Saturday, September 8, 2018

हिमालयाच्या कुशीत - ३ ऋषिकेश ते गोविंद घाट

हिमालयाच्या कुशीत - ३

ऋषिकेश ते गोविंद घाट

सकाळी साडे सहा वाजता तिघे ही तयार होतो.. एक प्रघात ठरला होता.. मी आधी उठून आवरायचे आणि मग अमित आणि प्रसाद चा नंबर..सहा दिवस अमित ला मी आणि प्रसाद झोपलेल्या खोलीत झोपायचे होते.. ही म्हणजे त्याच्या म्हणण्या प्रमाणे, त्याच्या साठी एक सत्वपरिक्षाच होती.. आम्ही दोघेही फुल्ल फॉर्म मध्ये मोटर सायकल चालवतो असे त्याचे म्हणणे .. किती अफवा पसरलेल्या असतात आपल्या बदद्ल :) असो..

पांडे अंकल आणि आन्टि चा मुक्काम राम झुल्या जवळ परमार्थ निकेतन मध्ये होता.. त्यांना आधी पिकअप करून गाडी आम्हाला घ्यायला आली.. त्या नंतर नेहा ला पिकअप केल्यावर ड्रायव्हर ने सर्व सामान नीट लावले.. कॅरीयर असल्यामुळे ट्रेक च्या सर्व मोठ्या सॅक्स वर गेल्या..इनोव्हा च्या मधल्या रो ला बकेट सीट असल्यामुळे जरा पंचाईत झाली.. त्या मुळे मधे दोनच जण बसू शकत होते.. आणि मागे तीन..
पांडे अंकल ओएनजीसी मध्ये कामाला होते.. आणि आन्टि होम मेकर..साधारण पन्नाशितले असतील दोघे जण.. ते आदल्या दिवशी ट्रेक ची तयारीई म्हणून नीलकंठ च्या एका मिनी ट्रेक ला जाउन आले होते ऋषिकेश जवळ. मुलं मोठी झाल्यामुळे आता ते दोघे ट्रेक साठी वेळ काढू शकत होते.. त्यांची मुलगी इतक्यताच केजीएल अर्थात काश्मीर ग्रेट लेक्स हा ट्रेक करून आली होती.. आमची अजुन एक ट्रेक मेट नेहा पहारिया ही न्यूट्रिशनिस्ट होती.. ती मुंबईत एका फुड कंपनीत कामाला होती आणि तिचा हा पहिलाच ट्रेक होता.. सकाळी आम्हाला नरसिंहा अंकल आणि त्यांची फॅमिली पण भेटली (बेंगलोर वाले).

६.४० वाजता प्रस्ठान केले..ऋषिकेश ते गोवींदघाट हा २७० किमीचा प्रवास होता..ऋषिकेश-कौडीयाला- देवप्रयाग- श्रीनगर- रुद्रप्रयाग- कर्णप्रयाग- चमोलि- जोशिमठ-गोवींदघाट असा रूट होता.. तसे अंतर जास्त नाही पण हा पूर्ण घाट रस्ता असल्यामुळे कमीत कमी १२ तास प्रवासाला लागणार होते.. थोडे पुढे आल्या वरच लँडस्लाइड झालेला भाग लागला.. तो पार केल्यावर जरा नीट रस्ता लागला..एका बाजूस पर्वत आणि एका बाजूस नदी हे जवळजवळ पूर्ण प्रवासात कायम होते.. सुरुवातीला गंगा आणि मग अलकनंदा नदी तुमच्या बरोबर असते..आम्ही कौडीयाला या ठिकाणी ब्रेकफास्ट साठी ब्रेक घेतला.. एका बाजूस गंगेचे विशाल पात्र होते.. बर्‍याच ठिकाणी डोंगरांवरून लँडस्लाइड झाल्याच्या खाणा खुणा दिसत होत्या..सकाळची वेळ असल्यामुळे ढ्ग नदीपात्रात उतरले होते.. हवेत गारवा होता..

