Monday, June 12, 2023

पुण्यनगरी पालखी मुक्काम २०२३

 आज पुण्य नगरी चे वातावरण भक्तीमय झालंय.. भक्तिरसात न्हाऊन निघालीय म्हणा. माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्या आणि वारीतल्या असंख्य दिंड्या काल आणि आज पुण्यात विसावल्यात. माऊलींचा मुक्काम भवानी पेठेत आणि तुकोबांचा जवळच नाना पेठेत. 


ठिकठिकाणी वारकाऱ्यांसाठी मंडप उभारलेले, रस्त्याच्या दुतर्फा दिंड्यांचे ट्रक्स-त्यात पूर्ण संसार, पाण्याच्या टाक्या, स्वयंपाकाचे सामान, फळकटं टाकून केलेली झोपण्यासाठी जागा .. 


मी शंकरशेट रोड हून स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर, भवानी पेठेत बॅरिकेड्स टाकले होते त्या जवळ बाईक लावली आणि  तिथून जवळच आधी माऊलींच्या पादुका मंदिराचे आणि रथाचे दर्शन घेऊन पुढे तुकाराम महाराजांच्या रथाचे दर्शन घेऊन परत माऊलींच्या रथा जवळ येऊ असं ठरवलं. 


सकाळ पोहोचलो तर जत्रेतील बरीच दुकानांची लावायची तयारी सुरू होती.. गेल्यावेळ पेक्षा गर्दी कमी होती... १० दिवस आधी आणि त्यात पावसाने अजून पर्यंत दडी मारल्या मुळे अजून पेरण्या खोळंबल्यात म्हणून असेल.. 


पादुकांचे देवळात जाऊन दर्शन घेण्यासाठी दोन्ही देवळासाठी बरीच मोठी रांग होती.. त्यात गावाकडचे, शहराकडचे, अबाल-वृद्ध, कॉलेज कुमार-कुमारी असे सर्व होते..रांगेत भजन म्हणून रांग हळू हळू पुढे सरकत होती.


दर्शनाला येणाऱ्या लोकांची वासुदेवां बरोबर आणि तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन फोटो आणि सेल्फी घ्यायची लगबग चालू होती. पोलीस कर्मचारी त्यांचं काम चोख करत होती.. पण एवढया गर्दीत देखील राजकारण्यांना त्यांच्या गाड्यांचा ताफा पादुका मंदिरा पर्यंत आणायचा होता.. काय म्हणावं..

असो..


गेल्या वेळी नीरा नदी ते लोणंद वारीत सहभागी व्हायचा योग आला होता.. या वेळी बघू काय योग येतोय ते.. 


🙏🙏🙏

No comments:

Post a Comment