Friday, June 20, 2025

वारकरी संप्रदाय आणि स्टार्टअप इकोसिस्टीम: एका इन्व्हेस्टमेंट बँकरचच्या नजरेतून:

 🚩 वारकरी संप्रदाय आणि स्टार्टअप इकोसिस्टीम: एका इन्व्हेस्टमेंट बँकरचच्या नजरेतून: 


आज तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पुण्यात मुक्कामी येणार.


पुण्यनगरी पुढचे तीन दिवस पावसाबरोबरच भक्तीरसात न्हाऊन निघणार


मी investment banker असल्यामुळे

Startup founders, mentors, events, journeys – या सर्व गोष्टींशी नेहेमी संबंध येतो.


पण आज थोडा खोलवर विचार केला…

आणि जाणवलं –

Startup ecosystem ही काही आपल्या नविन गोष्ट नाही. आपल्या महाराष्ट्रात ही ecosystem कित्येक शतकांपासून आहे…


कुठली??


अहो आपली वारकरी ecosystem.


कुठल्याही ecosystem मध्ये काही मूलभूत घटक असतात.

आणि आश्चर्य म्हणजे, ते सगळे आपल्या वारकरी संप्रदायातही आहेत.


असं बघा हं...वारकरी म्हणजे founders –

वेगवेगळ्या गावांतून, पार्श्वभूमीतून, कल्पनांतून आलेले.

संत म्हणजे mentors –

वाट दाखवणारे, अर्थ समजावणारे, डगमगणाऱ्या पावलांना आधार देणारे.

आणि विठोबा माऊली –

ज्याच्याकडे सगळे पाहतात, त्याच्याशी नातं जुळवतात – Chief Mentor.


म्हणतात ना "A true leader creates more leaders."

आपल्या विठू माऊलीने देखिल नेमकं तेच केलं –

ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, संत चोखा मेळा, संत जनाबाई, एकनाथ, गोरा कुंभार, सोयराबाई…

एकेक संत तयार झाले, आणि एकेक वारी घडत गेली.

ही ecosystem इतकी समावेशक की जाती, लिंग, वय, भाषा काहीच अडथळा ठरत नाही.


जसं Startup ecosystem मध्ये annual flagship events असतात –

TiECon, TechSparks, YourStory –

तशीच आपली आषाढी वारी!

दरवर्षी महाराष्ट्राच्या आणि इतर राज्यांच्या कानाकोपऱ्यातून एकाच ध्येयासाठी लाखो प्रवासी निघतात –

नफा नाही, exit नाही – फक्त भेट व्हावी माऊलीची.


आता प्रश्न असा की –

सगळे वारकरी पंढरपूरला प्रत्यक्ष जातात का? नाही ना? पण त्यांना वाटतं – आपणही याच वारीचा एक भाग आहोत.


आणि पंढरीला गेले तरी कळसाचं दर्शन घेऊन विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाचं समाधान मानतात. 



तसंच आपल्यालाही वाटू शकतं – विठू माऊली पालखी मुक्कामी असेल,

तुळशीमाळ विकणाऱ्या माऊलीत असेल,

टाळ चिपळ्यांच्या गजरात असेल,

वाासुदेवाच्या हाकेच्या सूरात असेल,

किंवा आपल्या घराच्या कोपऱ्यात लावलेल्या एका दिव्यातही असेल…


चला तर मग,

या वर्षी वारी जशी जमेल तशी अनुभवूया.

टाळ वाजवून, दिवा लावून, किंवा फक्त मनात माऊली आठवून.


कारण आपण सगळेच प्रवासी आहोत –

कुणी स्टार्टअपच्या वारीत, तर कुणी विठोबाच्या.


✍🏻 संकल्पनेपासून समाधानापर्यंत – हीच खरी वारी.


संकेत विजयकुमार देशपांडे 

पुणे, कल्याण. 

२० जून २०२५


Wednesday, October 9, 2024

जेंव्हा मी RNT ना 'भेटलो'

 

जेंव्हा मी RNT ना 'भेटलो'
संकेत विजयकुमार देशपांडे, (कल्याण, पुणे)


आश्चर्य वाटलं ना वाचून. ऑगस्ट २००९ ची गोष्ट असेल. काही कामा निमित्त मी आणि माझा फोर्ट्रेस मधला कलीग-छत्रपाल, दादर मध्ये होतो. काम झाल्यावर शिवाजी पार्क जवळील आस्वाद हॉटेल मध्ये जायचं होतं. सेना भवन समोरील सिग्नल ला डिव्हायडर पाशी थांबलो होतो. तितक्यात एक आमच्या समोर एक मरसिडीज येऊन थांबते. सहज लक्ष गेलं तेंव्हा बघितलं तर मागच्या सीट वर RNT अर्थात साक्षात रतन नवल टाटा. आमची सहाजिक रिऍकशन त्यांना आदराने अभिवादन करण्याची होती. आम्ही स्मितहास्य ठेवून आदराने मान डोलावली (nodded in respect). आणि काय सांगता.. RNT' ची रिऍक्शन देखिल तशीच होती. त्यांनी देखिल ते अभिवादन स्वीकारलं आणि स्मित करून आमचं अभिवादन ऍकनॉलेज केलं. सिग्नल ग्रीन झाला आणि कार पुढे गेली.

ही घटना म्हटलं तर फक्त एखाद-दोन सेकंदाची.. पण त्याचा इम्पॅक्ट खूप होता. त्या पातळीवर असून देखिल त्यांचा नम्रपणा हा नेहेमीच लक्षात राहण्या सारखा होता.

आज RNT आपल्यामध्ये नाहीत.. पण त्यांची सभ्यपणा ची लीगसी नेहेमीच आपल्या बरोबर राहील.

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼

Monday, June 12, 2023

पुण्यनगरी पालखी मुक्काम २०२३

 आज पुण्य नगरी चे वातावरण भक्तीमय झालंय.. भक्तिरसात न्हाऊन निघालीय म्हणा. माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्या आणि वारीतल्या असंख्य दिंड्या काल आणि आज पुण्यात विसावल्यात. माऊलींचा मुक्काम भवानी पेठेत आणि तुकोबांचा जवळच नाना पेठेत. 


ठिकठिकाणी वारकाऱ्यांसाठी मंडप उभारलेले, रस्त्याच्या दुतर्फा दिंड्यांचे ट्रक्स-त्यात पूर्ण संसार, पाण्याच्या टाक्या, स्वयंपाकाचे सामान, फळकटं टाकून केलेली झोपण्यासाठी जागा .. 


मी शंकरशेट रोड हून स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर, भवानी पेठेत बॅरिकेड्स टाकले होते त्या जवळ बाईक लावली आणि  तिथून जवळच आधी माऊलींच्या पादुका मंदिराचे आणि रथाचे दर्शन घेऊन पुढे तुकाराम महाराजांच्या रथाचे दर्शन घेऊन परत माऊलींच्या रथा जवळ येऊ असं ठरवलं. 


सकाळ पोहोचलो तर जत्रेतील बरीच दुकानांची लावायची तयारी सुरू होती.. गेल्यावेळ पेक्षा गर्दी कमी होती... १० दिवस आधी आणि त्यात पावसाने अजून पर्यंत दडी मारल्या मुळे अजून पेरण्या खोळंबल्यात म्हणून असेल.. 


पादुकांचे देवळात जाऊन दर्शन घेण्यासाठी दोन्ही देवळासाठी बरीच मोठी रांग होती.. त्यात गावाकडचे, शहराकडचे, अबाल-वृद्ध, कॉलेज कुमार-कुमारी असे सर्व होते..रांगेत भजन म्हणून रांग हळू हळू पुढे सरकत होती.


दर्शनाला येणाऱ्या लोकांची वासुदेवां बरोबर आणि तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन फोटो आणि सेल्फी घ्यायची लगबग चालू होती. पोलीस कर्मचारी त्यांचं काम चोख करत होती.. पण एवढया गर्दीत देखील राजकारण्यांना त्यांच्या गाड्यांचा ताफा पादुका मंदिरा पर्यंत आणायचा होता.. काय म्हणावं..

असो..


गेल्या वेळी नीरा नदी ते लोणंद वारीत सहभागी व्हायचा योग आला होता.. या वेळी बघू काय योग येतोय ते.. 


🙏🙏🙏

Tuesday, June 28, 2022

आनंदाचे डोही.. आनंद तरंग -१

 आनंदाचे डोही.. आनंद तरंग -१


जून महिना सुरू झाला की पावसा बरोबरच वेध लागतात ते आषाढी वारीचे.. गेली अनेक वर्षं वारीचा अनुभव घेतोय पण वृत्तपत्र, बातम्या, आणि अलीकडे फेसबुक दिंडी मार्गे. तसंच दर वर्षी माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी मार्गाचे आणि रोजच्या वाटचालीचा-मुक्काम विसावा-पुढील मुक्काम, गोल रिंगण-उभे रिंगण, नीरा स्नान, धावा या सर्व बातम्या वाचायचा माझा कयास असतो.. 


पण ह्या वर्षी पुण्यात आल्याने वारीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल असे मनोमन वाटत होते.. २० किंवा २१ तारखेस तुकोबारायांच्या पादुकांनी प्रस्थान ठेवले, त्या नंतर दुसऱ्या दिवशी माऊलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. बुधवारी दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी येणार होत्या. पुण्यात दोन दिवस पालख्यांचा मुक्काम असतो... भवानी पेठेत माऊलींचा आणि अगदी जवळच नाना पेठेत तुकोबांचा. 


गुरुवारी पालखी मुक्कामी जायचा योग आला. मुक्काम असल्या मुळे सर्व दिंड्या आणि वारकरी निवांत होते.. वारी ला जत्रेचे स्वरूप आले होते.. प्रत्यक्ष वारीत चालायचा योग नव्हता तरी, पूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.. कोरोना मुळे दोन वर्षानंतर वारी होत असल्याने, पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक मोठ्या प्रमाणात होते.. वारकरी त्यांच्या मुक्कामी निवांत होते.. 


बऱ्याच वारकाऱ्यांशी, विक्रेत्यांशी, टिळे लावणाऱ्यांशी बोलता आले.. खरा महाराष्ट्र कसा आहे हे अनुभवण्यासाठी वारीत नक्कीच जायला हवे.. कोल्हापूर-सोलापूर-लातूर-जालना-नांदेड-यवतमाळ-बुलढाणा येथून आलेले वारकरी, विक्रेते भेटले.. 


काही ठिकाणी पाऊस चांगला झाला होता तर काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्या मुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. 


वारी म्हणजे दरवर्षी भरणारा महाराष्टीतील कुंभमेळा असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.. दूरगावचे नातेवाईक-मित्र हमखास भेटण्याचे  ठिकाण म्हणजे वारी.. 


असे कित्येक नातेवाईक-आप्तेष्ट-मित्र या वेळी दोन वर्षांनंतर या वेळी वारीत भेटत होते.. 


तसेच वारी म्हणजे मार्केटिंग आणि फोटोग्राफी मधील विद्यार्थी-प्रशिक्षणार्थी-व्यावसायिक यांसाठी म्हणजे न चुकता येणारी इव्हेंट आहे.. बरेच फोटोग्राफर्स ग्रुप करून वारी कव्हर करत होते.. वारकऱ्यांच्या भावमुद्रा, फेटे, तुळशी वृंदावन हे सर्व त्यांच्या लेन्स मध्ये सामावून घ्यायचा प्रयत्न करत होते.. 


काही तरुण वारकरी असतील तरी मोठ्या प्रमाणावर वर्षानुवर्षे वारी करणारे अनुभवी वारकरी होते. त्यांच्या चेहेऱ्याच्या सुरकुत्यांमागे न जाणे कित्येक वर्षांचा अनुभव होता.  


फिनोलेक्स कंपनीचं मार्केटिंग अचूक होतं.. वर्षानुवर्षे शेती कामांची उत्पादने.. मुख्यत्वे पाईप्स विकून त्यांना वारकऱ्यांची पल्स माहीत होती.. महिला वारकरी त्यांचं समान सहसा डोक्यावर घेऊन चालतात. त्यांनी मोठी पिशवी अशी सुंदर डिझाइन केली होती कि, पिशवी डोक्यावर घेतल्यावर विठ्ठल-रखुमाईच डोक्यावर आहेत असं दिसत होतं.. आणि वारकरी विठ्ठल-राखुमाईना देखील डोक्यावरच घेऊन चालतात.


