खूपच नाजूक परिस्थिती.. आम्ही जायच्या आधी पण ३-४ दिवस रस्ता बंद होता.. हिमालय पर्वत रांगेतील डोंगर बर्‍याच ठिकाणी भुसभुशीत लाइम स्टोन चे आहेत. थोडा जरी पाऊस झाला तरी.. लँडस्लाइड ची भीती कायम.. कर्णप्रयाग हे मोठे जंक्शन आहे. इथूनच केदारनाथ आणि नैनिताल ला जायला देखील फाटे आहेत. 

कर्णप्रयाग आणि नंदप्रायागच्या मधे आम्ही एका हॉटेलात जेवण्या साठी थांबलो.. रणजीत- आमच्या ड्रायव्हर ला सांगितले होते की तुला जिथे माहीत आहे चांगले जेवण मिळते अश्या ठिकाणी थांबव.. "पंत" म्हणून एका गृहस्थांचे हॉटेल होते. ऑर्डर आल्यावर स्वयपाक करतो म्हणाले.. त्या मुळे थोडा वेळ लागला पण जेवण अगदी गरमा गरम मिळाले.. साधारण ४ च्या सुमारास इथून पुढे निघालो.. ८०% अंतर झाले होते.. पुढे चमोलि-जोशिमठ आणि मग गोविंद घाट..

जसजसे आपण अजुन वर येत जातो तसतसे देवदार वृक्ष दिसू लागतात.. लांबून दिसायला आपलं नागवेलीचं पान देठाला पकडून हातात उभं धरलं तर जसं दिसेल तसे.. अजुन एक गोष्ट म्हणजे.. बर्‍याच ठिकाणी लागणारे हायड्रो पॉवर चे प्रकल्प.. एनेचपीसी, जेपी ह्यांचे बरेच ठिकाणी हे प्रकल्प लागतात रस्त्यातून जाताना..नदीचे पात्र काही ठिकाणी खूप मोठे आणि संथ (श्रीनगर) तर काही ठिकाणी खूपच अरुंद आणि रौद्र स्वरूपाचे..

जोशीमठ: 
अशी मजल दरमजल करत आम्ही ५-५.३० च्या सुमारास जोशिमठ येथे पोहोचलो.. तसे मोठे शहरच म्हणुया.. इथे आर्मी आणि बिआरओ चा बेस आहे.. पुढे आलो तर ट्राफ़िक पूर्ण थांबवलेले होते.. पुढे कुठे तरी लँड स्लाइड झाली आहे म्हणून. आमच्या आधी आलेले लोक साधारण १-२ तासांपासून थांबलेले होते.. खाली उतरलो.. तसा सभोवताल चा परिसर कळू लागला.. जोशिमठ उंचीवर म्हणजे माथ्यावर आहे.. समोर असे हे डोक्यावर येणारे उंच पर्वत..९० च्या कोनात उभे च्या उभे..मधुनच येणारे ढ्ग आणि पाऊस.. आता सहा साडे सहा झाले होते.. इंडियाहाईक्स च्या अजुन २ गाड्या पण आल्या.. रस्ता पुन्हा चालू व्हायचे काही चिन्ह नव्हते.. आता खरे आम्हाला कळत होते की हिमालयात प्रवास करणे म्हणजे काय आहे ते.. आणि एकदा अंधार झाला की रस्ता उघड्णे कठीण..खरे तर गोविंद घाट इथून फक्त २० मिनिटांवर होता पण तरी आता तो खूपच लांब आहे असे वाटत होते..  सर्व ड्रायव्हर लोकांचे बेस कॅम्प शी बोलणे झाले.. ठरले.. गाड्या काढायच्या.. कुठे लँडस्लाइड लागलीच तर.. पलीकडच्या बाजू पर्यंत बेस कॅम्प वरील गाड्या येतील घ्यायला.. तेवढे अंतर पायी चालायचे..

