Tuesday, June 28, 2022

आनंदाचे डोही.. आनंद तरंग -१

 आनंदाचे डोही.. आनंद तरंग -१


जून महिना सुरू झाला की पावसा बरोबरच वेध लागतात ते आषाढी वारीचे.. गेली अनेक वर्षं वारीचा अनुभव घेतोय पण वृत्तपत्र, बातम्या, आणि अलीकडे फेसबुक दिंडी मार्गे. तसंच दर वर्षी माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी मार्गाचे आणि रोजच्या वाटचालीचा-मुक्काम विसावा-पुढील मुक्काम, गोल रिंगण-उभे रिंगण, नीरा स्नान, धावा या सर्व बातम्या वाचायचा माझा कयास असतो.. 


पण ह्या वर्षी पुण्यात आल्याने वारीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल असे मनोमन वाटत होते.. २० किंवा २१ तारखेस तुकोबारायांच्या पादुकांनी प्रस्थान ठेवले, त्या नंतर दुसऱ्या दिवशी माऊलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. बुधवारी दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी येणार होत्या. पुण्यात दोन दिवस पालख्यांचा मुक्काम असतो... भवानी पेठेत माऊलींचा आणि अगदी जवळच नाना पेठेत तुकोबांचा. 


गुरुवारी पालखी मुक्कामी जायचा योग आला. मुक्काम असल्या मुळे सर्व दिंड्या आणि वारकरी निवांत होते.. वारी ला जत्रेचे स्वरूप आले होते.. प्रत्यक्ष वारीत चालायचा योग नव्हता तरी, पूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.. कोरोना मुळे दोन वर्षानंतर वारी होत असल्याने, पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक मोठ्या प्रमाणात होते.. वारकरी त्यांच्या मुक्कामी निवांत होते.. 


बऱ्याच वारकाऱ्यांशी, विक्रेत्यांशी, टिळे लावणाऱ्यांशी बोलता आले.. खरा महाराष्ट्र कसा आहे हे अनुभवण्यासाठी वारीत नक्कीच जायला हवे.. कोल्हापूर-सोलापूर-लातूर-जालना-नांदेड-यवतमाळ-बुलढाणा येथून आलेले वारकरी, विक्रेते भेटले.. 


काही ठिकाणी पाऊस चांगला झाला होता तर काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्या मुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. 


वारी म्हणजे दरवर्षी भरणारा महाराष्टीतील कुंभमेळा असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.. दूरगावचे नातेवाईक-मित्र हमखास भेटण्याचे  ठिकाण म्हणजे वारी.. 


असे कित्येक नातेवाईक-आप्तेष्ट-मित्र या वेळी दोन वर्षांनंतर या वेळी वारीत भेटत होते.. 


तसेच वारी म्हणजे मार्केटिंग आणि फोटोग्राफी मधील विद्यार्थी-प्रशिक्षणार्थी-व्यावसायिक यांसाठी म्हणजे न चुकता येणारी इव्हेंट आहे.. बरेच फोटोग्राफर्स ग्रुप करून वारी कव्हर करत होते.. वारकऱ्यांच्या भावमुद्रा, फेटे, तुळशी वृंदावन हे सर्व त्यांच्या लेन्स मध्ये सामावून घ्यायचा प्रयत्न करत होते.. 


काही तरुण वारकरी असतील तरी मोठ्या प्रमाणावर वर्षानुवर्षे वारी करणारे अनुभवी वारकरी होते. त्यांच्या चेहेऱ्याच्या सुरकुत्यांमागे न जाणे कित्येक वर्षांचा अनुभव होता.  


फिनोलेक्स कंपनीचं मार्केटिंग अचूक होतं.. वर्षानुवर्षे शेती कामांची उत्पादने.. मुख्यत्वे पाईप्स विकून त्यांना वारकऱ्यांची पल्स माहीत होती.. महिला वारकरी त्यांचं समान सहसा डोक्यावर घेऊन चालतात. त्यांनी मोठी पिशवी अशी सुंदर डिझाइन केली होती कि, पिशवी डोक्यावर घेतल्यावर विठ्ठल-रखुमाईच डोक्यावर आहेत असं दिसत होतं.. आणि वारकरी विठ्ठल-राखुमाईना देखील डोक्यावरच घेऊन चालतात.