जत्रे मध्ये वासुदेव ही होते.. पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा लांब झगा-डोक्यावर मोरपिसांची टोपी-कपाळावर गंध, गळ्यात विविध प्रकारच्या माळा, ओठी अभंग किंवा ओव्या आणि  एका हातात टाळ आणि दुसऱ्या हातात चिपळ्या..असे वासुदेवाचे लोभस रुपडे होते..वासुदेव त्यांच्या बोटात छोटा टाळ घालतात.. त्या छोट्या टाळ-चिपळ्यांमुळे वेगळ्याच प्रकारचा नाद निर्माण होत होता.. 


एक वासुदेव आणि त्यांचा मित्र चहा पीत गप्पा मारत होते..दोघेही लातूर कडून आले होते.. मित्र वासुदेवा कडे तक्रार करत होता.. बरेच दिवसात त्यांच्या गावी गेला नाही भेटायला म्हणून.. मी सहजच विचारलं.. वारी झाली की काय करता ?.. असाच फिरतो गावो-गावी... "तुका म्हणे उगी राहावे... जे जे होईल ते ते पाहावे..." आता सरकारचं पण बघूया काय होतंय ते..


सकाळी पालखी मुक्कामी जाताना एक माऊली रस्त्याच्या कडेला उभे होते.. वाटलं वारकरी दिसताहेत पालखी मुक्कामी येत असावेत.. म्हणून विचारलं.. तर म्हणाले.. माऊलींच्या दर्शनाला जातोय.. 


म्हंटलं चला..मी पण तिकडेच चाललोय. 


माऊली स्वतः कीर्तनकार होते..मी विचारलं आता वारीत पुढे जाणार का ? 


"हो.."


मी विचारलं कुठ पर्यंत जाणार ? पंढरपूर का ?


"तो विचार आपण नाही करायचा.. माऊली नेतील तिथ पर्यंत जायचं.."


सर्व वारकरी मंडळींना इतका अनुभव असतो की त्यांच्या रुपात मोटिव्हेशनल स्पीकर किंवा मॅनेजमेंट गुरूच आपल्याला भेटतात..


भवानी पेठेतील पालखी मंदिरात माऊली विसावतात..आणि नाना पेठेत तुकोबा.. 


घरच्या झाडाची चाफ्याची फुलं घेतली होती.. माऊलीसांठी ती रांगेतील माऊलींना वाहायला दिली आणि तुकोबांच्या मुक्कामी गेलो.. जवळ असून देखील बरंच फिरत फिरत गेलो.. दर्शन बाहेरूनच घेतलं.. आहि वेळानी लक्षात आलं की फुलं द्यायची राहिली.. मग ती फुलं देखील रांगेतील एका माऊलींना दिली आणि घरा कडे निघालो.. 


क्रमशः


सं.वि.दे २८/६/२०२२


Monday, June 20, 2022

जोसे मोरिनियो - "द स्पेशल वन"

 दुभाष्या (ट्रान्सलेटर) ते जग प्रसिद्ध आणि मुख्य म्हणजे कायम बातम्यांमध्ये असणे आवडणारा आणि भरमसाठ इगो असणारा (जे जोसे स्वतः मान्य करतो) आणि पोर्तो सारख्या टीम ला घेऊन युनायटेड ला हरवणारा अवलिया. कोणे एके काळी बार्सिलोनाचा सहा. प्रशिक्षक ते कट्टर शत्रू ही एक वेगळीच कथा 

कधी खेळाडू म्हणून खास नव्हता... पण चांगला प्रशिक्षक होईल असे गुण आधी पासूनच जोसे कडे होते.. ज्या साठी त्याने व्यवसायिक प्रशिक्षण देखील घेतले. जोसे चे वडील देखील पोर्तुगाल मध्ये फुटबॉल प्रशिक्षक होते. जेंव्हा पोर्तो चे प्रशिक्षक म्हणून आले तेंव्हा पोर्तो चा संघ कामगिरी करत नव्हता 
अनोळखी आणि महाग नसलेले प्लेयर्स घेऊन चषक जिंकणे ही जोसे ची खासियत. आधी पोर्तो बरोबर पोर्तुगीज लीग आणि नंतर २००३ मध्ये चॅम्पियन्स लीग जिंकून जागतिक फुटबॉल च्या नकाशावर स्वतः चे नाव कोरले आणि पाय भक्कम केले 
चेलसी ऑइल रिच रशियन ओलीगार्च रोमन अब्राहोमोविच नि विकत घेतल्या वर २००४ साली जोसे ला प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. पहिल्याच पत्रकार परिषदेत स्वतःला 'स्पेशल वन' म्हणून बिरुद दिल्या नंतर पूर्ण प्रीमियर लीग मध्ये आता हलचल होणार हे स्पष्ट होते. सर अॅलेक्स नि देखील ह्याची दखल घेतली 
सलग दोन वर्षे प्रीमियर लीग विजेते पद, त्यात असंख्य रेकॉर्डस्, गोल्स, मॅचेस आणि स्टॅमफर्ड ब्रिज वर एकही मॅच न हरण्याचा विक्रम.. चेलसी बरोबर चॅम्पिअन्स लीग जिंकता आली नाही पण, ड्रॉग्बा, इसिएन, माकेलेले सारखे खेळाडू घडवले.. 
चॅम्पियन्स लीग मध्ये विवादामुळे, मज्जाव केल्या नंतर, लाँड्री ट्रॉली मधून ड्रेसिंग रूम मध्ये आलेला अवलिया ही कथा अजबच..त्याच्या आवडत्या खेळाडूंना नेहेमीच बॅक करणारा मॅनेजर..तिसऱ्या वर्षी रोमन बरोबर महागडे खेळाडू घेऊन फाटले तरी लीग कप आणि एफ ए कप जिंकला. २००७ साली चेलसी मधून बाहेर 
इंटर बरोबर एटो, मतेराझी, मिलितो, शनायडर बरोबर २०१० साली चॅम्पियन्स लीग आणि ट्रेबल जिंकण्याचा भीम पराक्रम करून रियाल माद्रिद ..जगातील तथा कथित सर्वात मोठ्या क्लब ची धुरा सांभाळायला गेला. 
ही कारकीर्द खूप वादाची राहिली..जोसे ने स्पॅनिश फुटबॉल मध्ये दुही पाडली हा आरोप त्या वर अजूनही होतो. तरीही इथे त्याने ला लिगा आणि कोपा देल रिया जिंकली.. 
२०१३ साली द स्पेशल वन पुन्हा त्याच्या घरी म्हणजेच चेलसी मध्ये जॉईन झाला.. पहिल्या वर्षी ३ऱ्या नंबर वर (लिटिल हॉर्स) येऊन लिव्हरपूल ला विजेते पदा पासून दूर केले..आणि २०१४ साली डियेगो कोस्ता सारखा स्ट्रायकर आणि हजार्ड सारखा ड्रीब्लर घेऊन चेलसी बरोबर तिसऱ्यांदा प्रीमियर लीग जिंकला. 
पुढील सिझन मध्ये म्हणजेच अडीच वर्षा नंतर लीग टेबल मध्ये १० व्या क्रमांकावर फेकल्या गेल्या नंतर जोसे ला पुन्हा एकदा चेलसी सोडावी लागली.. सर अॅलेक्स ना जोसे बद्दल नेहेमीच आपुलकी होती आणि त्या मुळेच २०१६ साली युनायटेड मध्ये रुजू झाला.. २०१७ साली युरोपा लीग जिंकली. 
या वेळी जोसे ने त्याचा फेवरेट इब्रा ला युनायटेड मध्ये आणले. २०१८ साली युनायटेड लीग टेबल मध्ये दुसरी आली ही त्याची युनायटेड साठी तेंव्हाच्या टीम बद्दलची सर्वोत्तम कामगिरी होती असे म्हंटल्या वर त्यावर खूप टीका झाली.. पण ती गोष्ट आजतागायत खरी आहे.. 
पुन्हा टू अँड हाफ यिअर्स इच नंतर जोसे नि युनायटेड सोडली आणि काही अवकाशा नंतर तोतनहम म्हणजेच स्पर्स जॉईन केली.. स्पर्स ने नुकतेच पोचेतीनो ला काढले होते.. स्पर्स इतके कम नशिबी आहेत की जोसे च्या पूर्ण कारकिरर्दीत ती एकच अशी टीम आहे ज्या बरोबर तो ट्रॉफी जिंकू शकला नाही.. 
हॅरी केन, सॉन सारखे स्ट्रायकर गोल्डन बूट मिळवतील पण ट्रॉफी नाही जिंकू शकत.. अजूनही त्यांची ट्रॉफी कॅबिनेट रिकामीच आहे..

मे २०२१ मध्ये जोसे नि अतिशय रिच लिगसी आणि फॅन फॉलोइंग असलेला, टोट्टी ज्याची ओळख होता तो इटालियन क्लब रोमा जॉईन केला.. 
मिखीतरीयन, टॅमी अब्राहम आणि स्मॉलिंग हे प्लेयर्स होते.. रोमा ने बरेच वर्षात कुठली ट्रॉफी जिंकली नव्हती.. या वेळी देखील ते कुठली जिंकतील असे कोणाला वाटत नव्हते.. काही वर्षा पूर्वी बार्सिलोना ला चॅम्पियन्स लीग मधून बाहेर काढायचा पराक्रम त्यांनी केला होता. 
युरोपा कॉन्फरन्स लीग ही नवी स्पर्धा (3rd tier) युएफआ ने या वर्षी सुरू केली..सेमी फायनल ला लिस्टर ला हरवल्या नंतर मला कळाले की अशी कुठली स्पर्धा आहे आणि जोसे आता पुन्हा एक ट्रॉफी जिंकायची शक्यता निर्माण झाली..फायनल फेयेनूर्ड बरोबर 
सेमी फायनल नंतर जोसे ला रडताना बघून पूर्वीचा जोसे आठवला.. त्याच्या सर्व प्रेस कॉन्फरन्स स्पेशल वन, स्पेशालिस्ट इन फेल्युअर, थ्री लिटिल होर्सेस, नथींग टू से, फुटबॉल हेरिटेज, ३-० रिस्पेक्ट रिस्पेक्ट रिस्पेक्ट .. या सर्व डोळ्यासमोर आल्या.. 
आता पुन्हा एका ट्रॉफीवर जोसे त्याचं नाव कोरणार होता.. आणि तो जिंकला.. पुन्हा एकदा.. पहिला मॅनेजर जो तिन्ही युरोपियन लीग आणि एकत्रित ५ युरोपियन लीग जिंकला..
रिस्पेक्ट..रिस्पेक्ट..रिपेक्ट 
जोसे ची कारकीर्द कायम वादात होती त्या मुळे सर्व क्रीडा पत्रकारांचा तो नेहेमीच फेव्हरेट होता आणि राहील... आपल्याला न आवडणारे खेळाडू त्याने नेहेमीच खड्या सारखे बाजूला केले, माटा, ल्युक शा, इकर कासियास ही त्याची उदाहरणे.. 


"माचीवरला बुधा" ते "कुणा एकाची भ्रमणगाथा"

आज माचीवरला बुधा वाचल्या नंतर पहिल्यांदा ट्रेन ने प्रवास करायचा योग आला.. आता पुण्याला आल्या नंतर.. इंद्रायणी/डेक्कन च्या ऐवजी सिंहगड पकडली..शिवाजी नगर ला पोहोचे पर्यंत पाऊस लागला..

कामशेत येई पर्यंत नुकत्याच सुरू झालेल्या पावसाच्या खुणा दिसत होत्या.. पेरणी केलेल्या भाताच्या दाढी हिरव्या कंच झाल्या होत्या. कामशेत स्टेशन शेजारची नदी अगदी तुडुंब भरली होती. पेरणी साठी पाणी सोडलं असावं बहुतेक.