इथून पुढचा २० मिनिटांचा प्रवास खूपच थ्रिलिंग होता.. आम्ही नदी पात्रा पासून साधारण १५०० फुट उंचीवर असु..त्या उंची पासून आम्ही एक १० मिनिटात नदी पात्राच्या पातळी पर्यंत आलो..समोरून  एक स्टील चा ब्रिज क्रॉस करून पुढे आलो.... वरुन खाली येताना आम्हाला तो ब्रिज आणि वाहने दिसत होती.. रस्ता क्लीयर झाला आहे हे वरुनच कळत होते.. पुढे एक किमी वर जिथे रस्ता बंद झाला होता तो भाग लागला... अंधार पडायला जस्ट सुरूवात झाली होती.. उजवी कडे नदीचा खळाळ...आणि रस्ता... नाही रस्ता नाहीच तो चिखल.. जेमतेम एक गाडी जाईल एवढी जागा.. वरुन आलेले हे भले मोट्ठे खडक आणि पाऊस... हे खरोखर अक्षरश: "ब्रेथ टेकिंग" होते... तो भाग क्रॉस केला आणि पुढे १० मिनिटातच गोविंदघाट ला पोहोचलो.. संध्याकाळचे ७.३० झाले असतील.. १३ तास २७० किमी. हुश्ष्श...

क्रमश:

हिमालयाच्या कुशीत - २ ऋषिकेश

हिमालयाच्या कुशीत - २

ऋषिकेश

सहा वाजे पर्यंत एअरपोर्ट ला पोहोचलो.. सर्व सोपस्कार पूर्ण करून साडेसहा पर्यंत स्थिरस्थावर झालो. आमचे विमान व्हाया दिल्ली होतं. वेळेत म्हणजे साधारण सव्वा बारा च्या सुमारास जॉली ग्रँट - देहरादून येथे पोहोचलो. वातावरण जरा ढगाळ होतं.. आम्हाला ऋषिकेश हून गोविंद घाट ला घेऊन जाणार्‍या ट्रान्स्पोर्टरलाच आम्ही गाडी पाठवायला सांगितली होती... एर्टिगा.. एअरपोर्ट ते ऋषिकेश वीस एक किमी अंतर आहे.. रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी..कुठल्या तरी नॅशनल पार्क चा भाग होता.. "एलिफंट क्रॉसिंग झोन" असे बोर्ड लिहिलेले होते..आपले पूर्वज ही भरपूर प्रमाणात होते ...  जॉली ग्रँट ते ऋषिकेश हा साधारण मैदानी प्रदेश आहे.. एक पाऊण तासात आम्ही आमच्या "ओयो- द शिवाय" या हॉटेल वर पोहोचलो.. लक्ष्मण झूला रोड वर आमचे हॉटेल होते.. चेक इन करून थोडा आराम झाल्यावर दोन च्या सुमारास जेवण्यासाठी खाली उतरलो..

आम्हाला टिपिकल धाबा स्टाइल हॉटेल मध्ये जेवायचे होते..चौकशी केल्यावर लक्ष्मण झुल्या जवळ चांगली हॉटेल्स आहेत असे कळले.. आमचे हॉटेल जरा उंचावर होते... तिथून लक्ष्मण झूला म्हणजे थोडा उतारा वर होता.. दुपारची वेळ असल्यामुळे तशी वर्दळ कमीच होती..दुतर्फा हॉटेल्स आणि शॉपिंगची दुकानं.. एकंदरीत पाश्चीमात्य  लोकांचा बर्‍यापैकी वावर असेल असे जाणवत होते.. थोडे खाली उतरल्यावर बरीच हॉटेल्स होती.. मग जरा पुढे आल्यावर एक हॉटेल दिसले.. थोडेसे अघळ पघळ.. बाहेर तंदूर..गर्दी कमी.. खात्री पटली.. हेच ते हॉटेल.. तिथे डाल मखनी-छोले .भटूरे-रोटी-आलु पराठे असा आम्हाला हवा असलेला मेनु मिळाला..इथे एक विशेष म्हणजे.. कांदा-प्याज मागितल्यावर कांदा इथे म्हणजे एक लक्झरी आहे असे लक्षात आले..त्या मुळे ओनियन सलाड ऑर्डर करावे लागले.. साधारण ३.३०-३.४५ पर्यंत जेवण झाल्यावर आम्ही लक्ष्मण झुल्याकडे निघालो..