सगळ्या हॉटेल्स मध्ये ब्रेकफास्ट=पराठे हे समीकरण आहे.. पराठे आणि त्या बरोबर दही किंवा लिंबू आणि गाजराचे लोणचे... खाऊन आणि चहा झाल्यावर साधारण अर्ध्या तासात निघालो..आता जसजसे पुढे जात होतो तसतसे पर्वत उंचच उंच होत होते..मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण प्रवास म्हणजे एका बाजूला नदी-त्या पल्याड पर्वत आणि एका बाजूस पर्वत... कधी तुम्ही अगदी नदी जवळ म्हणजे साधारण पात्राच्या पातळिस आणि कधी एकदम उंचावर... मग हा उंच-सखल चा खेळ सतत चालू...स्टील चे पूल खूप वेळा लागतात..आणि लक्ष्मण झुल्या सारखे झुले पण खूप दिसतात.. कारण गावं ही एक तर नदी किनारी किंवा घाट माथ्यावर.. नदी किनारी गाव असलं की झुले आलेच..

थोडं पुढे आल्यावर देवप्रयाग लागलं.. इथे पाच एक मिनिटे थांबलो.. अलकनंदा आणि भागिरथी चा संगम इथे आहे.. इथून पुढे (ऋषिकेश च्या दिशेने) अलकनंदा आणि भागिरथी एकत्र गंगा म्हणून ओळखली जाते.. वरुन हा संगम खूपच विलोभनीय दिसतो.. आणि दोन्ही नदींचे पाणी वेगळ्या रंगाचे आहे हे लक्षात देखील येते.. इथून पुढे आल्यावर श्रीनगर हे मोठे गाव लागते.. त्या नंतर रुद्रप्रयाग-कर्णप्रयाग-नंदप्रयाग लागतात. प्रयाग म्हणजेच संगम.. कर्ण प्रयाग  गावातून पुढे आल्यावर परत चढ आहे. इथे वर आल्यावर कर्णप्रयाग चे विहंगम दृष्य खूपच विलोभनीय दिसते.. खाली गावात असलेले तीन पूल दिसतात..काठावर वसलेलं गाव..आणि नदीचा प्रपात... पण ही गावं इतक्या नाजूक परिस्थितीत नदी जवळ वसलेली आहेत की पुन्हा २०१३ सारखी पुनरावृत्ती झाली की गावं च्या गावं नदी पात्रात सामावतील.. आणि रस्त्यांचा पण तोच प्रकार आहे.. अंगावर येणारे उंचच उंच डोंगर.. काही ठिकाणी खूपच नाजूक परिस्थिती.. आम्ही जायच्या आधी पण ३-४ दिवस रस्ता बंद होता.. हिमालय पर्वत रांगेतील डोंगर बर्‍याच ठिकाणी भुसभुशीत लाइम स्टोन चे आहेत. थोडा जरी पाऊस झाला तरी.. लँडस्लाइड ची भीती कायम.. कर्णप्रयाग हे मोठे जंक्शन आहे. इथूनच केदारनाथ आणि नैनिताल ला जायला देखील फाटे आहेत. 

कर्णप्रयाग आणि नंदप्रायागच्या मधे आम्ही एका हॉटेलात जेवण्या साठी थांबलो.. रणजीत- आमच्या ड्रायव्हर ला सांगितले होते की तुला जिथे माहीत आहे चांगले जेवण मिळते अश्या ठिकाणी थांबव.. "पंत" म्हणून एका गृहस्थांचे हॉटेल होते. ऑर्डर आल्यावर स्वयपाक करतो म्हणाले.. त्या मुळे थोडा वेळ लागला पण जेवण अगदी गरमा गरम मिळाले.. साधारण ४ च्या सुमारास इथून पुढे निघालो.. ८०% अंतर झाले होते.. पुढे चमोलि-जोशिमठ आणि मग गोविंद घाट..