जत्रे मध्ये वासुदेव ही होते.. पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा लांब झगा-डोक्यावर मोरपिसांची टोपी-कपाळावर गंध, गळ्यात विविध प्रकारच्या माळा, ओठी अभंग किंवा ओव्या आणि  एका हातात टाळ आणि दुसऱ्या हातात चिपळ्या..असे वासुदेवाचे लोभस रुपडे होते..वासुदेव त्यांच्या बोटात छोटा टाळ घालतात.. त्या छोट्या टाळ-चिपळ्यांमुळे वेगळ्याच प्रकारचा नाद निर्माण होत होता.. 


एक वासुदेव आणि त्यांचा मित्र चहा पीत गप्पा मारत होते..दोघेही लातूर कडून आले होते.. मित्र वासुदेवा कडे तक्रार करत होता.. बरेच दिवसात त्यांच्या गावी गेला नाही भेटायला म्हणून.. मी सहजच विचारलं.. वारी झाली की काय करता ?.. असाच फिरतो गावो-गावी... "तुका म्हणे उगी राहावे... जे जे होईल ते ते पाहावे..." आता सरकारचं पण बघूया काय होतंय ते..


सकाळी पालखी मुक्कामी जाताना एक माऊली रस्त्याच्या कडेला उभे होते.. वाटलं वारकरी दिसताहेत पालखी मुक्कामी येत असावेत.. म्हणून विचारलं.. तर म्हणाले.. माऊलींच्या दर्शनाला जातोय.. 


म्हंटलं चला..मी पण तिकडेच चाललोय. 


माऊली स्वतः कीर्तनकार होते..मी विचारलं आता वारीत पुढे जाणार का ? 


"हो.."


मी विचारलं कुठ पर्यंत जाणार ? पंढरपूर का ?


"तो विचार आपण नाही करायचा.. माऊली नेतील तिथ पर्यंत जायचं.."


सर्व वारकरी मंडळींना इतका अनुभव असतो की त्यांच्या रुपात मोटिव्हेशनल स्पीकर किंवा मॅनेजमेंट गुरूच आपल्याला भेटतात..


भवानी पेठेतील पालखी मंदिरात माऊली विसावतात..आणि नाना पेठेत तुकोबा.. 


घरच्या झाडाची चाफ्याची फुलं घेतली होती.. माऊलीसांठी ती रांगेतील माऊलींना वाहायला दिली आणि तुकोबांच्या मुक्कामी गेलो.. जवळ असून देखील बरंच फिरत फिरत गेलो.. दर्शन बाहेरूनच घेतलं.. आहि वेळानी लक्षात आलं की फुलं द्यायची राहिली.. मग ती फुलं देखील रांगेतील एका माऊलींना दिली आणि घरा कडे निघालो.. 


क्रमशः


सं.वि.दे २८/६/२०२२


Monday, June 20, 2022

जोसे मोरिनियो - "द स्पेशल वन"

 दुभाष्या (ट्रान्सलेटर) ते जग प्रसिद्ध आणि मुख्य म्हणजे कायम बातम्यांमध्ये असणे आवडणारा आणि भरमसाठ इगो असणारा (जे जोसे स्वतः मान्य करतो) आणि पोर्तो सारख्या टीम ला घेऊन युनायटेड ला हरवणारा अवलिया. कोणे एके काळी बार्सिलोनाचा सहा. प्रशिक्षक ते कट्टर शत्रू ही एक वेगळीच कथा 