लक्ष्मण झूला जसजसा जवळ येऊ लागला तसे दिसू लागले गंगेचे विशाल पात्र.. पावसाळा असल्या मुळे पाणी तसे गढूळ आणि प्रवाह जोरदार होता.. लक्ष्मण झूला हा खरोखर झूला आहे.. झुलता पूल.. दोन्ही कडे बांधलेला.. आम्ही जिकडे होतो ती तपोवन आणि पलीकडे स्वर्ग आश्रम.. लक्ष्मण झूला च्या (पलीकडच्या) दोन्ही बाजूस ऊंच च ऊंच देवळे दिसत होती आणि घाट..घाटाच्या वरील बाजूस घरे.. हॉटेल्स इ आणि ह्या सगळ्यांना कुशीत घेणारे पर्वत.. संध्याकाळी गंगा आरती बघायला येऊ असे ठरवले.. झुल्यावरून दुचाकींना परवानगी होती.. त्यामुळे स्कूटर-बाइक वाले बरेच जण होते..फोटो सेशन करणारे अबाल-वृद्ध आणि देशाच्या प्रत्येत प्रांतातून आलेले लोक दिसत होते..  पलीकडच्या बाजूस बाजारपेठ बरीच मोठी होती..

वातावरण अजुन दमटच... वारा पण तसा पडलेलाच... साधारण ४.३० च्या सुमारास परत फिरलो.. परत हॉटेल ला यायचे म्हणजे मिनी ट्रेक चाच प्रकार होता.. वर येई पर्यंत जो काही घामटा निघालाय... अगदी आपल्याकडे असतो तसाच.. रूम वर आल्यावर तिघांनी ताणून दिली... पहाटे साडे तीन - चार ला उठल्या मुळे थकवा पण आला होता.. जाग आली तर सात वाजून गेले होते.. रूम च्या बाहेर आलो तर गंगा आरती चे सूर कानावर पडत होते आणि मगाशी दिसलेले ते उंच देऊळ आता रोषणाई मुळे अजुनच सुंदर दिसत होते.. आणि संधी प्रकाशा मुळे एक वेगळाच आसमंत तयार झाला होता..

दुसर्‍या दिवशी १८ तारखेला आम्हाला ६.३० वाजता गोवींदघाट साठी निघायचे होते..ट्रान्सपोर्टर कडून बोलरो, मॅक्स किंवा ट्रेवलर गाडी येणार होती.. ग्रूप पैकी काही मेम्बर्स ऋषिकेश ला तर काही हरिद्वार ला थांबले होते.. ऋषिकेश च्या मेम्बर्सशी फोन वर बोलून दुसर्‍यदिवशी आम्ही इनोव्हा नि जायचं ठरवलं.. मुंबईचेच एक मि. आणि मि. पांडे आणि नेहा पहरिया हे लोक होते..सर्वांशी बोलून इनोव्हा नि साडेसहा वाजता निघायचे ठरले.. मागून एक श्री. नरसिंहा आणि कुटुंब हे बेंगलोर हून आलेले ३ जण होते.. पण तो पर्यंत इनोव्हा फुल्ल झाली होती.. त्यामुळे त्यांना हरिद्वार हून येणार्‍या ग्रूप ला जॉइन व्हायला लागणार होतं..

साडेसात पर्यंत खाली उतरलो... अजुन गारवा तर नव्हता पण आता वारा होता.. आम्ही झुल्याच्या पलीकडील बाजूस गेलो आणि बाजार पेठेत फिरलो..योगा सेंटर चे बरेच बोर्ड्स दिसत होते.. सर्व गोरे लोक बहुतेक योगा मुळेच ऋषिकेश मध्ये तंबू ठोकून होते.. एक सीसीडी पण होते.. तिकडे थोडा टाइम पास केला-कॉफी.. घरी व्हॉटसअॅॅप कॉल्स इ. प्रकार झाले..

परत फिरल्यावर आता गारवा आला होता... झुल्यावर परत येई पर्यंत सर्व शांत झाले होते.. झुल्यावर थोडी रोषणाई होती .. बाकीचे दिवे गेले होते पण झुल्यावर मिण मिण प्रकाश होता .. मधोमध आल्यावर खूपच छान वाटत होते.. चंद्राच्या प्रकाशात पाण्याचा प्रवाह... गार वारा..खळखळत्या पाण्याचा आवाज..... एक वेगळीच वातावरण निर्मिती झाली होती... खूप भारी वाटत होतं..अदभुत..इथे वीस एक मिनिटे आम्ही होतो.. असं वाटत होतं की अजुन थांबावं.. पाय निघत नव्हता.. 

