आनंदाचे डोही.. आनंद तरंग -१
जून महिना सुरू झाला की पावसा बरोबरच वेध लागतात ते आषाढी वारीचे.. गेली अनेक वर्षं वारीचा अनुभव घेतोय पण वृत्तपत्र, बातम्या, आणि अलीकडे फेसबुक दिंडी मार्गे. तसंच दर वर्षी माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी मार्गाचे आणि रोजच्या वाटचालीचा-मुक्काम विसावा-पुढील मुक्काम, गोल रिंगण-उभे रिंगण, नीरा स्नान, धावा या सर्व बातम्या वाचायचा माझा कयास असतो..
पण ह्या वर्षी पुण्यात आल्याने वारीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल असे मनोमन वाटत होते.. २० किंवा २१ तारखेस तुकोबारायांच्या पादुकांनी प्रस्थान ठेवले, त्या नंतर दुसऱ्या दिवशी माऊलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. बुधवारी दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी येणार होत्या. पुण्यात दोन दिवस पालख्यांचा मुक्काम असतो... भवानी पेठेत माऊलींचा आणि अगदी जवळच नाना पेठेत तुकोबांचा.
गुरुवारी पालखी मुक्कामी जायचा योग आला. मुक्काम असल्या मुळे सर्व दिंड्या आणि वारकरी निवांत होते.. वारी ला जत्रेचे स्वरूप आले होते.. प्रत्यक्ष वारीत चालायचा योग नव्हता तरी, पूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.. कोरोना मुळे दोन वर्षानंतर वारी होत असल्याने, पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक मोठ्या प्रमाणात होते.. वारकरी त्यांच्या मुक्कामी निवांत होते..
बऱ्याच वारकाऱ्यांशी, विक्रेत्यांशी, टिळे लावणाऱ्यांशी बोलता आले.. खरा महाराष्ट्र कसा आहे हे अनुभवण्यासाठी वारीत नक्कीच जायला हवे.. कोल्हापूर-सोलापूर-लातूर-जालना-नांदेड-यवतमाळ-बुलढाणा येथून आलेले वारकरी, विक्रेते भेटले..
काही ठिकाणी पाऊस चांगला झाला होता तर काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्या मुळे पेरण्या खोळंबल्या होत्या.
वारी म्हणजे दरवर्षी भरणारा महाराष्टीतील कुंभमेळा असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.. दूरगावचे नातेवाईक-मित्र हमखास भेटण्याचे ठिकाण म्हणजे वारी..
असे कित्येक नातेवाईक-आप्तेष्ट-मित्र या वेळी दोन वर्षांनंतर या वेळी वारीत भेटत होते..
तसेच वारी म्हणजे मार्केटिंग आणि फोटोग्राफी मधील विद्यार्थी-प्रशिक्षणार्थी-व्यावसायिक यांसाठी म्हणजे न चुकता येणारी इव्हेंट आहे.. बरेच फोटोग्राफर्स ग्रुप करून वारी कव्हर करत होते.. वारकऱ्यांच्या भावमुद्रा, फेटे, तुळशी वृंदावन हे सर्व त्यांच्या लेन्स मध्ये सामावून घ्यायचा प्रयत्न करत होते..
काही तरुण वारकरी असतील तरी मोठ्या प्रमाणावर वर्षानुवर्षे वारी करणारे अनुभवी वारकरी होते. त्यांच्या चेहेऱ्याच्या सुरकुत्यांमागे न जाणे कित्येक वर्षांचा अनुभव होता.
फिनोलेक्स कंपनीचं मार्केटिंग अचूक होतं.. वर्षानुवर्षे शेती कामांची उत्पादने.. मुख्यत्वे पाईप्स विकून त्यांना वारकऱ्यांची पल्स माहीत होती.. महिला वारकरी त्यांचं समान सहसा डोक्यावर घेऊन चालतात. त्यांनी मोठी पिशवी अशी सुंदर डिझाइन केली होती कि, पिशवी डोक्यावर घेतल्यावर विठ्ठल-रखुमाईच डोक्यावर आहेत असं दिसत होतं.. आणि वारकरी विठ्ठल-राखुमाईना देखील डोक्यावरच घेऊन चालतात.
जत्रे मध्ये वासुदेव ही होते.. पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा लांब झगा-डोक्यावर मोरपिसांची टोपी-कपाळावर गंध, गळ्यात विविध प्रकारच्या माळा, ओठी अभंग किंवा ओव्या आणि एका हातात टाळ आणि दुसऱ्या हातात चिपळ्या..असे वासुदेवाचे लोभस रुपडे होते..वासुदेव त्यांच्या बोटात छोटा टाळ घालतात.. त्या छोट्या टाळ-चिपळ्यांमुळे वेगळ्याच प्रकारचा नाद निर्माण होत होता..
एक वासुदेव आणि त्यांचा मित्र चहा पीत गप्पा मारत होते..दोघेही लातूर कडून आले होते.. मित्र वासुदेवा कडे तक्रार करत होता.. बरेच दिवसात त्यांच्या गावी गेला नाही भेटायला म्हणून.. मी सहजच विचारलं.. वारी झाली की काय करता ?.. असाच फिरतो गावो-गावी... "तुका म्हणे उगी राहावे... जे जे होईल ते ते पाहावे..." आता सरकारचं पण बघूया काय होतंय ते..
सकाळी पालखी मुक्कामी जाताना एक माऊली रस्त्याच्या कडेला उभे होते.. वाटलं वारकरी दिसताहेत पालखी मुक्कामी येत असावेत.. म्हणून विचारलं.. तर म्हणाले.. माऊलींच्या दर्शनाला जातोय..
म्हंटलं चला..मी पण तिकडेच चाललोय.
माऊली स्वतः कीर्तनकार होते..मी विचारलं आता वारीत पुढे जाणार का ?
"हो.."
मी विचारलं कुठ पर्यंत जाणार ? पंढरपूर का ?
"तो विचार आपण नाही करायचा.. माऊली नेतील तिथ पर्यंत जायचं.."
सर्व वारकरी मंडळींना इतका अनुभव असतो की त्यांच्या रुपात मोटिव्हेशनल स्पीकर किंवा मॅनेजमेंट गुरूच आपल्याला भेटतात..
भवानी पेठेतील पालखी मंदिरात माऊली विसावतात..आणि नाना पेठेत तुकोबा..
घरच्या झाडाची चाफ्याची फुलं घेतली होती.. माऊलीसांठी ती रांगेतील माऊलींना वाहायला दिली आणि तुकोबांच्या मुक्कामी गेलो.. जवळ असून देखील बरंच फिरत फिरत गेलो.. दर्शन बाहेरूनच घेतलं.. आहि वेळानी लक्षात आलं की फुलं द्यायची राहिली.. मग ती फुलं देखील रांगेतील एका माऊलींना दिली आणि घरा कडे निघालो..
क्रमशः
सं.वि.दे २८/६/२०२२
No comments:
Post a Comment