जसजसे आपण अजुन वर येत जातो तसतसे देवदार वृक्ष दिसू लागतात.. लांबून दिसायला आपलं नागवेलीचं पान देठाला पकडून हातात उभं धरलं तर जसं दिसेल तसे.. अजुन एक गोष्ट म्हणजे.. बर्‍याच ठिकाणी लागणारे हायड्रो पॉवर चे प्रकल्प.. एनेचपीसी, जेपी ह्यांचे बरेच ठिकाणी हे प्रकल्प लागतात रस्त्यातून जाताना..नदीचे पात्र काही ठिकाणी खूप मोठे आणि संथ (श्रीनगर) तर काही ठिकाणी खूपच अरुंद आणि रौद्र स्वरूपाचे..

जोशीमठ: 
अशी मजल दरमजल करत आम्ही ५-५.३० च्या सुमारास जोशिमठ येथे पोहोचलो.. तसे मोठे शहरच म्हणुया.. इथे आर्मी आणि बिआरओ चा बेस आहे.. पुढे आलो तर ट्राफ़िक पूर्ण थांबवलेले होते.. पुढे कुठे तरी लँड स्लाइड झाली आहे म्हणून. आमच्या आधी आलेले लोक साधारण १-२ तासांपासून थांबलेले होते.. खाली उतरलो.. तसा सभोवताल चा परिसर कळू लागला.. जोशिमठ उंचीवर म्हणजे माथ्यावर आहे.. समोर असे हे डोक्यावर येणारे उंच पर्वत..९० च्या कोनात उभे च्या उभे..मधुनच येणारे ढ्ग आणि पाऊस.. आता सहा साडे सहा झाले होते.. इंडियाहाईक्स च्या अजुन २ गाड्या पण आल्या.. रस्ता पुन्हा चालू व्हायचे काही चिन्ह नव्हते.. आता खरे आम्हाला कळत होते की हिमालयात प्रवास करणे म्हणजे काय आहे ते.. आणि एकदा अंधार झाला की रस्ता उघड्णे कठीण..खरे तर गोविंद घाट इथून फक्त २० मिनिटांवर होता पण तरी आता तो खूपच लांब आहे असे वाटत होते..  सर्व ड्रायव्हर लोकांचे बेस कॅम्प शी बोलणे झाले.. ठरले.. गाड्या काढायच्या.. कुठे लँडस्लाइड लागलीच तर.. पलीकडच्या बाजू पर्यंत बेस कॅम्प वरील गाड्या येतील घ्यायला.. तेवढे अंतर पायी चालायचे..

इथून पुढचा २० मिनिटांचा प्रवास खूपच थ्रिलिंग होता.. आम्ही नदी पात्रा पासून साधारण १५०० फुट उंचीवर असु..त्या उंची पासून आम्ही एक १० मिनिटात नदी पात्राच्या पातळी पर्यंत आलो..समोरून  एक स्टील चा ब्रिज क्रॉस करून पुढे आलो.... वरुन खाली येताना आम्हाला तो ब्रिज आणि वाहने दिसत होती.. रस्ता क्लीयर झाला आहे हे वरुनच कळत होते.. पुढे एक किमी वर जिथे रस्ता बंद झाला होता तो भाग लागला... अंधार पडायला जस्ट सुरूवात झाली होती.. उजवी कडे नदीचा खळाळ...आणि रस्ता... नाही रस्ता नाहीच तो चिखल.. जेमतेम एक गाडी जाईल एवढी जागा.. वरुन आलेले हे भले मोट्ठे खडक आणि पाऊस... हे खरोखर अक्षरश: "ब्रेथ टेकिंग" होते... तो भाग क्रॉस केला आणि पुढे १० मिनिटातच गोविंदघाट ला पोहोचलो.. संध्याकाळचे ७.३० झाले असतील.. १३ तास २७० किमी. हुश्ष्श...

क्रमश:

2 comments:

  1. पुढलं वाचायला आवडेल

    ReplyDelete
  2. अप्रतिम... पुढलं वाचायला आवडेल

    ReplyDelete