कधी खेळाडू म्हणून खास नव्हता... पण चांगला प्रशिक्षक होईल असे गुण आधी पासूनच जोसे कडे होते.. ज्या साठी त्याने व्यवसायिक प्रशिक्षण देखील घेतले. जोसे चे वडील देखील पोर्तुगाल मध्ये फुटबॉल प्रशिक्षक होते. जेंव्हा पोर्तो चे प्रशिक्षक म्हणून आले तेंव्हा पोर्तो चा संघ कामगिरी करत नव्हता 
अनोळखी आणि महाग नसलेले प्लेयर्स घेऊन चषक जिंकणे ही जोसे ची खासियत. आधी पोर्तो बरोबर पोर्तुगीज लीग आणि नंतर २००३ मध्ये चॅम्पियन्स लीग जिंकून जागतिक फुटबॉल च्या नकाशावर स्वतः चे नाव कोरले आणि पाय भक्कम केले 
चेलसी ऑइल रिच रशियन ओलीगार्च रोमन अब्राहोमोविच नि विकत घेतल्या वर २००४ साली जोसे ला प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. पहिल्याच पत्रकार परिषदेत स्वतःला 'स्पेशल वन' म्हणून बिरुद दिल्या नंतर पूर्ण प्रीमियर लीग मध्ये आता हलचल होणार हे स्पष्ट होते. सर अॅलेक्स नि देखील ह्याची दखल घेतली 
सलग दोन वर्षे प्रीमियर लीग विजेते पद, त्यात असंख्य रेकॉर्डस्, गोल्स, मॅचेस आणि स्टॅमफर्ड ब्रिज वर एकही मॅच न हरण्याचा विक्रम.. चेलसी बरोबर चॅम्पिअन्स लीग जिंकता आली नाही पण, ड्रॉग्बा, इसिएन, माकेलेले सारखे खेळाडू घडवले.. 
चॅम्पियन्स लीग मध्ये विवादामुळे, मज्जाव केल्या नंतर, लाँड्री ट्रॉली मधून ड्रेसिंग रूम मध्ये आलेला अवलिया ही कथा अजबच..त्याच्या आवडत्या खेळाडूंना नेहेमीच बॅक करणारा मॅनेजर..तिसऱ्या वर्षी रोमन बरोबर महागडे खेळाडू घेऊन फाटले तरी लीग कप आणि एफ ए कप जिंकला. २००७ साली चेलसी मधून बाहेर 
इंटर बरोबर एटो, मतेराझी, मिलितो, शनायडर बरोबर २०१० साली चॅम्पियन्स लीग आणि ट्रेबल जिंकण्याचा भीम पराक्रम करून रियाल माद्रिद ..जगातील तथा कथित सर्वात मोठ्या क्लब ची धुरा सांभाळायला गेला. 
ही कारकीर्द खूप वादाची राहिली..जोसे ने स्पॅनिश फुटबॉल मध्ये दुही पाडली हा आरोप त्या वर अजूनही होतो. तरीही इथे त्याने ला लिगा आणि कोपा देल रिया जिंकली.. 
२०१३ साली द स्पेशल वन पुन्हा त्याच्या घरी म्हणजेच चेलसी मध्ये जॉईन झाला.. पहिल्या वर्षी ३ऱ्या नंबर वर (लिटिल हॉर्स) येऊन लिव्हरपूल ला विजेते पदा पासून दूर केले..आणि २०१४ साली डियेगो कोस्ता सारखा स्ट्रायकर आणि हजार्ड सारखा ड्रीब्लर घेऊन चेलसी बरोबर तिसऱ्यांदा प्रीमियर लीग जिंकला. 
पुढील सिझन मध्ये म्हणजेच अडीच वर्षा नंतर लीग टेबल मध्ये १० व्या क्रमांकावर फेकल्या गेल्या नंतर जोसे ला पुन्हा एकदा चेलसी सोडावी लागली.. सर अॅलेक्स ना जोसे बद्दल नेहेमीच आपुलकी होती आणि त्या मुळेच २०१६ साली युनायटेड मध्ये रुजू झाला.. २०१७ साली युरोपा लीग जिंकली. 
या वेळी जोसे ने त्याचा फेवरेट इब्रा ला युनायटेड मध्ये आणले. २०१८ साली युनायटेड लीग टेबल मध्ये दुसरी आली ही त्याची युनायटेड साठी तेंव्हाच्या टीम बद्दलची सर्वोत्तम कामगिरी होती असे म्हंटल्या वर त्यावर खूप टीका झाली.. पण ती गोष्ट आजतागायत खरी आहे.. 
पुन्हा टू अँड हाफ यिअर्स इच नंतर जोसे नि युनायटेड सोडली आणि काही अवकाशा नंतर तोतनहम म्हणजेच स्पर्स जॉईन केली.. स्पर्स ने नुकतेच पोचेतीनो ला काढले होते.. स्पर्स इतके कम नशिबी आहेत की जोसे च्या पूर्ण कारकिरर्दीत ती एकच अशी टीम आहे ज्या बरोबर तो ट्रॉफी जिंकू शकला नाही.. 
हॅरी केन, सॉन सारखे स्ट्रायकर गोल्डन बूट मिळवतील पण ट्रॉफी नाही जिंकू शकत.. अजूनही त्यांची ट्रॉफी कॅबिनेट रिकामीच आहे..