नऊ पर्यंत हॉटेल वर येऊन तिथेच जेवण झाले. त्यानंतर पान खाण्यासाठी बाहेर पडलो पण बरेच फिरून झाल्यावर पण पानाची गादी काही दिसली नाही.. मग एके ठिकाणी बासकीन्स चा स्टॉल होता.. तिथे आईसक्रिम खाऊन साडे दहाच्या सुमारास रूम वर परत आलो आणि आडवे झालो..ढारा ढूर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.....

क्रमश:

Sunday, September 2, 2018

हिमालयाच्या कुशीत -१

हिमालयाच्या कुशीत

खाडकन जाग आली... बिछान्या जवळील फोन चाचपडला...बघितलं तर अजुन पहाटेचे चारच वाजले होते आणि पावसाचा आवाज येत होता.. मधूनच गड-गडण्याचा आवाज देखील येत होता.. ढगांचा का डोंगरांचा ते कळायला मार्ग नाही.. काल रात्री आकरा च्या सुमारास आम्ही ऋषिकेश मध्ये पोहोचलो होतो.. सुमारे सतरा तासांचा प्रवास करून.. अजुन वाटत होतं की आपण गाडीतच आहोत आणि सभोवताली पर्वतच पर्वत आहेत...... हे उभे च्या उभे .. पण सुदैवाने तो प्रवास संपला होता. पहाटे सहा वाजता आम्ही गोविंद घाट हून निघालो होतो. मजल दरमजल करत, लँड स्लाइड मुळे चमोली जवळ पाच तास अडकल्या नंतर आणि पुन्हा ऋषिकेश जवळ येता येता एका छोट्याश्या "ट्विस्ट इन द टेल" नंतर तो महा-प्रवास संपला होता. आणि त्याच्या आदल्या दिवशी आमचा वॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड साहिब चा ट्रेक पूर्ण झाला होता.

हिमालय मनात घोळत होता..
सह्याद्री मधील ट्रेक्स केल्यावर खूप दिवसांपासून हिमालयात ट्रेक करायची इच्छा मनात घर करून होती... शाळेतील बॅचमेट आणि सीए स्वाती जोशी ही माहीत असलेल्या ट्रेकर्स पैकी हिमालयात सध्या रेग्युलर ट्रेक्स करणारी... तिने एफबी वर पोस्ट केलेले हिमालयातील ट्रेक्सचे फोटो बघून ही इच्छा अजुन प्रबळ होत होती.. कधी करायचा .. कुठला करायचा... कोणा बरोबर हे प्रश्न मनात घोळत होते.. बरेच दिवस अभ्यास चालू होता.. युथ हॉस्टेल, ट्रेक द हिमालायास, इंडिया हाइक्स असे बरेच प्रोफेशनल ग्रुप्स होते.. मग बर्‍याच अभ्यासा आणि विचारा अंती इंडियाहाइक्स ह्या ऑर्गनायझर बरोबर जायचं ठरवलं... आता कुठल्या ट्रेक पासून सुरूवात करूया हा प्रश्न होता.. बिगिनर लेव्हल च्या ट्रेक मध्ये.. चंद्रशीला, केदार कंठ, हर की धून असे ओप्श्न्स येत होते.. हे साधारण मार्च - एप्रिल २०१८ च्या सुमारास चालू होतं.. ट्रेक साठी लागणारी तयारी, प्रवासाची तिकिटं हे गणित काही जुळून येत नव्हतं.. मग सर्व विचार करून ठरवलं..... "वॅली ऑफ फ्लॉवर्स" आणि "हेमकुंड साहिब" वर शिक्का मोर्तब झालं. 