लोणावळा सोडलं तसं आपोआप पाय डब्याच्या दाराजवळ आले. खंडाळा मागे पडल्यावर ट्रेन आणि अमृतांजन जवळील एक्सप्रेस वे चा पट्टा दृष्टीक्षेपात आला.
डावीकडे नागफणी (ड्युक्स नोज) चा कडा आणि पुढील बोगदा गेल्यावर खोपोलीचे विहंगम दृश्य दिसले.. पावसाच्या सीझन मुळे सर्व घरं, इमारतींचे माथे ताडपत्री मुळे निळे दिसत होते..
पुढे मंकी हिल ला गाडी थांबल्यावर वानर महाराजांचे दर्शन झाले. गाडी जशी पुढे सरकू लागली तशी निसर्गाने कूस बदलली.
डोंगररांगा-कड्यांमध्ये हिरव्या रंगाची शेड दिसू लागली होती..उजवी कडी उल्हास दरी मध्ये काही ढगांनी डी-टूर केली होती.. गाडी बोगदे पार करता करता राजमाची ची चाहूल लागली. पाऊस पडून गेल्या मुळे श्रीवर्धन आणि मनरंजन लांबूनच दिसू लागले..
गाडी जसजशी बोगदे मागे टाकत पुढे जाऊ लागली, राजमाची अजूनच जवळ येऊ लागली. मनात टेम्बलाई चं पठार, बोम्बल्यांचा झाप, बुधाची झोपडी-खार-चिमण्या-शेळ्या-आवळी आणि कुत्रा घोळू लागले.
राजमाची वर बुधा कुठेतरी त्याच्या रोजच्या विमानाची वाट बघत उभा असेल असं वाटून गेलं. डोळे त्याला शोधत होते 
तिसरा ब्रेकिंग हॉल्ट झाला, तशी राजमाची मागे पडली आणि कोकण (कर्जत) दिसू लागलं. नांगरलेली शेतं, पेरणी झालेल्या दाढी यांमुळे वेगळीच नक्षी तयार झाली होती. तिथे पण नकळत बुधाचे मिलिटरी वाले दिसताहेत का असं वाटून गेलं. 
गाडी हलली आणि मी माझ्या जागेवर येऊन बसलो... गोनीदांबरोबर "कुणा एकाची भ्रमणगाथा" (नर्मदा परिक्रमा) सुरू करायला. 






Saturday, June 18, 2022

माचीवरला बुधा आणि योगायोग


 माचीवरला बुधा आणि योगायोग:

काही दिवसांपूर्वी 'माचीवरल्या बुधा'शी ओळख @sunandanlele यांच्या एका व्हिडीओ ब्लॉग वरून झाली..त्या नंतर ट्विटर मित्र @amlya02 यांच्या संभाषणात देखील बुधाचा रेफरन्स आला, दुवा होता- प्रवासवारी (wanderingsanket.blogspot.com) मधील राजमाची चा उल्लेख
उत्सुकता चाळवल्याने ऍमेझॉन वरून मागवलं, थोडं वाचलं आणि स्टोरीटेल थोडं वर ऐकलं

गोनीदांच्या लिखाणात फक्त प्रवास वर्णनच नाही तर व्यक्ती वर्णन, प्राणी-पक्षी वर्णन एवढं जिवंत आहे की बुधा, राजमाची, टेम्बलयी चं पठार, बुधाचा कुत्रा, खारी, शेळ्या-मेंढ्या म्हैस डोळ्यासमोर उभे राहिले
त्यातील काही शब्द, जसे- झाप, हरीख, पावटी, किंजळ आणि अनेक असे @MarathiDeadpool यांच्या कडूनच समजून घ्यावे लागतील.

आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे, आज साप्ताहिक सकाळ मध्ये आलेला अंजली काळे यांचा राजमाची वरील लेख..
अश्या योगायोगांमुळे बुधा बरोबर नक्कीच काहीतरी ओळख असावी  असे वाटून गेले.

मागे मी राजमाची ट्रेक कर्जत च्या बाजूने केला होता... पण बुधा वाचल्याने आता लोणावळ्या कडून जाण्याची ओढ लागली आहे..

बघूया या पावसाळ्यात बुधाला प्रत्यक्ष भेटायचा योग जमतोय का ते.
#म #माचीवरलाबुधा #गोनीदा

Tuesday, June 7, 2022

रुसलेली लोकल


 लॉक डाऊन च्या आधी लोकल आणि "फर्स्ट क्लास कट आणि हँडीकॅप्पड डब्बा" ह्या गोष्टी जगण्यातील अविभाज्य घटक होत्या.. सकाळी ऑफिस ला जाताना आधी ७.४४ जी कालांतराने ७.३४ झाली...कट डब्ब्यात चढून डब्याच्या शेवटच्या बाजू ची विंडो म्हणजे ग्रुप ची फिक्स जागा..

येताना लोकल कुठलीही असली तरी डब्बा ठरलेला.. हँडीकॅप्पड सेक्शन च्या मागे जनरल.. इथे बसायचं कारण म्हणजे एगझिट ला लागून मोठ्ठी जाळी असल्याने हवेशीर जागा..

मुंबई लोकल ने खूप मित्र दिले ..असे मित्र जे फक्त लोकल पुरतेच मर्यादित न राहता मित्रांच्या परिवरासाहित एक मोठ्ठं कुटुंब झालं..
लोकल मधील मित्रांना वयाची चौकट नव्हती.. वय वर्षं २० पासून ६० पर्यंत सगळे मित्रच..लोकल ने अनेक सुंदर आठवणींचे क्षण दिले.. वाढदिवस, दसरा, सेवा-निवृत्ती, अनेक..खाबूगिरीची तर विचारता सोय नाही.. मग ते घरून आणलेले डब्बे असोत की रामश्रय, लाडू सम्राट, आराम मध्ये केलेली न्याहारी..
सकाळी ऑफिस ला जाताना कधीच झोपलो नाही..भंकस-टाईमपास-चर्चा-वादविवादांमध्ये कल्याण ते सीएसएमटी प्रवास कधी व्हायचा कधी कळायचं नाही.. येताना मात्र विंडो सीट मधली झोप हक्काची.. कसं काय माहित पण सायन क्रॉस होऊन कुर्ला येई पर्यंत जी झोप लागायची ती थेट ठाणे आऊटर ला गाडी थांबे पर्यंत..
आणि ती झोप क मा ल लागायची.. त्याची तोड रात्रभर झोपून सकाळी उशिरा उठलं तरी नाही..

१६ मार्च २०२० ला लॉक डाऊन च्या आधीचा शेवटचा प्रवास झाला. लॉक डाऊन लागलं आणि सगळंच गंडलं.. त्या नंतर लोकल चालू झाल्या नंतर काही कामा साठी जायला लागल्याचा अपवाद वगळला, तर लोकल रुसलेलीच होती..
आता देखील लोकल दिसली तरी डोळ्यात टचकन पाणी आल्याशिवाय राहत नाही..

Sunday, June 5, 2022

#प्रवासवारी



 #प्रवासडायरी आज कल्याण होऊन पुण्याला कोणार्क एक्सप्रेस नि यायचा योग आला.. सुटीचा शेवटचा दिवस असल्या मुळे तत्काळ मध्ये जे मिळालं ते काढलं.. घाटात उल्हास दरी आणि राजमाची परिसर सुंदर आणि झाडी देखील हिरवी गार होती. करपलेली जमीन पावसाची आतुरतेने वाट पाहत होती

पूर्वी कोड्रिंक वाले खूप असायचे..अल्युमिनियम ची बादली. त्यात बर्फ आणि भोवती गोल्डस्पॉट, मँगोला, लिम्का, एनर्जी च्या काचेच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंक वाला तो यायची दवंडी ओपनर नि बाटल्यांवर टिरनिंग-टिरनिंग आवाज करून पिटायचा. आता प्लास्टिक बाटल्यांच्या जमान्यात ते सगळं काळात जमा झालं
कर्जत नंतर या दिवसात करवंद, जांभळं घेऊन पाड्यातल्या मावश्या यायच्या. हल्ली पण असतात.. आज गोड जांभळं मिळाली.. पण झाडांच्यापानात केलेला द्रोण नाही.. कधी कधी मिळतात द्रोणात.. डेक्कन एक्सप्रेस पाड्यांवर थांबते.. तिच्यात मिळायची शक्यता जास्त

Friday, March 15, 2019

भय इथले संपत नाही

व्हाट्सअप्प वर काल एक व्हिडिओ आला.. सीएसएमटी चा एफओबी कोसळला. आधी वाटलं की अफवा आणि जुना व्हिडीओ असेल.. पण बघितलं तर परिसर ओळखीचा वाटत होता.. आणि खरच तोच एफओबी होता.. कन्फर्म करण्यासाठी टीव्ही चालू केला तर बातम्यांमध्ये पण तेच दाखवत होते..२ मृत आणि ३० जखमी.. व्हिडीओ बघून कळत होतं की आकडा नक्कीच वाढेल..
डोळ्यासमोर फ्लॅशबॅक आला.. साडेसहा वर्ष (२००६-२०१३) कमीत कमी दिवसातून एकदा तरी ह्या पुलाचा वापर व्हायचा.. मरिन लाईन्स मध्ये ऑफिस असल्याने ह्या पुलाने जाणे येणे सोयीचे असायचे.. २००८ साली कसाब चा टाइम्स च्या छायाचित्रकाराने काढलेला फोटो तो ह्याच पुला वरचा.. अनेक सिनेमांमध्ये, लक्षात राहण्या सारखे म्हणजे स्लमडॉग मधील शेवटचा सीन देखील याच पुला वरचा..
खूप राग, उद्विग्नता, हतबलता, आणि आपण काय म्हणतो ते स्पिरीट ऑफ मुंबई अश्या अनेक भावना एकाच वेळी उफाळून आल्या.. सर्वांच्याच मनात ज्यांच्या साठी लोकल प्रवास हा आयुष्याचा एक अविभाजनीय भाग आहे..
आज काही कामा निमित्त सी एस एम टी ला आलो तेंव्हा जाऊन आलो.. पाडकाम चालू होते.. टीव्ही चॅनल्स च्या ओबी व्हॅनस, रिपोर्टर, पोलीस, फायर ब्रिगेड, एन डी आर एफ, पालिका अधिकारी इ. आणि माझ्याच सारखे आजूबाजूला बरेच जण..एवढे लोक असून पण शांतता.. कव्हरेज करणारे रिपोर्टर फक्त बोलत होते ते तेव्हढे..
लोअर परळ, अंधेरी आणि आता सी एस एम टी.. आणि पुढे न जाणे किती..
काल फुटबॉल चा खेळ सुरू झाला.. हा पूल आमचा नाही.. त्यांचा.. अहो आमचा नाही .. त्यांचा आणि हेच एक कारण आहे की हे पूल पडत आहेत.. रिपेअरिंग करायच्या वेळी पण असाच फुटबॉल चालू असेल..
महत्वाचे म्हणजे पुलावर टाईल्स लावताना कुठे जातो हो हा फुटबॉल ? ती कामं कशी होतात तत्पर ? असो..
तर ह्या टाईल्स देखील सगळी कडे अश्या लावल्या आहेत की बहुतांशी लोकांचे पाय घसरतात .. गुळगुळीत.. बऱ्याच ठिकाणी ग्रॅनाईट देखील..
ही सर्व दिरंगाई होण्याचं कारण एकच, ते म्हणचे बहुतांशी जे बाबू, नोकरशहा आणि इतर मंडळी जे ह्या बाबतीत निर्णय घेतात ते ह्या गोष्टींचा वापर करण्या ची शक्यता खूपच कमी आहे.. जर वापर करत असते तर स्वतः च्या जिवाच्या काळजीने तरी योग्य ते डिसीजन घेतले असते..
खालील उपाय योजना करणे खूप गरजेचे आहे
१. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या रिझर्वेशन मध्ये जसा आयुर्विमा, अपघात विमा आहे, तसा सर्व उपनगरीय तिकिटे आणि पासेस या मध्ये द्यायला हवा..
२. रेल्वे संबंधित अपघात.. क्रॉसिंग करताना, गर्दीतून पडल्यामुळे, दगड-फुगे लागल्या मुळे इ. सर्व अपघात त्यात समाविष्ट करावे
३. सर्व नोकरशहा, बाबू आणि लोक प्रतिनिधींना दर महिन्यातून किमान काही दिवस सार्वजनिक दळण वळण आस्थापना- लोकल ट्रेन, बस, मेट्रो, मोनो, शेअर कॅब-ऑटो यांचा वापर करणे बंधनकारक करावे
४. क्राउड सोर्सिंग द्वारे.. सर्वसामान्य लोकांची मते-अडचणी समजून घेण्यासाठी एक मंच उपलब्ध करून द्यावा.. आणि त्या वर योग्य तो अंमल करण्यात यावा
आपल्या सूचना देखील सोशल मीडिया मधून दूरवर पोहोचू द्या.
आपण सर्वांचेच आयुष्य मौल्यवान आहे.. आपण सर्व नक्कीच जास्त चांगले सार्वजनिक जीवन डिझर्व करतो.
संकेत देशपांडे, कल्याण
@sanketvd : twitter