मे २०२१ मध्ये जोसे नि अतिशय रिच लिगसी आणि फॅन फॉलोइंग असलेला, टोट्टी ज्याची ओळख होता तो इटालियन क्लब रोमा जॉईन केला.. 
मिखीतरीयन, टॅमी अब्राहम आणि स्मॉलिंग हे प्लेयर्स होते.. रोमा ने बरेच वर्षात कुठली ट्रॉफी जिंकली नव्हती.. या वेळी देखील ते कुठली जिंकतील असे कोणाला वाटत नव्हते.. काही वर्षा पूर्वी बार्सिलोना ला चॅम्पियन्स लीग मधून बाहेर काढायचा पराक्रम त्यांनी केला होता. 
युरोपा कॉन्फरन्स लीग ही नवी स्पर्धा (3rd tier) युएफआ ने या वर्षी सुरू केली..सेमी फायनल ला लिस्टर ला हरवल्या नंतर मला कळाले की अशी कुठली स्पर्धा आहे आणि जोसे आता पुन्हा एक ट्रॉफी जिंकायची शक्यता निर्माण झाली..फायनल फेयेनूर्ड बरोबर 
सेमी फायनल नंतर जोसे ला रडताना बघून पूर्वीचा जोसे आठवला.. त्याच्या सर्व प्रेस कॉन्फरन्स स्पेशल वन, स्पेशालिस्ट इन फेल्युअर, थ्री लिटिल होर्सेस, नथींग टू से, फुटबॉल हेरिटेज, ३-० रिस्पेक्ट रिस्पेक्ट रिस्पेक्ट .. या सर्व डोळ्यासमोर आल्या.. 
आता पुन्हा एका ट्रॉफीवर जोसे त्याचं नाव कोरणार होता.. आणि तो जिंकला.. पुन्हा एकदा.. पहिला मॅनेजर जो तिन्ही युरोपियन लीग आणि एकत्रित ५ युरोपियन लीग जिंकला..
रिस्पेक्ट..रिस्पेक्ट..रिपेक्ट 
जोसे ची कारकीर्द कायम वादात होती त्या मुळे सर्व क्रीडा पत्रकारांचा तो नेहेमीच फेव्हरेट होता आणि राहील... आपल्याला न आवडणारे खेळाडू त्याने नेहेमीच खड्या सारखे बाजूला केले, माटा, ल्युक शा, इकर कासियास ही त्याची उदाहरणे.. 


"माचीवरला बुधा" ते "कुणा एकाची भ्रमणगाथा"

आज माचीवरला बुधा वाचल्या नंतर पहिल्यांदा ट्रेन ने प्रवास करायचा योग आला.. आता पुण्याला आल्या नंतर.. इंद्रायणी/डेक्कन च्या ऐवजी सिंहगड पकडली..शिवाजी नगर ला पोहोचे पर्यंत पाऊस लागला..

कामशेत येई पर्यंत नुकत्याच सुरू झालेल्या पावसाच्या खुणा दिसत होत्या.. पेरणी केलेल्या भाताच्या दाढी हिरव्या कंच झाल्या होत्या. कामशेत स्टेशन शेजारची नदी अगदी तुडुंब भरली होती. पेरणी साठी पाणी सोडलं असावं बहुतेक.

लोणावळा सोडलं तसं आपोआप पाय डब्याच्या दाराजवळ आले. खंडाळा मागे पडल्यावर ट्रेन आणि अमृतांजन जवळील एक्सप्रेस वे चा पट्टा दृष्टीक्षेपात आला.
डावीकडे नागफणी (ड्युक्स नोज) चा कडा आणि पुढील बोगदा गेल्यावर खोपोलीचे विहंगम दृश्य दिसले.. पावसाच्या सीझन मुळे सर्व घरं, इमारतींचे माथे ताडपत्री मुळे निळे दिसत होते..
पुढे मंकी हिल ला गाडी थांबल्यावर वानर महाराजांचे दर्शन झाले. गाडी जशी पुढे सरकू लागली तशी निसर्गाने कूस बदलली.
डोंगररांगा-कड्यांमध्ये हिरव्या रंगाची शेड दिसू लागली होती..उजवी कडी उल्हास दरी मध्ये काही ढगांनी डी-टूर केली होती.. गाडी बोगदे पार करता करता राजमाची ची चाहूल लागली. पाऊस पडून गेल्या मुळे श्रीवर्धन आणि मनरंजन लांबूनच दिसू लागले..
गाडी जसजशी बोगदे मागे टाकत पुढे जाऊ लागली, राजमाची अजूनच जवळ येऊ लागली. मनात टेम्बलाई चं पठार, बोम्बल्यांचा झाप, बुधाची झोपडी-खार-चिमण्या-शेळ्या-आवळी आणि कुत्रा घोळू लागले.
राजमाची वर बुधा कुठेतरी त्याच्या रोजच्या विमानाची वाट बघत उभा असेल असं वाटून गेलं. डोळे त्याला शोधत होते 
तिसरा ब्रेकिंग हॉल्ट झाला, तशी राजमाची मागे पडली आणि कोकण (कर्जत) दिसू लागलं. नांगरलेली शेतं, पेरणी झालेल्या दाढी यांमुळे वेगळीच नक्षी तयार झाली होती. तिथे पण नकळत बुधाचे मिलिटरी वाले दिसताहेत का असं वाटून गेलं. 
गाडी हलली आणि मी माझ्या जागेवर येऊन बसलो... गोनीदांबरोबर "कुणा एकाची भ्रमणगाथा" (नर्मदा परिक्रमा) सुरू करायला. 






Saturday, June 18, 2022

माचीवरला बुधा आणि योगायोग


 माचीवरला बुधा आणि योगायोग:

काही दिवसांपूर्वी 'माचीवरल्या बुधा'शी ओळख @sunandanlele यांच्या एका व्हिडीओ ब्लॉग वरून झाली..त्या नंतर ट्विटर मित्र @amlya02 यांच्या संभाषणात देखील बुधाचा रेफरन्स आला, दुवा होता- प्रवासवारी (wanderingsanket.blogspot.com) मधील राजमाची चा उल्लेख
उत्सुकता चाळवल्याने ऍमेझॉन वरून मागवलं, थोडं वाचलं आणि स्टोरीटेल थोडं वर ऐकलं

गोनीदांच्या लिखाणात फक्त प्रवास वर्णनच नाही तर व्यक्ती वर्णन, प्राणी-पक्षी वर्णन एवढं जिवंत आहे की बुधा, राजमाची, टेम्बलयी चं पठार, बुधाचा कुत्रा, खारी, शेळ्या-मेंढ्या म्हैस डोळ्यासमोर उभे राहिले
त्यातील काही शब्द, जसे- झाप, हरीख, पावटी, किंजळ आणि अनेक असे @MarathiDeadpool यांच्या कडूनच समजून घ्यावे लागतील.

आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे, आज साप्ताहिक सकाळ मध्ये आलेला अंजली काळे यांचा राजमाची वरील लेख..
अश्या योगायोगांमुळे बुधा बरोबर नक्कीच काहीतरी ओळख असावी  असे वाटून गेले.

मागे मी राजमाची ट्रेक कर्जत च्या बाजूने केला होता... पण बुधा वाचल्याने आता लोणावळ्या कडून जाण्याची ओढ लागली आहे..