ट्रेक मेट्स, तारखा
ट्रेक ठरल्यावर इथून कोण मित्र बरोबर येणार याची तयारी चालू झाली. प्रसाद आणि अमित यायला तयार झाले. शेखर ला सुट्ट्यांच्या कारणा मुळे जमणार नव्हतं. नेहेमीचे ट्रेक मेट्स अभय आणि कौस्तुभ यांना काही अडचणींमुळे जमत नव्हतं.

वॅली ऑफ फ्लॉवर्स चा सीझन साधारण जुलै ते सप्टेंबर पर्यंत असतो.. कारण त्याच वेळी तिथे फुलांचा बहर येतो. साधारण पाऊस थोडा कमी होईल या अनुषंगाने आधी मी १९ ऑगस्ट ची बॅच फायनल केली आणि त्या प्रमाणे ट्रेक चे बुकिंग केले. जाताना फ्लाईट ने जाऊ आणि येताना ट्रेन ने येऊ असे ठरले. ट्रेन चा प्रवास २८ तासांचा होता.. येई पर्यंत ट्रेक चा माहोल हौले हौले उतरेल या उद्देशाने ट्रेन ने यायचं ठरवले. परत येताना हरिद्वार एलटीटी एक्सप्रेस ही गाडी शुक्रवारी होती. आणि त्या साठी आम्ही शुक्रवारी संध्याकाळी (२४ ऑगस्ट) ६ पर्यंत हरिद्वार ला पोहोचणे गरजेचे होते. आणि ही सुपर फास्ट ट्रेन आठवड्यातून फक्त दोन दिवस आणि आम्हाला सोइसकर अशी शुक्रवारी च होती. प्रवासाचे मार्जिन आणि थोडी फिरण्याची सोय म्हणून आम्ही १८ ताारखेच्या बॅच नि जायचं ठरवलं.. तसे ट्रेक को-ऑर्डीनेटर प्रतिमा शि बोलून १८ तारखेची बॅच फायनल केली. हा निर्णय आमचा अगदी बरोबर ठरला.. कसा तो मी पुढे सांगेनच.   

इंडिया हाइक्स : एक प्रोफेशनल ऑर्गनायझर
ट्रेक बुक केल्या पासूनच आम्ही ठरवलेले ऑर्गनायझर त्यांच्या कामात निष्णात असतील याची प्रचीती येत होती. ट्रेक साठी काय काय तयारी करायची.. शारीरिक आणि मानसिक.. हिमालयातील ट्रेक इतर किंवाआपल्या सह्याद्री च्या ट्रेक पेक्षा कसा वेगळा असेल;. हाय आल्टिट्यूड सिकनेस, मोशन सिकनेस, बॅग पॅक कशी भरायची, बरोबर काय सामान घ्यायचं.. किती घ्यायचं या संबंधी ई-मेल्स आणि यु-ट्यूब ट्युटोरियल्स रेग्युलर येत होत्या..

ट्रेक ची तयारी
शारीरिक तयारी साठी ट्रेक च्या साधारण २-३ महिने आधी मॉनिटरींग म्हणून एक टार्गेट सेट केले गेले.. "४५ मिनिटे ५ किमी" हे app वर रेकॉर्ड करून त्याचे स्कीन शॉट्स्ट पाठवायचे ... आणि जसजसे आपण ट्रेक च्या तारखे जवळ येऊ तसे "४० मिनिटे ५ किमी" हे टार्गेट होते... ह्या बरोबर इतर फिटनेस रिजिम असेल तर उत्तमच... पण ते नियामाने करणे आमच्या तिघांपैकी कोणाही जमले नाही.. :) प्रसाद ने मात्र स्टेशन हून घरी जाताना २-३ वेळा ते केले..     

पण  हे जमले नाही म्हणून मान्सून ट्रेक्स करायचे हे मात्र आम्ही नक्की केले. त्या प्रमाणे कर्नाळा, माथेरान व्हाया भिवपुरी गार्बट हे ट्रेक्स आणि दोन दिवस माथेरान भटकंती हे जुलै-ऑगस्ट मध्ये केले. 

अमित चे पर्सनल फिजिकल ट्रेनिंग आणि एक्स्र्साइज मात्र चालू होता. त्या मुळे आमच्या पैकी सर्वात जास्त ट्रेक फिटनेस अमित कडे होता.. उशिरा ट्रेक्स करायला लागला असला तरी, तो ट्रेक्स साठी फिट आहे हे माहीत होते.