Saturday, September 8, 2018

हिमालयाच्या कुशीत - ३ ऋषिकेश ते गोविंद घाट

हिमालयाच्या कुशीत - ३

ऋषिकेश ते गोविंद घाट

सकाळी साडे सहा वाजता तिघे ही तयार होतो.. एक प्रघात ठरला होता.. मी आधी उठून आवरायचे आणि मग अमित आणि प्रसाद चा नंबर..सहा दिवस अमित ला मी आणि प्रसाद झोपलेल्या खोलीत झोपायचे होते.. ही म्हणजे त्याच्या म्हणण्या प्रमाणे, त्याच्या साठी एक सत्वपरिक्षाच होती.. आम्ही दोघेही फुल्ल फॉर्म मध्ये मोटर सायकल चालवतो असे त्याचे म्हणणे .. किती अफवा पसरलेल्या असतात आपल्या बदद्ल :) असो..

पांडे अंकल आणि आन्टि चा मुक्काम राम झुल्या जवळ परमार्थ निकेतन मध्ये होता.. त्यांना आधी पिकअप करून गाडी आम्हाला घ्यायला आली.. त्या नंतर नेहा ला पिकअप केल्यावर ड्रायव्हर ने सर्व सामान नीट लावले.. कॅरीयर असल्यामुळे ट्रेक च्या सर्व मोठ्या सॅक्स वर गेल्या..इनोव्हा च्या मधल्या रो ला बकेट सीट असल्यामुळे जरा पंचाईत झाली.. त्या मुळे मधे दोनच जण बसू शकत होते.. आणि मागे तीन..
पांडे अंकल ओएनजीसी मध्ये कामाला होते.. आणि आन्टि होम मेकर..साधारण पन्नाशितले असतील दोघे जण.. ते आदल्या दिवशी ट्रेक ची तयारीई म्हणून नीलकंठ च्या एका मिनी ट्रेक ला जाउन आले होते ऋषिकेश जवळ. मुलं मोठी झाल्यामुळे आता ते दोघे ट्रेक साठी वेळ काढू शकत होते.. त्यांची मुलगी इतक्यताच केजीएल अर्थात काश्मीर ग्रेट लेक्स हा ट्रेक करून आली होती.. आमची अजुन एक ट्रेक मेट नेहा पहारिया ही न्यूट्रिशनिस्ट होती.. ती मुंबईत एका फुड कंपनीत कामाला होती आणि तिचा हा पहिलाच ट्रेक होता.. सकाळी आम्हाला नरसिंहा अंकल आणि त्यांची फॅमिली पण भेटली (बेंगलोर वाले).

६.४० वाजता प्रस्ठान केले..ऋषिकेश ते गोवींदघाट हा २७० किमीचा प्रवास होता..ऋषिकेश-कौडीयाला- देवप्रयाग- श्रीनगर- रुद्रप्रयाग- कर्णप्रयाग- चमोलि- जोशिमठ-गोवींदघाट असा रूट होता.. तसे अंतर जास्त नाही पण हा पूर्ण घाट रस्ता असल्यामुळे कमीत कमी १२ तास प्रवासाला लागणार होते.. थोडे पुढे आल्या वरच लँडस्लाइड झालेला भाग लागला.. तो पार केल्यावर जरा नीट रस्ता लागला..एका बाजूस पर्वत आणि एका बाजूस नदी हे जवळजवळ पूर्ण प्रवासात कायम होते.. सुरुवातीला गंगा आणि मग अलकनंदा नदी तुमच्या बरोबर असते..आम्ही कौडीयाला या ठिकाणी ब्रेकफास्ट साठी ब्रेक घेतला.. एका बाजूस गंगेचे विशाल पात्र होते.. बर्‍याच ठिकाणी डोंगरांवरून लँडस्लाइड झाल्याच्या खाणा खुणा दिसत होत्या..सकाळची वेळ असल्यामुळे ढ्ग नदीपात्रात उतरले होते.. हवेत गारवा होता..

सगळ्या हॉटेल्स मध्ये ब्रेकफास्ट=पराठे हे समीकरण आहे.. पराठे आणि त्या बरोबर दही किंवा लिंबू आणि गाजराचे लोणचे... खाऊन आणि चहा झाल्यावर साधारण अर्ध्या तासात निघालो..आता जसजसे पुढे जात होतो तसतसे पर्वत उंचच उंच होत होते..मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण प्रवास म्हणजे एका बाजूला नदी-त्या पल्याड पर्वत आणि एका बाजूस पर्वत... कधी तुम्ही अगदी नदी जवळ म्हणजे साधारण पात्राच्या पातळिस आणि कधी एकदम उंचावर... मग हा उंच-सखल चा खेळ सतत चालू...स्टील चे पूल खूप वेळा लागतात..आणि लक्ष्मण झुल्या सारखे झुले पण खूप दिसतात.. कारण गावं ही एक तर नदी किनारी किंवा घाट माथ्यावर.. नदी किनारी गाव असलं की झुले आलेच..

थोडं पुढे आल्यावर देवप्रयाग लागलं.. इथे पाच एक मिनिटे थांबलो.. अलकनंदा आणि भागिरथी चा संगम इथे आहे.. इथून पुढे (ऋषिकेश च्या दिशेने) अलकनंदा आणि भागिरथी एकत्र गंगा म्हणून ओळखली जाते.. वरुन हा संगम खूपच विलोभनीय दिसतो.. आणि दोन्ही नदींचे पाणी वेगळ्या रंगाचे आहे हे लक्षात देखील येते.. इथून पुढे आल्यावर श्रीनगर हे मोठे गाव लागते.. त्या नंतर रुद्रप्रयाग-कर्णप्रयाग-नंदप्रयाग लागतात. प्रयाग म्हणजेच संगम.. कर्ण प्रयाग  गावातून पुढे आल्यावर परत चढ आहे. इथे वर आल्यावर कर्णप्रयाग चे विहंगम दृष्य खूपच विलोभनीय दिसते.. खाली गावात असलेले तीन पूल दिसतात..काठावर वसलेलं गाव..आणि नदीचा प्रपात... पण ही गावं इतक्या नाजूक परिस्थितीत नदी जवळ वसलेली आहेत की पुन्हा २०१३ सारखी पुनरावृत्ती झाली की गावं च्या गावं नदी पात्रात सामावतील.. आणि रस्त्यांचा पण तोच प्रकार आहे.. अंगावर येणारे उंचच उंच डोंगर.. काही ठिकाणी खूपच नाजूक परिस्थिती.. आम्ही जायच्या आधी पण ३-४ दिवस रस्ता बंद होता.. हिमालय पर्वत रांगेतील डोंगर बर्‍याच ठिकाणी भुसभुशीत लाइम स्टोन चे आहेत. थोडा जरी पाऊस झाला तरी.. लँडस्लाइड ची भीती कायम.. कर्णप्रयाग हे मोठे जंक्शन आहे. इथूनच केदारनाथ आणि नैनिताल ला जायला देखील फाटे आहेत. 

कर्णप्रयाग आणि नंदप्रायागच्या मधे आम्ही एका हॉटेलात जेवण्या साठी थांबलो.. रणजीत- आमच्या ड्रायव्हर ला सांगितले होते की तुला जिथे माहीत आहे चांगले जेवण मिळते अश्या ठिकाणी थांबव.. "पंत" म्हणून एका गृहस्थांचे हॉटेल होते. ऑर्डर आल्यावर स्वयपाक करतो म्हणाले.. त्या मुळे थोडा वेळ लागला पण जेवण अगदी गरमा गरम मिळाले.. साधारण ४ च्या सुमारास इथून पुढे निघालो.. ८०% अंतर झाले होते.. पुढे चमोलि-जोशिमठ आणि मग गोविंद घाट..

जसजसे आपण अजुन वर येत जातो तसतसे देवदार वृक्ष दिसू लागतात.. लांबून दिसायला आपलं नागवेलीचं पान देठाला पकडून हातात उभं धरलं तर जसं दिसेल तसे.. अजुन एक गोष्ट म्हणजे.. बर्‍याच ठिकाणी लागणारे हायड्रो पॉवर चे प्रकल्प.. एनेचपीसी, जेपी ह्यांचे बरेच ठिकाणी हे प्रकल्प लागतात रस्त्यातून जाताना..नदीचे पात्र काही ठिकाणी खूप मोठे आणि संथ (श्रीनगर) तर काही ठिकाणी खूपच अरुंद आणि रौद्र स्वरूपाचे..

जोशीमठ: 
अशी मजल दरमजल करत आम्ही ५-५.३० च्या सुमारास जोशिमठ येथे पोहोचलो.. तसे मोठे शहरच म्हणुया.. इथे आर्मी आणि बिआरओ चा बेस आहे.. पुढे आलो तर ट्राफ़िक पूर्ण थांबवलेले होते.. पुढे कुठे तरी लँड स्लाइड झाली आहे म्हणून. आमच्या आधी आलेले लोक साधारण १-२ तासांपासून थांबलेले होते.. खाली उतरलो.. तसा सभोवताल चा परिसर कळू लागला.. जोशिमठ उंचीवर म्हणजे माथ्यावर आहे.. समोर असे हे डोक्यावर येणारे उंच पर्वत..९० च्या कोनात उभे च्या उभे..मधुनच येणारे ढ्ग आणि पाऊस.. आता सहा साडे सहा झाले होते.. इंडियाहाईक्स च्या अजुन २ गाड्या पण आल्या.. रस्ता पुन्हा चालू व्हायचे काही चिन्ह नव्हते.. आता खरे आम्हाला कळत होते की हिमालयात प्रवास करणे म्हणजे काय आहे ते.. आणि एकदा अंधार झाला की रस्ता उघड्णे कठीण..खरे तर गोविंद घाट इथून फक्त २० मिनिटांवर होता पण तरी आता तो खूपच लांब आहे असे वाटत होते..  सर्व ड्रायव्हर लोकांचे बेस कॅम्प शी बोलणे झाले.. ठरले.. गाड्या काढायच्या.. कुठे लँडस्लाइड लागलीच तर.. पलीकडच्या बाजू पर्यंत बेस कॅम्प वरील गाड्या येतील घ्यायला.. तेवढे अंतर पायी चालायचे..

इथून पुढचा २० मिनिटांचा प्रवास खूपच थ्रिलिंग होता.. आम्ही नदी पात्रा पासून साधारण १५०० फुट उंचीवर असु..त्या उंची पासून आम्ही एक १० मिनिटात नदी पात्राच्या पातळी पर्यंत आलो..समोरून  एक स्टील चा ब्रिज क्रॉस करून पुढे आलो.... वरुन खाली येताना आम्हाला तो ब्रिज आणि वाहने दिसत होती.. रस्ता क्लीयर झाला आहे हे वरुनच कळत होते.. पुढे एक किमी वर जिथे रस्ता बंद झाला होता तो भाग लागला... अंधार पडायला जस्ट सुरूवात झाली होती.. उजवी कडे नदीचा खळाळ...आणि रस्ता... नाही रस्ता नाहीच तो चिखल.. जेमतेम एक गाडी जाईल एवढी जागा.. वरुन आलेले हे भले मोट्ठे खडक आणि पाऊस... हे खरोखर अक्षरश: "ब्रेथ टेकिंग" होते... तो भाग क्रॉस केला आणि पुढे १० मिनिटातच गोविंदघाट ला पोहोचलो.. संध्याकाळचे ७.३० झाले असतील.. १३ तास २७० किमी. हुश्ष्श...

क्रमश:

हिमालयाच्या कुशीत - २ ऋषिकेश

हिमालयाच्या कुशीत - २

ऋषिकेश

सहा वाजे पर्यंत एअरपोर्ट ला पोहोचलो.. सर्व सोपस्कार पूर्ण करून साडेसहा पर्यंत स्थिरस्थावर झालो. आमचे विमान व्हाया दिल्ली होतं. वेळेत म्हणजे साधारण सव्वा बारा च्या सुमारास जॉली ग्रँट - देहरादून येथे पोहोचलो. वातावरण जरा ढगाळ होतं.. आम्हाला ऋषिकेश हून गोविंद घाट ला घेऊन जाणार्‍या ट्रान्स्पोर्टरलाच आम्ही गाडी पाठवायला सांगितली होती... एर्टिगा.. एअरपोर्ट ते ऋषिकेश वीस एक किमी अंतर आहे.. रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी..कुठल्या तरी नॅशनल पार्क चा भाग होता.. "एलिफंट क्रॉसिंग झोन" असे बोर्ड लिहिलेले होते..आपले पूर्वज ही भरपूर प्रमाणात होते ...  जॉली ग्रँट ते ऋषिकेश हा साधारण मैदानी प्रदेश आहे.. एक पाऊण तासात आम्ही आमच्या "ओयो- द शिवाय" या हॉटेल वर पोहोचलो.. लक्ष्मण झूला रोड वर आमचे हॉटेल होते.. चेक इन करून थोडा आराम झाल्यावर दोन च्या सुमारास जेवण्यासाठी खाली उतरलो..

आम्हाला टिपिकल धाबा स्टाइल हॉटेल मध्ये जेवायचे होते..चौकशी केल्यावर लक्ष्मण झुल्या जवळ चांगली हॉटेल्स आहेत असे कळले.. आमचे हॉटेल जरा उंचावर होते... तिथून लक्ष्मण झूला म्हणजे थोडा उतारा वर होता.. दुपारची वेळ असल्यामुळे तशी वर्दळ कमीच होती..दुतर्फा हॉटेल्स आणि शॉपिंगची दुकानं.. एकंदरीत पाश्चीमात्य  लोकांचा बर्‍यापैकी वावर असेल असे जाणवत होते.. थोडे खाली उतरल्यावर बरीच हॉटेल्स होती.. मग जरा पुढे आल्यावर एक हॉटेल दिसले.. थोडेसे अघळ पघळ.. बाहेर तंदूर..गर्दी कमी.. खात्री पटली.. हेच ते हॉटेल.. तिथे डाल मखनी-छोले .भटूरे-रोटी-आलु पराठे असा आम्हाला हवा असलेला मेनु मिळाला..इथे एक विशेष म्हणजे.. कांदा-प्याज मागितल्यावर कांदा इथे म्हणजे एक लक्झरी आहे असे लक्षात आले..त्या मुळे ओनियन सलाड ऑर्डर करावे लागले.. साधारण ३.३०-३.४५ पर्यंत जेवण झाल्यावर आम्ही लक्ष्मण झुल्याकडे निघालो..

लक्ष्मण झूला जसजसा जवळ येऊ लागला तसे दिसू लागले गंगेचे विशाल पात्र.. पावसाळा असल्या मुळे पाणी तसे गढूळ आणि प्रवाह जोरदार होता.. लक्ष्मण झूला हा खरोखर झूला आहे.. झुलता पूल.. दोन्ही कडे बांधलेला.. आम्ही जिकडे होतो ती तपोवन आणि पलीकडे स्वर्ग आश्रम.. लक्ष्मण झूला च्या (पलीकडच्या) दोन्ही बाजूस ऊंच च ऊंच देवळे दिसत होती आणि घाट..घाटाच्या वरील बाजूस घरे.. हॉटेल्स इ आणि ह्या सगळ्यांना कुशीत घेणारे पर्वत.. संध्याकाळी गंगा आरती बघायला येऊ असे ठरवले.. झुल्यावरून दुचाकींना परवानगी होती.. त्यामुळे स्कूटर-बाइक वाले बरेच जण होते..फोटो सेशन करणारे अबाल-वृद्ध आणि देशाच्या प्रत्येत प्रांतातून आलेले लोक दिसत होते..  पलीकडच्या बाजूस बाजारपेठ बरीच मोठी होती..

वातावरण अजुन दमटच... वारा पण तसा पडलेलाच... साधारण ४.३० च्या सुमारास परत फिरलो.. परत हॉटेल ला यायचे म्हणजे मिनी ट्रेक चाच प्रकार होता.. वर येई पर्यंत जो काही घामटा निघालाय... अगदी आपल्याकडे असतो तसाच.. रूम वर आल्यावर तिघांनी ताणून दिली... पहाटे साडे तीन - चार ला उठल्या मुळे थकवा पण आला होता.. जाग आली तर सात वाजून गेले होते.. रूम च्या बाहेर आलो तर गंगा आरती चे सूर कानावर पडत होते आणि मगाशी दिसलेले ते उंच देऊळ आता रोषणाई मुळे अजुनच सुंदर दिसत होते.. आणि संधी प्रकाशा मुळे एक वेगळाच आसमंत तयार झाला होता..

दुसर्‍या दिवशी १८ तारखेला आम्हाला ६.३० वाजता गोवींदघाट साठी निघायचे होते..ट्रान्सपोर्टर कडून बोलरो, मॅक्स किंवा ट्रेवलर गाडी येणार होती.. ग्रूप पैकी काही मेम्बर्स ऋषिकेश ला तर काही हरिद्वार ला थांबले होते.. ऋषिकेश च्या मेम्बर्सशी फोन वर बोलून दुसर्‍यदिवशी आम्ही इनोव्हा नि जायचं ठरवलं.. मुंबईचेच एक मि. आणि मि. पांडे आणि नेहा पहरिया हे लोक होते..सर्वांशी बोलून इनोव्हा नि साडेसहा वाजता निघायचे ठरले.. मागून एक श्री. नरसिंहा आणि कुटुंब हे बेंगलोर हून आलेले ३ जण होते.. पण तो पर्यंत इनोव्हा फुल्ल झाली होती.. त्यामुळे त्यांना हरिद्वार हून येणार्‍या ग्रूप ला जॉइन व्हायला लागणार होतं..

साडेसात पर्यंत खाली उतरलो... अजुन गारवा तर नव्हता पण आता वारा होता.. आम्ही झुल्याच्या पलीकडील बाजूस गेलो आणि बाजार पेठेत फिरलो..योगा सेंटर चे बरेच बोर्ड्स दिसत होते.. सर्व गोरे लोक बहुतेक योगा मुळेच ऋषिकेश मध्ये तंबू ठोकून होते.. एक सीसीडी पण होते.. तिकडे थोडा टाइम पास केला-कॉफी.. घरी व्हॉटसअॅॅप कॉल्स इ. प्रकार झाले..

परत फिरल्यावर आता गारवा आला होता... झुल्यावर परत येई पर्यंत सर्व शांत झाले होते.. झुल्यावर थोडी रोषणाई होती .. बाकीचे दिवे गेले होते पण झुल्यावर मिण मिण प्रकाश होता .. मधोमध आल्यावर खूपच छान वाटत होते.. चंद्राच्या प्रकाशात पाण्याचा प्रवाह... गार वारा..खळखळत्या पाण्याचा आवाज..... एक वेगळीच वातावरण निर्मिती झाली होती... खूप भारी वाटत होतं..अदभुत..इथे वीस एक मिनिटे आम्ही होतो.. असं वाटत होतं की अजुन थांबावं.. पाय निघत नव्हता.. 

नऊ पर्यंत हॉटेल वर येऊन तिथेच जेवण झाले. त्यानंतर पान खाण्यासाठी बाहेर पडलो पण बरेच फिरून झाल्यावर पण पानाची गादी काही दिसली नाही.. मग एके ठिकाणी बासकीन्स चा स्टॉल होता.. तिथे आईसक्रिम खाऊन साडे दहाच्या सुमारास रूम वर परत आलो आणि आडवे झालो..ढारा ढूर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.....

क्रमश:

Sunday, September 2, 2018

हिमालयाच्या कुशीत -१

हिमालयाच्या कुशीत

खाडकन जाग आली... बिछान्या जवळील फोन चाचपडला...बघितलं तर अजुन पहाटेचे चारच वाजले होते आणि पावसाचा आवाज येत होता.. मधूनच गड-गडण्याचा आवाज देखील येत होता.. ढगांचा का डोंगरांचा ते कळायला मार्ग नाही.. काल रात्री आकरा च्या सुमारास आम्ही ऋषिकेश मध्ये पोहोचलो होतो.. सुमारे सतरा तासांचा प्रवास करून.. अजुन वाटत होतं की आपण गाडीतच आहोत आणि सभोवताली पर्वतच पर्वत आहेत...... हे उभे च्या उभे .. पण सुदैवाने तो प्रवास संपला होता. पहाटे सहा वाजता आम्ही गोविंद घाट हून निघालो होतो. मजल दरमजल करत, लँड स्लाइड मुळे चमोली जवळ पाच तास अडकल्या नंतर आणि पुन्हा ऋषिकेश जवळ येता येता एका छोट्याश्या "ट्विस्ट इन द टेल" नंतर तो महा-प्रवास संपला होता. आणि त्याच्या आदल्या दिवशी आमचा वॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड साहिब चा ट्रेक पूर्ण झाला होता.

हिमालय मनात घोळत होता..
सह्याद्री मधील ट्रेक्स केल्यावर खूप दिवसांपासून हिमालयात ट्रेक करायची इच्छा मनात घर करून होती... शाळेतील बॅचमेट आणि सीए स्वाती जोशी ही माहीत असलेल्या ट्रेकर्स पैकी हिमालयात सध्या रेग्युलर ट्रेक्स करणारी... तिने एफबी वर पोस्ट केलेले हिमालयातील ट्रेक्सचे फोटो बघून ही इच्छा अजुन प्रबळ होत होती.. कधी करायचा .. कुठला करायचा... कोणा बरोबर हे प्रश्न मनात घोळत होते.. बरेच दिवस अभ्यास चालू होता.. युथ हॉस्टेल, ट्रेक द हिमालायास, इंडिया हाइक्स असे बरेच प्रोफेशनल ग्रुप्स होते.. मग बर्‍याच अभ्यासा आणि विचारा अंती इंडियाहाइक्स ह्या ऑर्गनायझर बरोबर जायचं ठरवलं... आता कुठल्या ट्रेक पासून सुरूवात करूया हा प्रश्न होता.. बिगिनर लेव्हल च्या ट्रेक मध्ये.. चंद्रशीला, केदार कंठ, हर की धून असे ओप्श्न्स येत होते.. हे साधारण मार्च - एप्रिल २०१८ च्या सुमारास चालू होतं.. ट्रेक साठी लागणारी तयारी, प्रवासाची तिकिटं हे गणित काही जुळून येत नव्हतं.. मग सर्व विचार करून ठरवलं..... "वॅली ऑफ फ्लॉवर्स" आणि "हेमकुंड साहिब" वर शिक्का मोर्तब झालं. 

ट्रेक मेट्स, तारखा
ट्रेक ठरल्यावर इथून कोण मित्र बरोबर येणार याची तयारी चालू झाली. प्रसाद आणि अमित यायला तयार झाले. शेखर ला सुट्ट्यांच्या कारणा मुळे जमणार नव्हतं. नेहेमीचे ट्रेक मेट्स अभय आणि कौस्तुभ यांना काही अडचणींमुळे जमत नव्हतं.

वॅली ऑफ फ्लॉवर्स चा सीझन साधारण जुलै ते सप्टेंबर पर्यंत असतो.. कारण त्याच वेळी तिथे फुलांचा बहर येतो. साधारण पाऊस थोडा कमी होईल या अनुषंगाने आधी मी १९ ऑगस्ट ची बॅच फायनल केली आणि त्या प्रमाणे ट्रेक चे बुकिंग केले. जाताना फ्लाईट ने जाऊ आणि येताना ट्रेन ने येऊ असे ठरले. ट्रेन चा प्रवास २८ तासांचा होता.. येई पर्यंत ट्रेक चा माहोल हौले हौले उतरेल या उद्देशाने ट्रेन ने यायचं ठरवले. परत येताना हरिद्वार एलटीटी एक्सप्रेस ही गाडी शुक्रवारी होती. आणि त्या साठी आम्ही शुक्रवारी संध्याकाळी (२४ ऑगस्ट) ६ पर्यंत हरिद्वार ला पोहोचणे गरजेचे होते. आणि ही सुपर फास्ट ट्रेन आठवड्यातून फक्त दोन दिवस आणि आम्हाला सोइसकर अशी शुक्रवारी च होती. प्रवासाचे मार्जिन आणि थोडी फिरण्याची सोय म्हणून आम्ही १८ ताारखेच्या बॅच नि जायचं ठरवलं.. तसे ट्रेक को-ऑर्डीनेटर प्रतिमा शि बोलून १८ तारखेची बॅच फायनल केली. हा निर्णय आमचा अगदी बरोबर ठरला.. कसा तो मी पुढे सांगेनच.   

इंडिया हाइक्स : एक प्रोफेशनल ऑर्गनायझर
ट्रेक बुक केल्या पासूनच आम्ही ठरवलेले ऑर्गनायझर त्यांच्या कामात निष्णात असतील याची प्रचीती येत होती. ट्रेक साठी काय काय तयारी करायची.. शारीरिक आणि मानसिक.. हिमालयातील ट्रेक इतर किंवाआपल्या सह्याद्री च्या ट्रेक पेक्षा कसा वेगळा असेल;. हाय आल्टिट्यूड सिकनेस, मोशन सिकनेस, बॅग पॅक कशी भरायची, बरोबर काय सामान घ्यायचं.. किती घ्यायचं या संबंधी ई-मेल्स आणि यु-ट्यूब ट्युटोरियल्स रेग्युलर येत होत्या..

ट्रेक ची तयारी
शारीरिक तयारी साठी ट्रेक च्या साधारण २-३ महिने आधी मॉनिटरींग म्हणून एक टार्गेट सेट केले गेले.. "४५ मिनिटे ५ किमी" हे app वर रेकॉर्ड करून त्याचे स्कीन शॉट्स्ट पाठवायचे ... आणि जसजसे आपण ट्रेक च्या तारखे जवळ येऊ तसे "४० मिनिटे ५ किमी" हे टार्गेट होते... ह्या बरोबर इतर फिटनेस रिजिम असेल तर उत्तमच... पण ते नियामाने करणे आमच्या तिघांपैकी कोणाही जमले नाही.. :) प्रसाद ने मात्र स्टेशन हून घरी जाताना २-३ वेळा ते केले..     

पण  हे जमले नाही म्हणून मान्सून ट्रेक्स करायचे हे मात्र आम्ही नक्की केले. त्या प्रमाणे कर्नाळा, माथेरान व्हाया भिवपुरी गार्बट हे ट्रेक्स आणि दोन दिवस माथेरान भटकंती हे जुलै-ऑगस्ट मध्ये केले. 

अमित चे पर्सनल फिजिकल ट्रेनिंग आणि एक्स्र्साइज मात्र चालू होता. त्या मुळे आमच्या पैकी सर्वात जास्त ट्रेक फिटनेस अमित कडे होता.. उशिरा ट्रेक्स करायला लागला असला तरी, तो ट्रेक्स साठी फिट आहे हे माहीत होते.

ट्रेक शॉपिंग
ट्रेक चे शॉपिंग विशेषत: हिमालयातील ट्रेक चे शॉपिंग हा खिशाला पडणारा एक भला मोठा खडडा आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. पण हा खडडा बहुतांशी कमी होऊ शकतो आणि आम्ही तो कमी करायचा प्रयत्न केला.. बरेच सामान भाडे तत्वा वर घेऊन.. इंडिया हाइक्स ने ट्रेक पोल, जॅकेट्स, पॉंचो, शूज अश्या महत्वाच्या गोष्टी भाडे तत्वा वर उपलब्ध करून दिल्याहोत्या.. त्या प्रमाणे अमित आणि प्रसाद ने पॉंचो, शूज आणि ट्रेक पोल रेंट केले.. मला शूज रेंट करणे म्हणजे शेवटच्या क्षणा पर्यंत अधांतरी ठेवणे ही मोठी रिस्क वाटली.. कारण "shoes can make or break your trek" त्याच प्रमाणे माझे पाय खूप जास्त blister prone असल्या मुळे मी शूज घ्यायचे ठरवले. तसेच हा माझा पहिला आणि शेवटचा हिमालयन ट्रेक नसेल ह्याची खात्री होती..त्या प्रमाणे ट्रेक १००/५०० हे क्वेचुआ चे शूज घेतले. शूज घेतल्यावर त्याला तुमच्या पायांची आणि तुमच्या पायाला त्याची सवय होणे हे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे साधारण ३ आठवडे आधी शूज घेऊन त्यावर माथेरान भ्रमंती आणि रोज ऑफिस ला जाता येता नवीन शूज घालून ब्रेक केले.

घोड्याची नाल म्हणजेच ट्रेकिंग बॅक पॅक मी ५-६ महिने आधीच घेतली होती.. बाकीचे तत्सम शॉपिंग.. क्विक ड्राय पॅंट्स, शर्ट्स, थर्मल्स, याचे २ सेट्स घेतले. अगदी ऐन वेळी एक गरम कपड्यांचा सेट तिघांसाठी घेतला. ह्या पैकी काय कामी आलं आणि काय नाही हे सविस्तर पुढे सांगिनच. सॉक्स चे मात्र भरपूर सेट्स घेतले.. अगदी रोज एक जोड ह्या हिशोबने..

घटीका समीप आली..
बॅक पॅक कशी भरायची याचे बरेच विडीओस युट्यूब वर आहेत.. त्या प्रमाणे सर्व प्रकार वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये पॅक करून सॅक मध्ये भरल्या. साधारण ४-५ दिवसांच्या ट्रेक साठी एक मोठी ४०-५० लिटर ची मोठी बॅक पॅक, २० लिटर ची एक छोटी डे पॅक पुरेसे आहेत. तसेच ब्लिस्टरर्स येऊ नये किंवा आले तर काय काळजी घ्यावी साठी देखील बराच अभ्यास युट्यूब वर केला होता.. त्या प्रमाणे "ल्यूकोटेप" आणि सुई -दोरा बरोबर घेतले.. जायच्या ४-५ दिवस आधी दोन्ही तळ पायांना "ल्यूकोटेप" चिकटवली.."ल्यूकोटेप" खरोखर मॅजिक टेप निघाली.. कशी ते पुढे येईलच. 

इकडे दुसरी कडे आदल्या दिवशी रात्री पर्यंत अमित आणि प्रसाद चे पॅकिंग चालू होते.. प्रसाद ला ऑफिस मधून आणि अमित ला रिटर्न च्या सीझन मधून १ आठवडा ब्रेक घ्यावा लागत असल्यामुळे त्यांना ऑफिस मधील बरेच काम पूर्ण करायचे होते..

१७ ऑगस्ट ला सकाळी ७.४० ची फ्लाईट असल्यामुळे सर्व पिक-अप झाल्यावर ५ वाजता आम्ही कल्याण सोडले.. ....

कब तक गिने. हम धडकने... दिल जैसे धडके धडकने दो...
क्यूं है कोई आग दबि... शोला जो हद से गुजरने दो... 


क्रमश:     

Wednesday, February 15, 2017

रतनगड : "एक ब्लॉकबस्टर ट्रेक" : सर्व भाग



नाव थोडं वेगळं वाटलं ना... तसं विशेषच कारण आहे. जसं एखाद्या सिनेमा ला हिट होण्या साठी एक फॉर्म्युला असतो ... इमोशन, कॉमेडी, ड्रामा वगैरे वगैरे; तसेच एखादा ट्रेक हिट होण्या साठी जे काही असणे गरजेचे आहे ते सर्व रतनगड ट्रेक मध्ये आहे. कल्याण पासून साधारण १४० कि.मी. अंतरावर भंडारदरा धरणाच्या परिसरातील डोंगर रांगांतील एक. भंडारदरा परिसर म्हणजे ट्रेकर च्या गळ्यातील ताईत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अहो खरोचरच.. आपण नेकलेस म्हणूया. सुरवातीला कळसुबाई, मग ए. एम. के. अर्थात अलंग -  मदन - कुलंग, त्यानंतर सांधण दरी; मधोमध रतन गड आणि त्याच्या बाजूस आजोबा, कात्राबाई, पाबर गड, घनचक्कर आणि भैरव गड. तसेच इथून एक रस्ता ट्रेकर्स चे दैवत हरिशचंद्र गड येथे हि जातो.

असो... तर तारीख ठरली जानेवारी २१-२२, २०१७. मेम्बर्स ६. अभय (खरखर), अमोल (खली). मनीष (बच्चा), आयुष (बाबी), अमित (बापू) आणि मी. गाडी एर्टिगा. रात्रीच्या जेवणाचा शिधा (रेडी टू मेक) मसाले भात मनीष नि घरून करून आणला होता. स्वंयपाक कारायचा असल्या मुळे तेल, भांडी, ताटल्या, पातेली हे सर्व सामान देखील होते. पोळी-भाजी, पराठे, चटणी, लोणचे हे सर्व देखील. तसेच मुक्कामी असल्या मुळे मॅट्स, स्लीपिंग बॅग्स इ. सामान देखील होते. हे सर्व सामान आमचे सीझन्ड ट्रेकर्स अभय, मनीष आणि अमोल यांच्या कडे. तुम्ही कल्पना करू शकता कि सामान किती वाढले असेल. पण हाच तर फरक आहे पिकनिक आणि ट्रेक मध्ये. तुंग तिकोना च्या वेळी आम्ही कोळवण ला घरी राहिल्या मुळे किल्ल्यावरचा मुक्काम अनुभवता आला नव्हता. पण या वेळी तो योग आला. 



सकाळी ८ च्या सुमारास कल्याण होऊन निघालो. घोटी पर्यंत घेतलेल्या स्पीड ला सिन्नर फाटा घेतल्या वर जरा ब्रेक लागतो. येथे रस्त्याचे काम चालू आहे. जिथे फाटा लागेल तिथे उजवी कडे वळावे (कळसुबाई प्रवेश द्वार सोडून), शेंडी गावाच्या सुरवातीला एम टी  डी सी चा राईट टर्न सोडून सरळ या. धरणाची भिंत संपल्यावर जो राईट टर्न येईल तो घ्यायचा. इथून १२ किमी वर रतन वाडी. साधारण ११.४५ पर्यंत पोहोचलो. गाडी अमृतेश्वर मंदिरा जवळ गाडी पार्क केली. आम्ही गाईड शी बोललो होतो -तुकाराम बांडे; पण आम्हाला उशीर झाल्या मुळे तुकाराम सांधण दरी त दुसऱ्या ग्रुप बरोबर पोहोचले होते. (सूचना: रतन वाडीत फोन रेंज ला प्रॉब्लेम आहे. जरा टेकडी वर गेल्या वर रेंज मिळेल). आम्हाला बाळू लोटे (९८५०६ ०६५४६) हे गाईड भेटले. चहा नाश्ता झाल्या वर साधारण १२.२० च्या सुमारास आम्ही गडा कडे कूच केले.

सुरवाती ला साधारण १-२ किमी पायवाट आहे जी शेतातून आणि नवीनच घातलेल्या बांधाच्या बाजूने जाते. त्यानंतर चढाई चालू. रतन गड चा प्रदेश पूर्णपणे दाट झाडीनि भरलेला आहे. त्यामुळे दुपारी देखील त्रास जाणवत नाही. अधे मधे ब्रेक घेत घेत आम्ही साधारण २ च्या सुमारास वाघतळे येथे पोहोचलो. (सूचना : येथे विश्रांती घ्यायला तसेच "टेन्ट" लावण्यास जागा आहे. इथे पोहोचल्यावर लिंबू सरबत-काकडी मिळू शकेल.) थोडे हायड्रेट झाल्यावर पुढील चढाई चालू केली. इथून पुढे साधारण अजून एक तास. २-३ टप्पे पार केल्या वर आम्ही शिडी जवळ पोहोचलो. वाटेत मिळेल तश्या काटक्या जमा केल्या सरपण म्हणून.


२ मुख्य शिड्या आहेत. त्या पैकी पहिली शिडी हि थोडी मोठी (साधारण २-३ मजले) पण रिलेटिव्हली सोपी आहे. दुसरी शिडी जरा ट्रिकी आहे . जिथे शिडी चालू होते त्या ठिकाणी फक्त थोडी काळजी घ्यावी लागते. कारण, शिडीच्या रेलिंग ला पकडून  शिडी ज्या ठिकाणी चालू होते तिथे वळून जावे लागते. डावीकडे शिडी आणि गडाची भिंत आणि उजवी कडे दरी. हे घेतलेलं सर्व सामान येथून चढवणे म्हणजे जिकरीचं काम. पण आमचे गाईड आणि सीझन्ड ट्रेकर्स यांच्या मुळे ते शक्य झाले. आयुष थोडा घाबरला होता. त्याला तारामती ला तो लहान असताना जिथे अडकला होता ते आठवलं. पण अभय - मनीष - अमोल यांनी मिळून त्याला धीर दिल्याने तो व्यवस्थित वर आला.

इथून वर आलं कि उजवी कडे गुहा आणि डावी कडे किल्ल्याचा परिसर. साधारण ३.३०-३.४५ पर्यंत आम्ही पोहोचलो.










डाव्या  हाताला आधी रत्नादेवीचे मंदिर (जे एका छोट्या गुहेत आहे) आणि त्यानंतर मोठी गुहा लागते. येथे वीकएंड ला गावातील एक जोडपे हॉटेल चालवते. गुहेतुन आपणास भंडारदरा धरणाच्या बॅक वॉटर्स चा विस्तीर्ण प्रदेश प्रदेश दिसतो. अगदी समोर खाली रतन वाडी गाव; डावी कडे कळसुबाई शिखर आणि त्याला लागून ए-एम-के.  उजवी कडे पाबरगड, भैरव गड,  घनचक्कर आणि कात्राबाई टॉप. गुहेतून हा सर्व निसर्ग एखाद्या कॅनव्हास सारखा सिनेमास्कोप सिनेमा वाटेल असा दिसतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गडावर फोन ला रेंज उत्तम; मग गडावर पोहोचलो हे कळवण्यासाठी साठी फोन रुपी तोफा धडाडल्या.

आता सर्वांना सॉलिड भूक लागली होती. सर्वांनी भाजी पोळी आणि इतर खाऊ वर ताव मारला.  वर येई पर्यंत बरोबर आणलेलं पाणी संपलेलं होतं. मग पाणी आणण्या साठी आणि गडा वर भ्रमंती करण्यासाठी आम्ही निघालो. साधारण १ तास झाला असेल. वर आल्यावर जो काही नजारा दिसतो दिसतो तो डोळ्यात भरणे अशक्य. इथे एका बुरुजावर आल्यावर कात्राबाई टॉप आणि घनचक्कर चा बॅकड्रॉप आहे. पूर्ण  कातळाचा कडा तो देखील अगदी काटकोनात म्हणजे खरा खुरा रौद्र सह्याद्री. निसर्ग आपल्याला ओढतो म्हणतात ना ते खरे वाटते. इथे आल्यावर मग आम्ही इथेच बराच वेळ घालवला फोटो सेशन करण्या मधे. आयुष चा डिएसेलार  निघाला मग काय सर्व तुटून पडले फोटो काढण्यासाठी. जवळ जवळ २० मिनिटे घालवल्यावर आम्हाला पाणी आणायचे  भान आले. हॉटेल मधील काकांनी सांगितल्या प्रमाणे पाण्याचे टाके सापडले. पाण्यावर थोडं शेवाळं होतं, गडावर असे  व्हायचेच. शेवाळं बाजूला करून अभय ने इथून एक बाटली पाणी भरलं; आणि प्यायलं. पाणी एकदम गोड. अजून एक बाटली भरताना लक्षात आले कि त्यात एक उंदीर मामा गतप्राण आणि डायसेक्शन झालेल्या अवस्थेत होते. मग आधी उंदीर बाहेर काढला आणि मग चर्चा सत्र रंगले. आता हे पाणी प्यायचे कि नाही का उकळून प्यायचे वगैरे वगैरे. पण आता आपण बघितल्यामुळे ते पाणी पिण्यास माझा विरोध होता. गडावर अजून पाणी असल्या मुळे आम्ही असं ठरवलं कि अजून पाणी शोधूया. म्हणून हॉटेल वाल्या काकांना विचारायला गेलो असता अजून एक टाकं सापडलं. मग  मंडळींना बोलावलं आणि पाणी भरून घेतलं. एव्हाना ५.३० झाले असतील. सूर्य अस्ताला आला होता. त्यामुळे गड परिक्रमा उद्या सकाळी करू असे ठरले. परत निघालो असता परत काका  भेटले आणि ते म्हणाले कि दुसरी कडे (दक्षीण) दिशेस जे टाकं आहे तेथे चांगले पाणी आहे म्हणून. मग परत त्या दिशे ला गेलो, लभान ५.४०-५.४५ झाले असतील. सूर्य अजून खाली आला होता. पुढे एका ठिकाणी गेल्या वर एकदम कड्यावरील पायवाट लागली-अगदी २ पावलं जातील एवढी जागा आणि डावीकडे ९० डिग्री फॉल आणि अंगावर येणारा निसर्ग. एक क्षण थांबलो. आम्ही बरेच पुढे येऊन पाणी काही नव्हतं. मग अभय आणि मनीष पुढे गेले. ६-६.१०  झाले होते. अजून ५ मिनटात पाणी सापडलं नाही तर परत या असं सांगितलं. झाला १५-२० मिनिटात ते परत आले; पाणी सापडलं नाही; आम्ही मघाच्या टाक्यावर भरलेलं पाणी होतं. अभय जरा खटटू झाला; पण गडाची पूर्ण माहिती नसल्यामुळे आणि सूर्यास्त झाल्यामुळे तसे सांगणे गरजेचे होते. असो.

गुहेत परत आल्यावर चहा झाला आणि मग जेवणाची तयारी चालू झाली. चूल पेटवण्यात बराच वेळ गेला. काही लाकडं ओली होती. अमोल ने मोठ्ठ पातेलं आणलं होतं. पाणी  तापवायला घेतलं. पाणी थोडं उकळल्यावर मनीष नि आणलेली रेडी मिक्स खिचडी त्यात शिजवण्यासाठी ओतली. आणि हो... अभय ने उंदीरमामा वालं पाणी पण प्यायलं...  एव्हाना निसर्गाने कूस बदलली होती. सूर्यनारायण विश्रांती ला जाऊन पृथ्वी चांदण्याची शाल पांघरायच्या तयारीत होती. समोरचे बॅकवॉटर्स दिसेनासे होऊन आता मिणमिण दिवे दिसायला लागले होते, जणू काही मुंग्यांची रांगच. डावीकडे  उंच शिखरावर दिसणारे दिवे कळसुबाई  शिखराची ओळख करून देत होते.

परत एकदा पाणी आणावं लागलं. 

एव्हाना खिचडी ऊन झाली होती. मनीष ने सांगितली होती खिचडी पण होता खरा मसाले भात. तमाल पत्र-काळीमिरी, दालचिनी इत्यादी जिन्नस असल्यामुळे मसाले भात एकदम फक्कड आणि स्पायसी झाला होता. सर्वानी आपापल्या ताटल्या काढल्या आणि मसाले भाता वर आडवा हात मारला. चुली वर शिजवलेल्या अन्नाची चव काही औरच.

रात्री गडावर जाऊन आकाश दर्शन करायचा प्रोग्राम ठरलेला होता. एव्हाना ११.००-११.३० झाले असतील. मग आम्ही सर्व जवळच मोकळ्याठिकाणी गेलो. चंद्रोदयाला वेळ होता, त्या मुळे आकाश खूपच सुंदर दिसत होते. नोव्हेबंर मधेच मोने सरां बरोबर आकाश दर्शन केल्यामुळे मृग, अँड्रोमेडा गॅलॅक्सि, आणि काही ओळखीचे ग्रह तारे दिसत होते. कातळावर झोपून आकाश पाहिल्या वर हे सर्व किती अजब आहे ह्याची प्रचिती येते. अँड्रोमेडा पृथ्वी पासून ८.९ अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे. किती ? ८.९ अब्ज  ???!!! खर्च अद्भुत आहे हे सर्व. हे सर्व पाहिल्यावर आपण किती क्षुद्र आहोत ह्याची जाणीव होते. मृग अगदी माथ्यावर दिसत होते. तीन तारे तिरक्या रेषेत, ह्या रेषेच्या आडव्या रेषेत अजून ३ तारे आणि ह्या सर्वांना सामावणारा एक समांतर चौकोन ही मृगाची ओळख. मग हिंदी सिनेमातला 'टूटता तारा' दिसतोय का ? ह्याची शोधाशोध झाली आणि एक 'टूटता तारा' दिसला पण. अजून थोड्या वेळाने परत गुहेत आलो. मग टॉर्च च्या झोतात  फोटो काढायचे अटेम्प्टस झाले.


















रात्री अजून १-२ ग्रुप्स पण मुक्कामी होते. गडाच्या वाटेवर काही बॅटर्यांचा प्रकाश दिसत होता.. म्हणजेच काही ग्रुप्स रात्री देखील चढाई करत होते.

स्लीपिंग बॅग्स बाहेर निघाल्या. घेतल्या नंतर २ वर्षांनी स्लीपिंग बॅगचा उपयोग होत होता. निजानीज चालू झाली मी आणि बापू आम्ही बाहेर म्हणजे मोठ्या गुहेत झोपलो आणि बाकीचे आतल्या छोट्या गुहेत. थंडी तशी विशेष नव्हती पण रात्र जशी बहरत होती तसा गार वारा चालू झाला. मी खरा अज्जीबात घोरत नाही तरी सर्वानी उगीच मला बदनाम केलं आहे ;-); अमित थोड्या वेळाने माझ्या घोरख्याना चा आनंद घेऊन आतल्या गुहेत झोपायला गेला. त्याच्या स्वागता साठी तिथे अनेक घोराखयाने त्याची वाट बघत होती.

अधून मधून जाग येत होती. जसा चंद्रोदय झाला तसे आकाश अजूनच सुंदर दिसू लागले. चंद्राच्या शीतल प्रकाशात धरणाचे बॅकवॉटर्स पण दिसत होते. अतीव सुंदर. हळू हळू पूर्वे कडून तांबडं फुटायला लागलं; तसा मी परत माथ्यावर गेलो. चंद्र आकाशात थोडा वर आला असेल, आणि कात्राबाईच्या मागून सूर्य नारायण धरणीस हॅलो करण्यास तयार होत होते. हे सर्व फोन कॅमेर्यात सामावून घेतले. गार वारा सुटला होता. परत गुहेत आलो आणि सर्वांना उठवले.

८.३० पर्यंत चहा घेऊन सर्व तयार झाले. पाण्याच्या बाटल्या, काही रिकाम्या आणि काही भरलेल्या घेऊन आम्ही निघालो. नाश्ता आम्ही थोडा वेळानी करायचं ठरवलं. माथ्यावर काही ग्रुप्स नि टेन्ट्स टाकलेले होते. आदल्या दिवशीची पायवाट घेऊन गड परिक्रमा चालू केली. डावी कडे बालेकिल्ला आणि उजवी कडे दरी अशी ही पायवाट. ही पायवाट अगदी गुहेच्या वरच्या बाजूस येत असल्याने गुहेतून दिसणारा प्रदेश इथून "पॅनारोमा झूम" सारखा वाटत होता. 

रतनगड किल्ला  साधारण `२००० वर्ष जुना आहे. पूर्व-पश्चिम पसरला असून उत्तर दिशेला भंडारदरा परिसर आणि दक्षिणेला ठाणे जिल्हा आहे. बालेकिल्ला साधारण अर्धा-एक किमी पसरलेला असेल. गडाच्या कड्यावरून पायवाट आहे. आणि या पायवाटेने गडावर पूर्ण प्रदक्षिणा घालता येते. तसेच गडाच्या शिखरावर एक 'नेढे' (सुई ला जसे छिद्र असते तसे) आहे. ह्या नेढ्यावर चढाई करून, गड परिक्रमे चा परतीचा प्रवास चालू होतो.
http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Ratangad-Trek-R-Alpha.html

आम्ही नेढ्याच्या पायथ्याशी साधारण ९ पर्यंत पोहोचलो असू. नेढे डावीकडे उंच शिखरावर आहे. आम्ही थोडं पुढे गेलो.  तिथे गडाचा मुख्य दरवाजा आहे. इथून खाली उतरायला उंच पायऱ्या आहेत आणि त्याच्या खाली शिडी. ही वाट खुट्टा सुळक्यास नेते. रात्री एक ग्रुप या वाटेने देखील वर आला होता. ही पायऱ्यांची वाट आणि मुख्य दरवाजा हे पूर्ण कातळात असल्याने इथे खूप थंड वाटत होते. येथील भाग अगदी उंच घळीत आहे. त्यामुळे येथे अगदी सांधण दरीत आल्या सारखा फील येतो. बरोबर असलेल्या एका ग्रुप ची त्याच विषया वरून थट्टा मस्करी चालू होती; 'हाच फोटो पोस्ट करू सांधण दरी करून आलो म्हणून सांगायला'. मनीष खाली शिडी पर्यंत उतरला, त्याच्या बरोबर अभय, अमोल. त्या नंतर अमित आणि मग मी उतरलो. आयुष, फोटो काढण्यासाठी वरच्या बाजूस थांबला. फोटो सेशन करण्यासाठी ही उत्तम जागा आहे. इथे बराच वेळ गेल्यावर आम्ही मुख्य दरवाज्यात नाश्त्याचा आनंद घेण्या साठी बसलो.

पराठे अजून सगळे शिल्लक होते. पोळी भाजी, पराठे आणि बरोबर आणलेले चिप्स वगैरे प्रकार भरून आम्ही मजबूत खाऊ आणलेला होता. मागल्या ट्रेक्स च्या आठवणी आणि इतर गप्पा मारण्यात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. साधारण १०.००-१०.३० झाले. इथून परत बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी येऊन, नेढ्यावर चढाई चालू केली. परतीचा प्रवास नेढे पार करून गडाच्या दक्षिण बाजू कडून होणार होता. इथून परतताना, काल आम्हाला पाण्याचे टाके जे सापडले नाही ते आता लागेल असा कयास बांधला. नेढ्यावर आल्यावर थांबलो. इथे सुस्साट सुस्साट वारा होता. आम्ही आलो त्या बाजूस भंडारदरा धरण प्रदेश आणि नेढे पार केले त्या ठिकाण होऊन पूर्ण ठाणे जिल्ह्याचा प्रदेश दिसत होता. फोटोसेशन साठी उत्तम जागा. थोडावेळ थांबून  इथून खाली उतरलो, वरून अगदी स्टीप असेल असे वाटत होते पण अगदीच सोपे होते. अजून थोडे पुढे आल्यावर उजवी कडे एक उंच पर्वत खुणावत होता. मग आमच्या 'मंझले हुए ट्रेकर्स' मध्ये एक चर्चा + डिबेट चालू झाली 'हा हरिशचंद्र गड आहे का ?' अभय आणि आयुष अगदी खंबीर होते कि हा हरिशचंद्रच आहे म्हणून. उंचावरील पठारी प्रदेश हा कोकण कडा आणि त्याच्या वर शिखर तारामती. अमोल कन्व्हिन्स्ड नव्हता. पुढे आयुष ने त्याच्या कडील जुने फोटो 'एव्हिडन्स' म्हणून काढले कि 'हाच तो' म्हणून. तरीही अमोल चे ठाम मत होते कि हा एकवेळ मागील बाजूने दिसणारा हरिशचंद्र असेल पण समोरील भाग हा कोकणकडा नक्कीच नाही. असो.. हे चालायचेच. नाही तर गम्मत ती काय.

पुढे आल्यावर पाण्याच्या ७-८ टाक्या लागल्या. हेच ते पाणी जे काल अभय आणि मनीष काल शोधत होते. काल ते जिथून परत फिरले ते ठिकाण इथून अगदीच जवळ होते. काल माझ्या कटकटी मुळे म्हणा किंवा त्यांनी फोटोसेशन मध्ये वेळ घालवला म्हणून म्हणा ते माघारी आले होते. एका कुंडातील पाणी एकदम स्वच्छ होतं. आमचे पाणीवाले बाबा अभय यांनी पाणी भरून दिलं. मग थंड गार आणि नितळ पाण्याचा आस्वाद घेऊन आणि पाणी भरून घेऊन आम्ही परत गुहे कडे निघालो. लगेचच अभय आणि मनीष नि केलेल्या फोटोसेशन ची तटबंदी लागली. इथून उजवीकडे दिसणारा निसर्ग म्हणजे अभय च्या भाषेत 'धिंगाणा' होता. उंचच उंच कातळाच्या पर्वत रांगा आणि त्यांच्या मुळे झालेल्या खोल दऱ्या आणि नदीचा प्रवाह. पुढे अगदी पाच मिनिटात आम्ही गुहेत पोहोचलो. तिथे परत हॉटेल वाल्या काकांना विचारलं "तो पर्वत कोणता ?" त्यांनी "आजोंबा" असे उत्तर दिल्यावर सुसं"वादा" वर पडदा पडला, अगदी काही वेळा पुरताच.










परत एकदा चहा झाला सामानाची बांधाबांध झाली. साधारण कालच्याच वेळी म्हणजेच १२.२० च्या सुमारास आम्ही आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. वाघातळे येथे थांबून जेवूयात असे ठरले. आयुष ला परत 'त्या'शिडी वरून उतरायचे थोडे टेन्शन होते. त्याने अभय ला "हि बॅग पण मीच घेऊन उतरू ना?" असे विचारल्यावर त्या वर शिक्कामोर्तब झाले. मग अभय आणि मनीष नि त्याला रेस्क्यू देत तो शिड्या उतरला. आम्ही जसे चढलो त्याच पोझिशन मध्ये रिव्हर्स उतरलो. सामान बरेच होते. आम्ही काही सामान इलॅस्टिक आणि दोऱ्यांच्या मदतीने उतरवले. १५-२० मिनिटात सगळे उतरलो.

पुढचा प्रवास चालू झाल्यावर, वर काल खाली येणाऱ्या लोकांची जागा आम्ही घेत, 'आता थोडाच वेळ अगदी १० मिन्टच' असा वर येणाऱ्यांना बूस्ट देत होतो. साधारण एक १.३० च्या सुमारास वाघतळे येथे पोहोचलो. खांद्यावरचे सामान आणि सॅक उतरल्या. अभय, अमोल आणि मनीष कडे मजबूत सामान होते. आडवे झालो. लिंबू सरबत, काकड्या हे हायड्रेशन झाले. मग डबे उघडले. अर्ध्या पाऊण तासाने पुढील प्रवास सुरु. याच ठिकाणून एक रस्ता/पायवाट हरिश्चंद्र कडे आणि एक सांधण दारी कडे जाते. आम्ही रतनवाडी च्या दिशेने प्रवास चालू केला. १-२ ब्रेक्स घेत पायथ्या पाशी ३ परतत पोहोचलो असू. एव्हाना ऊन वाढलं होतं. पुढे आल्यावर एक 'दोराहा' लागला. इथपर्यंत काल आम्हाला गाईडने एका शॉर्ट कट ने आणलं होतं. आम्ही आलो त्याच रस्त्याने जायचं ठरवलं. इथून उंच बघितल्यावर डोंगरावर उंच ठिकाणी आणि कडे कपारीत गुरं चरताना दिसत होती. पाय सरकायची भीती आपल्याला.. त्यांना काय रोजचीच सवय. 

पुढे आल्यावर १-२ मिनी चकवे लागले. आणि थोडं पुढे आल्यावर बांधाचा प्रदेश लागला, इथून पुढे वाट चुकायचा काही प्रश्नच नव्हता. एके ठिकाणी पाणी उथळ होते...  तिथे मनसोक्त स्नान झाले. थंड गार पाणी अंगावर घेतल्यावर एकदम शीण कुठल्या कुठे पळून गेला. एकदा फ्रेश झाल्यावर परत घामट कपडे घालणं मला जीवावर आलं. मग टी-शर्ट, पंचा आणि शूज ह्या वेशात पुढील प्रवास सुरु झाला. काल आम्ही येत असताना जेसीबी नि खोदलेल्या रांगेलगत चालत आम्ही येत होतो.. आता पर्यंत ती रांग बुजवण्यात आली होती. बांधा पर्यंत पाईपलाईन नेण्यासाठी केलेला खड्डा होता. अगदी १० मिनिटात प्रवास जिथून चालू केला तिथे पोहोचलो.

पुढे अमृतेश्वराचे दर्शन घेण्यास गेलो. अमृतेशवराचे (शंकराचे) हे देऊळ पांडवकालीन आणि हेमाडपंथी आहे. कोरीवकामावर काळाच्या ओघाने झालेल्या जखमा स्पष्ट दिसत होत्या. सभा मंडपात आल्यावर खिद्रापूर (कोल्हापूर-सांगली जवळील)  च्या मंदिरात आल्यासारखं वाटलं. साधारण तसेच खांब आणि सभा मंडप. कातळातील काम असल्याने इथे एकदम थंड वाटत होतं. अमृतेशवराचे दर्शन घेतले. गाभाऱ्यात "ॐकार" लावला. परत गाडीपाशी आलो. अभय ने सामान घट्ट बांधून घेतले. चहा झाला आणि ५.३० च्या सुमारास परतीचा प्रवास चालू केला. लवकर आलो असतो तर आम्ही सांधण दरीत जाण्याचा विचार केला होता पण ते आता शक्य नव्हते. आम्ही आलो त्या मार्गानेच शेंडी गावा कडून निघालो. (वेळ असल्यास गाडीने हे पूर्ण सर्किट करता येते, येतांना शेंडी गावच्या आधी एमटीडीसी रिसॉर्ट जवळ उजवीकडे वळायचं. मग कळसुबाई, ए-एम-के, घाटघर धरण यांचे साईट सीइंग करत आपण रतन वाडीत येतो. साधारण एक ५० किमी चा फेर फटका आहे.).

धरणाच्या बॅकवॉटर्स ला प्रदक्षिणा घालत आम्ही शेंडी मार्गे परतीच्या प्रवासास निघालो. काल येताना ओळखू न येणारा रतनगड आता दुरून पण ओळखू येणाऱ्या मित्रा सारखा दिसत होता. तुम्ही येताना लक्षात ठेवा... शेंडी होऊन पुढे आलं कि उजवीकडे दूर विस्तीर्ण पसरलेला घाटमाथा, खाली दाट झाडी, उजवीकडे शिखरावर नेढे आणि त्याचा बाजूला (खुट्टा) सुळका दिसलं कि समजावं.. हा रतनगडच.   

गडावर मुक्काम करायचा माझा हा पहिलाच योग होता आणि अगदी अविस्मरणीय. सूर्यनारायण आता रतनगडाच्या मागून विश्रांतीच्या तयारीस लागले होते.. तसे आम्ही मोबाईल आणि डीएसेलार मधील फोटो पाहत परत ट्रेक नजरेत भरून घ्यायचा प्रयत्न करत होतो. हळू हळू किल्ला दिसेनासा झाला पण मनात रुजलेला होता अगदी एखाद्या आवडलेल्या ब्लॉकबस्टर सिनेमा प्रमाणे.