बघूया या पावसाळ्यात बुधाला प्रत्यक्ष भेटायचा योग जमतोय का ते.
#म #माचीवरलाबुधा #गोनीदा

Tuesday, June 7, 2022

रुसलेली लोकल


 लॉक डाऊन च्या आधी लोकल आणि "फर्स्ट क्लास कट आणि हँडीकॅप्पड डब्बा" ह्या गोष्टी जगण्यातील अविभाज्य घटक होत्या.. सकाळी ऑफिस ला जाताना आधी ७.४४ जी कालांतराने ७.३४ झाली...कट डब्ब्यात चढून डब्याच्या शेवटच्या बाजू ची विंडो म्हणजे ग्रुप ची फिक्स जागा..

येताना लोकल कुठलीही असली तरी डब्बा ठरलेला.. हँडीकॅप्पड सेक्शन च्या मागे जनरल.. इथे बसायचं कारण म्हणजे एगझिट ला लागून मोठ्ठी जाळी असल्याने हवेशीर जागा..

मुंबई लोकल ने खूप मित्र दिले ..असे मित्र जे फक्त लोकल पुरतेच मर्यादित न राहता मित्रांच्या परिवरासाहित एक मोठ्ठं कुटुंब झालं..
लोकल मधील मित्रांना वयाची चौकट नव्हती.. वय वर्षं २० पासून ६० पर्यंत सगळे मित्रच..लोकल ने अनेक सुंदर आठवणींचे क्षण दिले.. वाढदिवस, दसरा, सेवा-निवृत्ती, अनेक..खाबूगिरीची तर विचारता सोय नाही.. मग ते घरून आणलेले डब्बे असोत की रामश्रय, लाडू सम्राट, आराम मध्ये केलेली न्याहारी..
सकाळी ऑफिस ला जाताना कधीच झोपलो नाही..भंकस-टाईमपास-चर्चा-वादविवादांमध्ये कल्याण ते सीएसएमटी प्रवास कधी व्हायचा कधी कळायचं नाही.. येताना मात्र विंडो सीट मधली झोप हक्काची.. कसं काय माहित पण सायन क्रॉस होऊन कुर्ला येई पर्यंत जी झोप लागायची ती थेट ठाणे आऊटर ला गाडी थांबे पर्यंत..
आणि ती झोप क मा ल लागायची.. त्याची तोड रात्रभर झोपून सकाळी उशिरा उठलं तरी नाही..

१६ मार्च २०२० ला लॉक डाऊन च्या आधीचा शेवटचा प्रवास झाला. लॉक डाऊन लागलं आणि सगळंच गंडलं.. त्या नंतर लोकल चालू झाल्या नंतर काही कामा साठी जायला लागल्याचा अपवाद वगळला, तर लोकल रुसलेलीच होती..
आता देखील लोकल दिसली तरी डोळ्यात टचकन पाणी आल्याशिवाय राहत नाही..

Sunday, June 5, 2022

#प्रवासवारी



 #प्रवासडायरी आज कल्याण होऊन पुण्याला कोणार्क एक्सप्रेस नि यायचा योग आला.. सुटीचा शेवटचा दिवस असल्या मुळे तत्काळ मध्ये जे मिळालं ते काढलं.. घाटात उल्हास दरी आणि राजमाची परिसर सुंदर आणि झाडी देखील हिरवी गार होती. करपलेली जमीन पावसाची आतुरतेने वाट पाहत होती

पूर्वी कोड्रिंक वाले खूप असायचे..अल्युमिनियम ची बादली. त्यात बर्फ आणि भोवती गोल्डस्पॉट, मँगोला, लिम्का, एनर्जी च्या काचेच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंक वाला तो यायची दवंडी ओपनर नि बाटल्यांवर टिरनिंग-टिरनिंग आवाज करून पिटायचा. आता प्लास्टिक बाटल्यांच्या जमान्यात ते सगळं काळात जमा झालं
कर्जत नंतर या दिवसात करवंद, जांभळं घेऊन पाड्यातल्या मावश्या यायच्या. हल्ली पण असतात.. आज गोड जांभळं मिळाली.. पण झाडांच्यापानात केलेला द्रोण नाही.. कधी कधी मिळतात द्रोणात.. डेक्कन एक्सप्रेस पाड्यांवर थांबते.. तिच्यात मिळायची शक्यता जास्त