ट्रेक शॉपिंग
ट्रेक चे शॉपिंग विशेषत: हिमालयातील ट्रेक चे शॉपिंग हा खिशाला पडणारा एक भला मोठा खडडा आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. पण हा खडडा बहुतांशी कमी होऊ शकतो आणि आम्ही तो कमी करायचा प्रयत्न केला.. बरेच सामान भाडे तत्वा वर घेऊन.. इंडिया हाइक्स ने ट्रेक पोल, जॅकेट्स, पॉंचो, शूज अश्या महत्वाच्या गोष्टी भाडे तत्वा वर उपलब्ध करून दिल्याहोत्या.. त्या प्रमाणे अमित आणि प्रसाद ने पॉंचो, शूज आणि ट्रेक पोल रेंट केले.. मला शूज रेंट करणे म्हणजे शेवटच्या क्षणा पर्यंत अधांतरी ठेवणे ही मोठी रिस्क वाटली.. कारण "shoes can make or break your trek" त्याच प्रमाणे माझे पाय खूप जास्त blister prone असल्या मुळे मी शूज घ्यायचे ठरवले. तसेच हा माझा पहिला आणि शेवटचा हिमालयन ट्रेक नसेल ह्याची खात्री होती..त्या प्रमाणे ट्रेक १००/५०० हे क्वेचुआ चे शूज घेतले. शूज घेतल्यावर त्याला तुमच्या पायांची आणि तुमच्या पायाला त्याची सवय होणे हे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे साधारण ३ आठवडे आधी शूज घेऊन त्यावर माथेरान भ्रमंती आणि रोज ऑफिस ला जाता येता नवीन शूज घालून ब्रेक केले.

घोड्याची नाल म्हणजेच ट्रेकिंग बॅक पॅक मी ५-६ महिने आधीच घेतली होती.. बाकीचे तत्सम शॉपिंग.. क्विक ड्राय पॅंट्स, शर्ट्स, थर्मल्स, याचे २ सेट्स घेतले. अगदी ऐन वेळी एक गरम कपड्यांचा सेट तिघांसाठी घेतला. ह्या पैकी काय कामी आलं आणि काय नाही हे सविस्तर पुढे सांगिनच. सॉक्स चे मात्र भरपूर सेट्स घेतले.. अगदी रोज एक जोड ह्या हिशोबने..

घटीका समीप आली..
बॅक पॅक कशी भरायची याचे बरेच विडीओस युट्यूब वर आहेत.. त्या प्रमाणे सर्व प्रकार वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये पॅक करून सॅक मध्ये भरल्या. साधारण ४-५ दिवसांच्या ट्रेक साठी एक मोठी ४०-५० लिटर ची मोठी बॅक पॅक, २० लिटर ची एक छोटी डे पॅक पुरेसे आहेत. तसेच ब्लिस्टरर्स येऊ नये किंवा आले तर काय काळजी घ्यावी साठी देखील बराच अभ्यास युट्यूब वर केला होता.. त्या प्रमाणे "ल्यूकोटेप" आणि सुई -दोरा बरोबर घेतले.. जायच्या ४-५ दिवस आधी दोन्ही तळ पायांना "ल्यूकोटेप" चिकटवली.."ल्यूकोटेप" खरोखर मॅजिक टेप निघाली.. कशी ते पुढे येईलच. 

इकडे दुसरी कडे आदल्या दिवशी रात्री पर्यंत अमित आणि प्रसाद चे पॅकिंग चालू होते.. प्रसाद ला ऑफिस मधून आणि अमित ला रिटर्न च्या सीझन मधून १ आठवडा ब्रेक घ्यावा लागत असल्यामुळे त्यांना ऑफिस मधील बरेच काम पूर्ण करायचे होते..

१७ ऑगस्ट ला सकाळी ७.४० ची फ्लाईट असल्यामुळे सर्व पिक-अप झाल्यावर ५ वाजता आम्ही कल्याण सोडले.. ....

कब तक गिने. हम धडकने... दिल जैसे धडके धडकने दो...
क्यूं है कोई आग दबि... शोला जो हद से गुजरने दो... 


क्रमश: