Monday, June 20, 2022

"माचीवरला बुधा" ते "कुणा एकाची भ्रमणगाथा"

आज माचीवरला बुधा वाचल्या नंतर पहिल्यांदा ट्रेन ने प्रवास करायचा योग आला.. आता पुण्याला आल्या नंतर.. इंद्रायणी/डेक्कन च्या ऐवजी सिंहगड पकडली..शिवाजी नगर ला पोहोचे पर्यंत पाऊस लागला..

कामशेत येई पर्यंत नुकत्याच सुरू झालेल्या पावसाच्या खुणा दिसत होत्या.. पेरणी केलेल्या भाताच्या दाढी हिरव्या कंच झाल्या होत्या. कामशेत स्टेशन शेजारची नदी अगदी तुडुंब भरली होती. पेरणी साठी पाणी सोडलं असावं बहुतेक.

लोणावळा सोडलं तसं आपोआप पाय डब्याच्या दाराजवळ आले. खंडाळा मागे पडल्यावर ट्रेन आणि अमृतांजन जवळील एक्सप्रेस वे चा पट्टा दृष्टीक्षेपात आला.
डावीकडे नागफणी (ड्युक्स नोज) चा कडा आणि पुढील बोगदा गेल्यावर खोपोलीचे विहंगम दृश्य दिसले.. पावसाच्या सीझन मुळे सर्व घरं, इमारतींचे माथे ताडपत्री मुळे निळे दिसत होते..
पुढे मंकी हिल ला गाडी थांबल्यावर वानर महाराजांचे दर्शन झाले. गाडी जशी पुढे सरकू लागली तशी निसर्गाने कूस बदलली.
डोंगररांगा-कड्यांमध्ये हिरव्या रंगाची शेड दिसू लागली होती..उजवी कडी उल्हास दरी मध्ये काही ढगांनी डी-टूर केली होती.. गाडी बोगदे पार करता करता राजमाची ची चाहूल लागली. पाऊस पडून गेल्या मुळे श्रीवर्धन आणि मनरंजन लांबूनच दिसू लागले..
गाडी जसजशी बोगदे मागे टाकत पुढे जाऊ लागली, राजमाची अजूनच जवळ येऊ लागली. मनात टेम्बलाई चं पठार, बोम्बल्यांचा झाप, बुधाची झोपडी-खार-चिमण्या-शेळ्या-आवळी आणि कुत्रा घोळू लागले.
राजमाची वर बुधा कुठेतरी त्याच्या रोजच्या विमानाची वाट बघत उभा असेल असं वाटून गेलं. डोळे त्याला शोधत होते 
तिसरा ब्रेकिंग हॉल्ट झाला, तशी राजमाची मागे पडली आणि कोकण (कर्जत) दिसू लागलं. नांगरलेली शेतं, पेरणी झालेल्या दाढी यांमुळे वेगळीच नक्षी तयार झाली होती. तिथे पण नकळत बुधाचे मिलिटरी वाले दिसताहेत का असं वाटून गेलं. 
गाडी हलली आणि मी माझ्या जागेवर येऊन बसलो... गोनीदांबरोबर "कुणा एकाची भ्रमणगाथा" (नर्मदा परिक्रमा) सुरू करायला. 






No comments:

Post a Comment